Home » ‘महाराष्ट्र शाहीर’च्या ट्रेलरचे उद्योगमंत्री श्री उदय सामंत यांच्या हस्ते विमोचन

‘महाराष्ट्र शाहीर’च्या ट्रेलरचे उद्योगमंत्री श्री उदय सामंत यांच्या हस्ते विमोचन

बहुप्रतीक्षित ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shaheer) या सांगीतिक पर्वणी ठरणाऱ्या बिग बजेट चित्रपटाचा ट्रेलरचे अर्थात पहिल्या झलकीचे मंगळवारी ११ एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री श्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. शाहीर साबळे हे ‘महाराष्ट्र शाहीर’च्या माध्यमातून पुढील पिढीपर्यंत पोहोचावेत यासाठी हा चित्रपट शाळाशाळांमध्ये दाखवला जाईल, याची तजवीज शासन करेल, अशी घोषणाही यावेळी त्यांनी केली.

चित्रपट दर्जेदार गाणी, भावनिक प्रसंग आणि सामाजिक-राजकीय प्रसंगांमधून सर्वांगसुंदर झाला आहे, याची झलक हा ट्रेलर देतो. २८ एप्रिल रोजी प्रदर्शित होत असलेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ची निर्मिती ‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’ या आघाडीच्या स्टुडीओचीआणि बेला केदार शिंदे प्रॉडक्शन्सची आहे. मराठीतील आजचे आघाडीचे लेखक-दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्यांच्या आजोबांवरील या जीवनपटाचे दिग्दर्शन केले आहे. शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्य वीर सावरकर स्मारक सभागृह, येथे झालेल्या या ट्रेलर विमोचन कार्यक्रमाला निर्माते, दिग्दर्शक यांच्याबरोबरच चित्रपटातील आघाडीचे कलाकार अंकुश चौधरी, सना केदार शिंदे यावेळी उपस्थित होते.

राज्याचे उद्योगमंत्री श्री उदय सामंत यांनी यावेळी महाराष्ट्र शाहिर सर्व शालेय मुलांपर्यंत नेण्याचे काम शासन करेल, अशी घोषणा केली. “मी संयुक्त महाराष्ट्र चळवळ पाहिलेली नाही, पण त्याबद्दल वाचले आहे. लोककलेतून आणि जनजागृतीतून काय आव्हान उभे करता येते ते शाहिरांनी त्यावेळी दाखवून दिले आहे. शाहीर साबळे कोण हे पुढील पीढीला कळावे म्हणून या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. त्यासाठी मी निर्माते संजय छाब्रिया यांचे आभार मानतो. अशा चित्रपटांच्या मागे शासनाने उभे राहिले पाहिजे ही माझी भूमिका आहे. हे लोकशाहीर पुढील पिढीपर्यंत पोहोचावेत म्हणून शासनातर्फे हा चित्रपट सर्व शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, त्यांच्यापर्यंत लोककला पोहोचावी याची तजवीज करण्याची जबाबदारी मी स्वीकारत आहे,” असे ते यावेळी म्हणाले.

नक्की वाचा: एनसीपीएमध्ये पुन्हा सुरु होतोय मराठी नाटकांचा वार्षिकोत्सव: प्रतिबिंब नाट्योत्सव

श्री सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे २८ एप्रिल रोजी चित्रपट प्रदर्शनासाठी येणार आहेत. “तशी मी आग्रही भूमिका त्यांच्यासमोर मांडेन. ते यावेळी चित्रपट आणि शाहीर साबळे यांच्याबद्दल ज्या काही घोषणा करायच्या असतील त्या करतील. मी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री असताना मुंबई विद्यापिठातील शाहिरांच्या नावाने असलेल्या भारतातील पहिल्या अध्यासनाला ३ कोटी रुपयांची मदत मला करता आली याचा मला आनंद आहे. केदार शिंदे यांचा मित्र म्हणून शासन दरबारी मी या चित्रपटासाठी जे जे म्हणून करण्याची गरज असेल ते सर्व करेन, याची ग्वाही देतो,” ते म्हणाले.

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy