Home » Circuitt Movie Review: मला राग येतोय..! मानवी भावभावनेचा पडसाद

Circuitt Movie Review: मला राग येतोय..! मानवी भावभावनेचा पडसाद

CIRCUITT Movie Review

राग हा मानविभावभावनेचा अविभाज्य भाग आहे. मानवी मनातील भावभावना आणि त्याचा व्यक्तीच्या वर्तनावर होणारा परिणाम; एकमेकांशी संलग्न आहे. स्वभावतःच एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही की, कोणालाही राग आल्याशिवाय राहत नाही. त्या येणाऱ्या रागाचे कारण, एखादी दुसरी व्यक्ती, तिची कृती, बोलणे हे असू शकते तर कधीकधी माणसाला स्वतःचच राग येऊ शकतो. राग येणे मानसशास्त्राच्या दृष्ष्टीने अत्यंत महत्वत्वपूर्ण प्रतिक्रिया आहे. पण, ही प्रतिक्रिया.. हा राग ‘अति’ प्रमाणात मनुष्याच्या अंगी असेल तर काय होईल? त्या रागिष्ट व्यक्तीच्या आजूबाजूच्या व्यक्तींवर त्याचा काय परिणाम होईल?  याच रंजक उत्तर आपल्याला आकाश पेंढारकर दिग्दर्शित ‘सर्किट’ सिनेमात मिळते. (Circuitt Movie Review)

सिनेमाच्या शीर्षकावरून तुम्ही अंदाज लावू शकता की, नक्कीच काहीतरी ‘सर्किट’पणा या सिनेमाच्या कथेत, पात्रात दडलेला असणार. सिनेमाचा नायक सिद्धार्थ (वैभव तत्ववादी) हा अशाच काहीशा मानसिकस्थितीत असतो. त्याला चटकन.. बारीक-सारीक गोष्टींवर राग येत असतो. आणि एकदा का त्याला राग आला की मारामारी, आदळआपट हे त्याच्यासाठी नेहमीच असतं. पण, त्याच्या आयुष्यात एक मुलगी येते. तिचं गाणं ऐकल्यावर त्याचा ‘राग’ कमी होतो. एकाच कॉलेजमध्ये असेल सिद्धार्थ आणि आरोही (ऋता दुर्गुळे) कर्मधर्मसंयोगाने एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यांचं लग्न होतं.

सिद्धार्थनं अगोदरच आरोहीला आपल्या या रागिष्ट स्वभावाबाबत सावध केलेलं असतं. पण, मोठ्या मनाने आणि प्रेमाच्या सावलीत ती सिद्धार्थ बरोबरच राहण्याचा निर्णय घेते. दोघे मिळून आपण या रागाच्या चक्रव्ह्यूवातुन बाहेर पडू; असं तिचं म्हणणं असतं. सिद्धार्थचा राग कमी करण्यासाठी ती तसा प्रयत्न करते देखील. पण,… आता हे ‘पण’ नेमकं काय आहे? हे तुम्हाला सिनेमा पाहिल्यावर समजेल. आता तुम्ही म्हणाल हा इतकाच सिनेमा आहे का? तर तसं.. नाही. हा केवळ सिनेमाचा पूर्वार्ध आहे. खरा उत्कंठावर्धक सिनेमा तर उत्तरार्धात घडतो. हा उत्तरार्ध पूर्वार्धापेक्षा मनोरंजक आहे. कारण, इकडे खऱ्या अर्थानं ‘सिद्धार्थ’च्या रागिष्ट स्वभावाचे तीव्र पडसाद उमटतात. आता हे पडसाद नेमके कोणते? हे तुम्हाला सिनेमा पाहिल्यावर चटकन समजेल.

Circuitt Movie Review

सिनेमा उत्तरार्ध जितका रंजक आहे तितका विरुद्ध दिशेला सिनेमाचा पूर्वाध कंटाळवाणा आहे. पटकथेच्या पातळीवर ठिसूळ लिखाण जाणवते. महत्वाची बाब म्हणजे हा सर्व मामला अर्थात ‘सर्किट’ हा सिनेमा दाक्षिणात्य सिनेमाचा रिमेक आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘काली’ या मल्याळम सिनेमाचा तो मराठी रिमेक आहे. त्यामुळे मूळ सिनेमाची तुलना प्रेक्षकांकडून केली जाणार. शिवाय ‘काली’ इंटरनेटवर हिंदी (डब) उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील अनेक प्रेक्षकांनी तो नक्कीच पाहिला असेल; हे गृहीत धरणं भाग आहे. त्यामुळे आता सिनेमाचा रिमेक बनवताना निर्मात्यांनी सिनेमांच्या मूळ कथानकाच्या आणि मांडणीच्या पलीकडे जाऊन नव्याने पटकथेची मांडणी करायला हवी होती. जेणेकरून प्रेक्षकांना काहीतरी नवी कलाकृती पाहिल्याचे समाधान मिळेल.

मराठीत आजच्या तारखेला रिमेकची संख्या बॉलिवूडच्या तुलनेत अत्यंत अल्प आहे, पण तो येत्या काळात वाढेल का? कारण, अलिकडेच ‘वेड’ सारखा सिनेमा देखील प्रदर्शित झाला. तोही दाक्षिणात्य सिनेमाचा रिमेक होता. मराठीच्या धर्तीवर अशा छापखान्याचा पायंडा पडणे कितपत सुयोग्य आहे; याचा विचार मराठीतील लेखक-दिग्दर्शकांनी करायला हवा. नाहीतर, रिमेकच्या सावलीत वावरताना नवनिर्मितीकडे कानाडोळा करुन केवळ मराठीच्या पडद्यावर छापखान्यातील ‘छाप’च पडेल. तसंच काहीसं ‘सर्किट; बाबतही झालं आहे.

काही ठिकाणी दिग्दर्शकीय कसब नक्कीच दिसते. विशेष म्हणजे ‘रंगा’ या पात्राच्या तोंडी एकही वाक्य न देणे. दिग्दर्शकाच्या आणि लेखकाच्या हा सूचकतेमुळे ‘रंगा’ (मिलिंद शिंदे) कथानकात विशेष उठून दिसतात. अपेक्षित उत्कृष्ट अभिनय कौशल्य अभिनेते मिलिंद यांनी यावेळी इकडे दाखवलं आहे. दुसरीकडे भूमिकांची लांबी लहान असूनही रमेश परदेशी याने त्याची छोटीशी व्यक्तिरेखा चांगलीच वठवली आहे. (Circuitt Review)   

‘अनन्या’, ‘टाईमपास ३’ आणि आता ‘सर्किट’च्या निमित्तानं ऋता दुर्गुळे (HRUTA DURGULE) सारखा तरुणाईतील लोकप्रिय चेहरा सिनेमात आहे. ऋतुच्या चाहत्यांसाठी हा सिनेमा नक्कीच पर्वणी असेल. सोबतच सर्वसामान्य प्रेक्षकांनाही ऋताचे या सिनेमातील सादरीकरण पाहणे; मनोरंजक आहे. विशेषकरून उत्तरार्धातील ऋताचा अभिनिवेश खास चांगला आहे. दुसरीकडे वैभव तत्ववादी (VAIBHAV TATWAWADI) आपली निराशा करतो. वैभव अनेकदा सिद्धार्थ कमी आणि स्वतः वैभव अधिकच पडद्यावर दिसतो. त्याचा आवेशपूर्ण अभिनय नजरेत खटकतो. त्यामुळे सिनेमा पहाताना सारखं काहीतरी चुकल्या-चुकल्या सारखं वाटत राहते.

=====

हे देखील वाचा: शो मस्ट गो ऑन..पाय फॅक्चर, अभिनेता शंतनू मोघेने वॉकर घेवून केला नाटकाचा प्रयोग

=====

सिनेमा तांत्रिकदृष्ट्या चांगला आहे. छायांकन आणि विशेषकरून सिनेमाचे संगीत अफलातून आहे. सिनेमातील गाणी आणि पार्श्वसंगीत महत्वाची भूमिका बजावतात. सिनेमाच्या कथानकात चढ-उतार आहेत; त्यामुळे तो पाहताना आपला दोन घडीचा विरंगुळा नक्कीच होतो. सो.. गो अँड वॉच द फिल्म..

सिनेमा : सर्किट
निर्मिती : मधुर भांडारकर, पराग मेहता, अमित डोगरा, प्रभाकर परब
दिग्दर्शक : आकाश पेंढारकर
रुपांतरित कथा आणि संवाद : संजय जमखंडी
कलाकार : वैभव तत्ववादी, ऋता दुर्गुळे, रमेश परदेशी, मिलिंद शिंदे
छायांकन : शब्बीर नाईक
संगीत : अभिजीत कवठाळकर
दर्जा : तीन स्टार

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy