मराठी सिनेमात सासू-सुनेचं नातं बर्याचदा भांडणं, विनोद किंवा आरडाओरडीत अडकलेलं दिसतं. पण ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा सिनेमा त्या चौकटीत अडकत नाही. हा सिनेमा हसवण्यापेक्षा मनात डोकावतो. नात्यांमधली न बोललेली गोष्ट तो शांतपणे सांगतो. (Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai Review)
केदार शिंदे यांच्या सिनेमांमध्ये स्त्री म्हणजे फक्त सहन करणारी नसते. ती विचार करते, प्रश्न विचारते आणि स्वतःसाठी उभी राहते. या सिनेमातही तेच दिसतं. सासू-सुनेचा संघर्ष दाखवताना दिग्दर्शक कुठेही अतिशयोक्ती करत नाही. रोजच्या आयुष्यात दिसणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टींमधून नात्यांमधला ताण समोर येतो.
स्मिता देसाई (निर्मिती सावंत) आणि मनस्वी (प्रार्थना बेहेरे) या सासू-सुनेचं नातं या कथेचा केंद्रबिंदू आहे. सासू जुनी मूल्यं जपणारी, तर सून स्वतःच्या पद्धतीनं जगू पाहणारी. दोघींचं काही जमत नाही, आणि त्याचा फटका घरातल्या सगळ्यांनाच बसतो. शेवटी मुलगा आणि सून वेगळं राहण्याचा निर्णय घेतात. इथपर्यंत गोष्ट ओळखीची वाटते, पण त्यानंतर कथा वेगळं वळण घेते आणि सिनेमा अधिक भावनिक होतो.
हा सिनेमा कोण बरोबर आणि कोण चूक हे ठरवत नाही. उलट आपण एकमेकांचं ऐकतो का? हा प्रश्न तो सतत विचारतो. काही प्रसंग मनाला थोडे थकवणारे आहेत. दुसऱ्या भागात काही दृश्यं जरा लांबली आहेत आणि कथा थोडी अंदाजे वाटते. तरीही सिनेमा आपली पकड सोडत नाही.
संवाद खूप सोपे आणि आपलेसे आहेत. अनेक ठिकाणी शब्दांपेक्षा शांतता जास्त बोलते. साडीच्या निऱ्या, घरातले फोटो, रोजच्या सवयी या छोट्या गोष्टींमधून नात्यांमधली जवळीक आणि दुरावा दोन्ही दाखवले जातात. काही ठिकाणी मालिकेची छाप जाणवते, पण ती कथेशी विसंगत वाटत नाही.
निर्मिती सावंत आणि प्रार्थना बेहेरे या सिनेमाचा खरा आधार आहेत. निर्मिती सावंत यांची सासू कडक आहे, पण आतून खूप हळवी आहे. त्यांच्या अभिनयात कुठेही अति नाट्य नाही. प्रार्थना बेहेरे आजच्या पिढीच्या सूनेची भूमिका प्रामाणिकपणे साकारते. ती भांडखोर नाही, पण गप्प बसणारीही नाही. राजन भिसे शांत भूमिकेत भावतात, तर नकुल घाणेकरही आपली भूमिका नीट निभावतो.
संगीत आणि तांत्रिक बाजू साधी आहे, पण कथेला साथ देणारी आहे. जुनी गाणी प्रसंगानुरूप वापरली आहेत. छायाचित्रण स्वच्छ आणि सहज आहे. काही ठिकाणी एडिटिंग थोडं घट्ट असायला हवं होतं, असं वाटतं.
एकूणात, ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा सिनेमा परिपूर्ण नाही, पण तो प्रामाणिक आहे. विनोदाची अपेक्षा असेल तर तो कमी वाटू शकतो. पण नात्यांमधल्या भावना, समज आणि माणूसपण पाहायचं असेल, तर हा सिनेमा नक्कीच पाहण्यासारखा आहे. विशेषतः महिलांना हा सिनेमा जास्त जवळचा वाटेल, पण पुरुषांनीही तो पाहायला हवा.
सिनेमा : ‘अगं अगं सूनबाई ! काय म्हणताय सासूबाई?’
निर्मिती : झी स्टुडिओज, सनफ्लॉवर स्टुडिओज
दिग्दर्शन: केदार शिंदे
कथा व पटकथा : वैशाली नाईक, ओमकार दत्त कलाकार : निर्मिती सावंत, प्रार्थना बेहेरे, राजन भिसे, नकुल घाणेकर
दर्जा: तीन स्टार