‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील दमदार विनोदी अभिनयामुळे लोकप्रिय झालेला अभिनेता निमिष कुलकर्णी आता मराठी चित्रपटसृष्टीत नवी वाटचाल सुरू करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘द्विधा’ या आगामी मराठी चित्रपटातून तो पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकणार असून, हा चित्रपट २१ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
निमिषने छोट्या पडद्यावरील अभिनयासोबतच ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकातून आणि हिंदी चित्रपट ‘अग्नि‘मधूनही आपली छाप पाडली आहे. सध्या ‘सनई चौघडे’ मालिकेतील त्याच्या भूमिकेलाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता ‘द्विधा’मधील त्याच्या नव्या भूमिकेकडेही चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
या चित्रपटात निमिष आदित्य (आदि) ही व्यक्तिरेखा साकारत आहे. प्रेमळ, समजूतदार आणि विश्वासू स्वभावाचा आदि कुटुंबातील नात्यांना जपणारा आधारस्तंभ आहे. तो श्रावणीचा आत्येभाऊ असून, बालपणापासून दोघे एकत्र वाढल्याने त्यांच्या नात्यात विश्वास आणि भावनिक जवळीक दिसून येते. कमी बोलणारा पण इतरांच्या भावना अचूक ओळखणारा संवेदनशील स्वभाव हे या व्यक्तिरेखेचे वैशिष्ट्य आहे.
या भूमिकेबद्दल बोलताना निमिष कुलकर्णी म्हणाला, “‘द्विधा’ हा फक्त बाप-लेकीच्या नात्यावर आधारित चित्रपट नाही, तर प्रत्येक नात्यात दडलेल्या भावनांचा प्रवास आहे. या भूमिकेमुळे अनेक भावनिक पैलू अनुभवता आले. निलेश नाईक यांच्या संवेदनशील दिग्दर्शनाखाली आणि अनुभवी कलाकारांसोबत काम करण्याची संधी समृद्ध करणारी ठरली. प्रेक्षकांनी आजवर दिलेल्या प्रेमाप्रमाणे ‘द्विधा’मधील माझी भूमिका देखील त्यांना आवडेल, अशी अपेक्षा आहे.”
‘द्विधा’मध्ये बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक गुंतागुंत आणि कौटुंबिक नात्यांतील जिव्हाळा हळुवारपणे मांडण्यात आला आहे. नात्यांमधील विश्वास, साथ आणि भावनिक बंध यांचा वेध घेणारा हा चित्रपट प्रेक्षकांसमोर एक संवेदनशील कथा मांडणार आहे.
या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन निलेश भास्कर नाईक यांनी केले असून, विदुला रमेश आजगावकर या चित्रपटाच्या निर्माती आहेत. चित्रपटात सतीश पुळेकर, मानसी कुलकर्णी, रेणुका दफ्तरदार, आस्ताद काळे, तन्वी कुलकर्णी, पुष्कर सराड, मनोज कोल्हटकर, भूषण कडू, प्रफुल्ल सावंत, हेमांगी वेळणकर आणि ओवी तानवडे यांच्या महत्त्वाच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत. २१ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाकडून मराठी प्रेक्षकांना एका भावनिक आणि कौटुंबिक कथानकाची अपेक्षा आहे.
=======
हे देखील वाचा : ‘घबाडकुंड’च्या यशानंतर प्रीतम एस. के. पाटील ठरले मराठी हॉरर सिनेमाचा नवा चेहरा
=======