झी मराठी वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेने सगळेच रेकॉर्ड मोडले. या मालिकेतील अण्णा,शेवंता,सुषमा, पांडू,दत्ता भाऊ,माधव,अभिरामसह सर्व कलाकारांनी प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवले होते. या मालिकेची जादू अशी चालली की, या मालिकेचे आणखी दोन पर्व ‘रात्रीस खेळ चाले २’, ‘रात्रीस खेळ चाले ३’ घेवून झी मराठी चाहत्यांच्या भेटीस आले. या मालिकेचा कन्नडमध्ये रिमेकदेखील करण्यात आला. तर हिंदीमध्ये डबिंग करुन ही मालिका दाखवण्यात आली. आजही या मालिकेचे गूढ संगीत आणि शेवंताची जादू प्रेक्षकांवरुन उतरलेली नाही. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचे पहिले पर्व यशस्वी ठरल्यानंतर झी मराठीने ‘एक शो भूताचा’ असे ठरवूनच टाकलेले दिसते. आणि म्हणूनच ‘ती परत आलीये’ ही गूढ मालिका ते प्रेक्षकांच्या भेटीस घेवून आले. या मालिकेने देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधले. त्यानंतर आता पुन्हा एकदा झी मराठी ‘एक शो भूताचा’ आणत आहे.
‘चंद्रविलास’ या नव्या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. या मालिकेत २०० वर्ष जुन्या वाड्याची गोष्ट दाखवण्यात येत आहे. ‘चंद्रविलास’ हा २०० वर्ष जुना वाडा झपाटलेला आहे. गावातील या जुन्या वाड्यात अनंत महाजन आणि शर्वरी हे बाप-लेक जातात आणि तिथे त्यांना भास होवू लागतो तो एका अतृप्त आत्म्याचा. आणि मग हे बाप-लेक इथेच अडकतात. अनंत या आत्म्याच्या जाळ्यातून स्वत:ची आणि आपल्या मुलीची सुटका करुन घेण्यासाठी प्रयत्न करायला लागतो. तो या आत्म्याच्या तावडीतून सुटका करुन घेण्यात यशस्वी ठरणार का की दोघेजण कायमचे इथेच अडकणार?, हा आत्माचा नेमका कोणाचा आहे? त्याचे रहस्य काय? त्याला अनंत आणि शर्वरी पासून काय हवे आहे? जे घडत आहे त्या रहस्यमयी घटनांचे गूढ काय आहे? यासाठी प्रेक्षकांना ‘चंद्रविलास’ ही मालिका २७ मार्चपासून रात्री ११ वा. झी मराठीवर पहावी लागेल.
या मालिकेचं लेखन समीर गरुड आणि प्रसाद जोशी यांनी केले आहे. या मालिकेत अष्टपैलू अभिनेता वैभव मांगले नरहरपंत या अतृप्त आत्म्याची भूमिका साकारत आहे. त्याचा हा लूक थरकाप उडवणारा आहे. तर ‘भाई-व्यक्ती की वल्ली’, ‘वाय झेड’ सारख्या सिनेमांमधून प्रेक्षकांची मन जिंकणारा अभिनेता सागर देशमुख हा अनंत महाजनची भूमिका साकारत आहे. त्याने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा’ या मालिकेत साकारलेल्या भूमिकेचे कौतुक झाले होते. तर मालिकेत त्याच्या मुलीच्या म्हणजेच शर्वरीच्या भूमिकेत बालकलाकार आभा बोडस दिसणार हे. आभाला आपण ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या लोकप्रिय ऐतिहासिक मालिकेतून छोट्या येसूबाईंच्या भूमिकेत पाहिलं आहे. तर मग तुम्हाला या मालिकेचा प्रोमो कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि आमचा लेख आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर नक्की करा.