सत्तरच्या दशकामध्ये जेव्हा अमिताभ बच्चन यांचे ॲक्शन पट प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रियता होत होते आणि सूड नाट्याने भरलेले मारधाड चित्रपट यशस्वी होत होते; त्याच काळात काही कौटुंबिक भावनाप्रधान चित्रपट देखील रुपेरी पडद्यावर येत होते. अर्थात ॲक्शन सिनेमाच्या झंजावातात हे चित्रपट त्या काळात फारसे यशस्वी होत नव्हते. परंतु या सिनेमांमध्ये क्वालिटी कंटेंट नक्कीच असायचा. भारतीय सांस्कृतीक मूल्यांची जपणूक या चित्रपटातून होत असायची. उत्तम कथानक, सुरीले संगीत आणि कलावंतांचा उत्कट अभिनय हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य होतं. त्या काळात अशा सिनेमाला व्यावसायिक यश जरी मिळालं नसलं तरी हे सिनेमे आज देखील आपल्याला तितकेच महत्त्वपूर्ण वाटतात. (Yeh Mulaqat Ek Bahana Hai)
असाच एक चित्रपट १९७९ साली प्रदर्शित झाला होता. जितेंद्र, सुरक्षणा पंडित, बिंदिया गोस्वामी हि प्रमुख स्टार कास्ट असलेला हा चित्रपट दिग्दर्शक अनिल गांगुली यांनी दिग्दर्शित केला होता. चित्रपटाचं नाव होतं ‘खानदान’(Khandaan). एका कुटुंबाचा संघर्षपूर्ण लढा अतिशय भावस्पर्शी रीतीने चित्रपटात दाखवला होता.
नात्यातील धागेदोरे, त्यांची भावनिक गुंफण कुटुंबासाठी त्याग करणारी व्यक्तिमत्व असा एकूण या चित्रपटाचा फॉर्म्युला होता. हा चित्रपट नंतर तेलगु भाषेमध्ये देखील रीमेक करण्यात आला. हा सिनेमा YouTube वर उपलब्ध आहे. सत्तर च्या दशकातील कौटुंबिक मेलोड्रामा आवडणाऱ्या रसिकांनी तो नक्की पहावा.
आता या चित्रपटातील एका गाण्याविषयी. ‘हरवलेली गाणी’ या सदरामध्ये परफेक्ट बसावे असे या चित्रपटातील हे गीत आहे. लता मंगेशकर यांनी गायलेले हे गाणं नक्ष लायलपुरी यांनी लिहिलं होतं तर याला मधुर संगीत खयाम यांनी दिलं होतं. सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धापासून खय्याम यांच्या संगीताचा नवा अध्याय सुरू झाला होता. अतिशय गोड संगीत त्यांनी या काळात दिलं होतं. हे गाणं होतं ‘ये मुलाकात इक बहाना है…..’ बिंदिया गोस्वामी या अभिनेत्रीवर वर चित्रित झालं होतं. आजच्या पिढीला कदाचित बिंदिया गोस्वामी कोण हे पण ठाऊक नसेल पण या गाण्यांमध्ये ती खूप सुंदर दिसली आहे.
=====
हे देखील वाचा: याद तेरी आएगी, मुझको बड़ा सताएगी….
=====
प्रेमातील समर्पणाची भावना या गाण्यांमध्ये फार सुंदर रीतीने चितारली गेली आहे. वासनेचा लवलेश नसलेलं उत्कट प्रेम या गीतातून व्यक्त होते. गीतकार नक्ष लायलपुरी यांच्या बद्दल देखील थोडसं सांगितलं पाहिजे. अतिशय गुणी गीतकार पण त्याच्या प्रतिभेची दखल हिंदी सिनेमाने फारशी घेतली नाही. पन्नासच्या दशकापासून हिंदी सिनेमाच्या दुनियेत वावरत असलेले हे गीतकार फार कमी गाण्यासाठी आपल्याला आठवले जातात . लता मंगेशकर यांच्या स्वरातील हे गाणं ऐकायला अतिशय गोड आहे. हे गाणे ऐकल्यानंतर आपल्याला ते जुने हरवलेले दिवस नक्की आठवतील
ये मुलाक़ात एक बहाना है…..