‘फुलराणी’ किंवा ‘ती फुलराणी’ म्हटलं की, हमखास डोळ्यासमोर येतो तो भक्ती बर्वे – इनामदार यांचा करारी चेहरा. भक्ती बर्वे यांच्या कारकिर्दीमधला ‘माईलस्टोन’ म्हणजे ‘ती फुलराणी’ हे नाटक. २९ जानेवारी १९७५ रोजी म्हणजेच तब्बल ४६ वर्षांपूर्वी इंडियन नॅशनल थिएटर निर्मित आणि पु. ल. देशपांडे लिखित व दिग्दर्शित ’ती फुलराणी’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील रविंद्र नाट्यमंदिर येथे झाला होता. भक्ती बर्वे हयात असेपर्यत ‘मंजुळा’ हे पात्र त्यांनी साकारलं. मंजुळा म्हणजे भक्ती बर्वे असं जणू एक समीकरणच रसिकांच्या डोक्यात पक्कं बसलं होतं. या नाटकाचे ११११ पेक्षा जास्त प्रयोग करत मंजुळाची भूमिका त्या अक्षरश: जगल्या होत्या. पुढे २००१ साली त्यांचे अपघाती निधन झाल्यावर, काही काळ प्रिया तेंडुलकर यांनी मंजुळाची भूमिका साकारली. २००२ साली प्रियाजींचे निधन झाले. त्यांनतर सुकन्या कुलकर्णी आणि अमृता सुभाष यांनी मंजुळा साकारली. काही वर्षांपूर्वी दिग्दर्शक राजेश देशपांडे यांच्या नाटकात हेमांगी कवी हिने ‘मंजुळा’ साकारली. प्रत्येकीने आपल्या कसदार अभिनयाने मंजुळाच्या भूमिकेमध्ये जीव ओतला.
आता ‘फुलराणी‘ (Phulrani) म्हणून मराठीच्या पडद्यावर अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हिचा चेहरा आला आहे. नाही म्हटतरी एकमेकांशी तुलना ही होणारच. किंबहुना कलाकृती-कलाकृतीमध्ये देखील तुलना झाल्या शिवाय राहणार नाही. परंतु, स्वतंत्र विचार केल्यास यावेळी मोठ्या पडद्यावरील विश्वास जोशी दिग्दर्शकीय ‘फुलराणी’ सिनेमात प्रियदर्शनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) हिने आपल्या परिणाम सुरेख आणि प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ही नवी फुलराणी प्रेक्षकांनी स्वीकारायला हवी.
हिरवे हिरवेगार गालिचे – हरित तृणाच्या मखमालीचे;
त्या सुंदर मखमालीवरती – फुलराणी ही खेळत होती.
गोड निळ्या वातावरणात – अव्याज-मने होती डोलत;
प्रणयचंचला त्या भ्रूलीला -अवगत नव्हत्या कुमारिकेला,
आईच्या मांडीवर बसुनी – झोके घ्यावे, गावी गाणी;
याहुनि ठावे काय तियेला – साध्या भोळ्या फुलराणीला ?
ही बालकवींची ‘फुलराणी; कविता आपल्यापैकी अनेकांच्या मनावर कोरली गेली आहे. उपरोक्त अभिनेत्री भक्ती बर्वे यांच्या उल्लेख केल्या प्रमाणे… फुलराणी म्हंटल्यावर मराठी माणसाला आणखी दोन गोष्टी प्रामुख्याने आठवतात. एक म्हणजे ही, बालकवींची कविता आणि दुसरं म्हणजे पु. ल. देशपांडे यांचं ‘ती फुलराणी’ हे नाटक. पण, या दोन कलाकृतींच्या पलीकडे बरंच काही या फुलराणीमध्ये दडलेलं आहे. ते दडलेलं गुपित आजवर अनेक लेखक, दिग्दर्शकांनी शोधण्याचा प्रयत्न केला. मूळ कलाकृतीतून प्रेरित होऊन. लेखकांनी आपापला असा एक अर्थ काढला. अर्थात; लेखक जॉर्ज बर्नार्ड शॉ याने १९१२ मध्ये ‘पिग्मॅलियन’ हे नाटक लिहिलं होतं. जे १९१३ मध्ये ते रंगभूमीवर सादर झालं आणि गाजलं. या नाटकावर ‘पिग्मॅलियन’ या शीर्षकाखालीच १९३५ पासून १९३८ पर्यंत जर्मन, डच, ब्रिटिश इंग्लिश भाषांमध्ये सिनेमे निर्मिती गेले. १९५६ मध्ये सुरुवातीला ‘माय फेअर लेडी’ नावाचे ब्रॉडवे नाटक आणि १९६४ मध्ये म्युझिकल सिनेमाही आला. सोबतच नानाविविध कलाकृती या कलाकृतीतून प्रेरित होऊन बनल्या. अशी ही जगविख्यात असलेली फुलराणी जरी आज शंभर हुन अधिक वर्षांची असली तरी; ती वर्षानुवर्षे तरुण होत जात आहे. तिचं फुल कालांतराने कोमेजून जात नसून अधिक टवटवीत, गडद रंगांची होत आहेत. म्हणूनच की काय… ‘पिग्मॅलियन’ची भुरळ आता गीतकार गुरु ठाकूर आणि विश्वास जोशी यांना पडली; आणि त्यांनी ‘फुलराणी’ सिनेमाची निर्मिती केली. पण, ही ‘फुलराणी’ ‘अल्लड’ आहे. (Phulrani Movie Review)
एकीकडे बालकवींच्या कवितेत (जी कविता सिनेमात देखील पार्श्वगीत म्हणून कथानकात वापरण्यात आली आहे.) फुलराणीच्या रूपाचे, स्वभावे दर्शन आपल्याला घडते. ते असे की, ‘हिरव्या हिरव्या गवताच्या मखमालीच्या गार गालिच्यावर फुलराणी खेळत होती. आईबरोबर झोपाळ्यावर बसून गाणी गावीत आणि आनंदात रमावे, हेच त्या अल्लड, अवखळ आणि अजाण मुलीचे जीवन होते. या तिच्या जीवनक्रमात एकदा खट्याळ वाऱ्याची एक झुळूक आली. फुलराणीच्या अजाण, अबोध मनात त्या वाऱ्याने एक विचाराची लहर सोडून दिली. संध्यासमयीचा रविकिरण फुलराणीला आवडला का? असे त्या वाऱ्याने मिश्कीलपणे हसत विचारल्यावर फुलराणीच्या मनात जणू प्रेमाचा कोमल अंकुर उमलला आणि ती लाजून चूर झाली.’ दुसरीकडे सिनेमात आणखी एक ‘ब्युटीफुल राणी’ हे गीत आहे. हे गीत आजच्या अर्थात २०२२ च्या फुलराणीचं प्रतिनिधित्व करतंय. मंदार चोळकर लिखित, निलेश मोहरीर यानं संगीतबद्ध केलेलं आणि अवधूत गुप्ते याने गायलेलं; हे गीत ‘फुलराणी’ला नवी व्याख्या देणारं आहे. ही फुलराणी म्हणजे… सिनेमातील गीतशब्द काय सांगतात…
अल्लड अल्लड ग्वाड पोरगी
कोल्याची झटांग पोरगी
जरा जराशी म्याड पोरगी
करेल आता बवाल
मनमौजी बिन्धास पोरगी
अतरंगी झक्कास पोरगी
चिकनी चिकनी खास पोरगी
करेल आता धम्मालनखरे करते हजार ही येड्यावानी
धडपडते पन सावरते डेरींग तुफानी
अरे नखरे करते हजार ही येड्यावानी
धडपडते पन सावरते डेरींग तुफानी
फुलराणी फुलराणी झाली ब्युटिफुल राणी..!
हा सर्व ‘अल्लड’ मामला यावेळी गुरु ठाकूर आणि विश्वास जोशी यांच्या फुलराणीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बोलण्याची भाषा, शब्दांचे उच्चार, त्यांतले हेलकावे, लकबी, विविध भागांतील लोकांच्या भाषेमध्ये आढळून येणारी जातीय, प्रांतीय, ग्रामीण, नागरी वैशिष्ट्ये सिनेमातील विविध पात्रांमध्ये दिसते. प्रामुख्याने ते फुलराणी (प्रियदर्शनी इंदलकर) आणि विक्रम राजाध्यक्ष (सुबोध भावे) मध्ये दिसते. शब्दांच्या शुद्ध-अशुद्ध उच्चारांवर कोणी मोठा किंवा लहान ठरत नाही. बाह्यसौदंर्य, दिखावा, रुप आदींवर त्या मुलीचे पत ठरत नाही. हे सांगणारा हा सिनेमा किंवा ही ‘फुलराणी’ आहे. हे सर्व प्रेक्षकांसमोर अधोरेखित करताना लेखक, दिग्दर्शकानी पटकथेत ‘सौन्दर्य स्पर्धे’चा आधार घेतला आहे. ‘प्रिटी प्रिन्सेस’ असं या स्पर्धेचं नाव आहे. कोळीवाड्यात राहणारी, फुलं विकणारी शेवंता कथानकाच्या केंद्रस्थानी आहे. शेवंता अर्थात फुलवाली… फुलराणी!जी अल्लड पण महत्वकांक्षी आहे. भोळी-भाबडी आहे. परंतु, अरेला कारे करणारी निडर अशी ती मुलगी आहे.
दुसरीकडे विक्रम राजध्यक्ष (सुबोध भावे) ही व्यक्तिरेखा महत्वकांक्षा पण अहंकार आहे. कोणत्याही मुलीला मी ‘प्रिटी प्रिन्सेस’ बनवू शकतो. असा त्याचा हा ‘अहंकार’ आहे. ग्रुमिंग ट्रेनर असलेला विक्रम राज्याध्यक्ष आपला मित्र (सुशांत शेलार) सोबत पैज लावतो. कोळीवाड्यातील सर्वसामान्य मुलीला मी ‘प्रिटी प्रिन्सेस’ बनवणार, तिला ट्रेन करणार.’ अशी पैजे तो लावतो. ही पैज आणि त्या निमित्तानं घडणाऱ्या प्रसंगाची साखळी म्हणजे ‘फुलराणी’ ही साखळीची घट्ट बांधणी झाली आहे; पण अनेक ठिकाणी तिला जोड, लांबट लावण्यात आलीय. गीतांमधील स्वप्नरंजन अधिकच भडक आणि वास्तवापासून दूर जाणारे आहे.
पण, शेवंता.. फुलराणी आपल्याला आपलीशी का वाटते, कारण ती प्रत्येक मुलीमध्ये लपलेली आहे. तिची जगण्याची धडपड प्रत्येक सामान्य मुलीसारखीच आहे. स्वत:ला सिद्ध करण्याची जी इच्छा आहे ती प्रत्येक मुलीमध्ये असते. त्यामुळे ही प्रत्येक मुलीची गोष्ट बनून जाते. ‘प्रेम’ आणि ‘भाषा’ या दोन्ही गोष्टी कालातीत अशाच आहेत. प्रत्येकाला आपल्याशा वाटणाऱ्या. कोणत्याही काळात न बदलणाऱ्या या दोन गोष्टी. या दोन गोष्टींचं सुरेख मीलन म्हणजे ‘फुलराणी’.
अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हिने फुलराणी हे पात्र सुरेख निभावले आहे. आजवर तिनं एखाद-दुसऱ्या सिनेमात छोटेखानी भूमिका नक्कीच साकारली होती. परंतु, ‘फुलराणी’च्या निमित्तानं तिला स्वतःचे अभिनय कौशल्य दाखवण्याचा मोठा कॅनव्हास मिळाला. आणि तिनं त्यानं विविधांअंगी आणि रंगेबीरंगी फुलांचे रंग भरले. सुबोध भावे, विक्रम गोखले यांच्या सारख्या मात्तबर अभिनेत्यांसमोर आत्मविश्वासाने ती वावरताना दिसली. यासाठी तिचं कौतुक आहे. एक अभिनेत्री म्हणून तिची ही वाटचाल सर्वदूर जाणारी असेल; असं म्हणायला हरकत नाही. और सुबोध भावे यांच्याविषयी काय लिहायचे. मुरलेला नट काय करु शकतो. हे पुन्हा एकदा सुबोधनं त्याच्या अभिनयातून दाखवून दिल. पण, हा व्यक्तिरेखेतील तो ‘केसांचा वीग’ नजरेला खटकतो; बाकी सर्व आलेबेल आहे. गीत, संगीत, लेखन आणि दिग्दर्शन आपापल्या जागी योग्य जमून आलं आहे. सिनेमा रंजक नक्कीच आहे. त्यामुळे त्याचा सुगंध, दरवळ अनुभवायला काहीच हरकत नाही.
सिनेमा : फुलराणी
निर्मिती : जाई जोशी, श्री.ए.राव, स्वानंद केळकर
दिग्दर्शक : विश्वास जोशी
लेखन : विश्वास जोशी व गुरु ठाकूर
कलाकार : प्रियदर्शनी इंदलकर, सुबोध भावे, विक्रम गोखले आणि सुशांत शेलार, मिलिंद शिंदे, गौरव घाटणेकर, अश्विनी कुलकर्णी, गौरव मालणकर, वैष्णवी आंधळे
छायांकन : केदार गायकवाड
संकलन : गुरु पाटील आणि महेश किल्लेकर
दर्जा : तीन स्टार