सध्या पौराणिक मालिकांना प्रेक्षकांकडून बरीच पसंती मिळताना दिसत आहे. बाळूमामांच्या नावाने चांगभलं, जय जय स्वामी समर्थ, योग योगेश्वर जय शंकर, ज्ञानेश्वर माऊली, गाथा नवनाथांची या मालिका चाहते आवर्जून पाहतात. याआधीही झी मराठीवरील जय मल्हार, स्टार प्रवाहवरील विठु माऊली अशा अनेक पौराणिक मालिकांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले आहे. सन मराठीवरील ‘संत गजाजन शेगावीचे’ (Sant Gajanan Shegaviche)ही देखील यापैकी एक मालिका आहे. या मालिकेने अल्पावधीतच चाहत्यांची पसंती मिळवली.
नक्की वाचा- ‘सासू-सूने’ची जोडी नाही तर ‘सासरे-सूनबाई’ची जोडी ठरतेय हीट
या मालिकेत अभिनेता अमित फाटक (Amit Phatak) हा गजानन महाराजांची भूमिका साकारत होता. पण आता त्याने या मालिकेतून कायमची एक्झिट घेतली आहे. त्याने आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे.

या व्हिडीओमध्ये त्यांने म्हटले आहे की, ”मला सांगताना वाईट वाटत आहे की, माझा मालिकेतला प्रवास संपला आहे. पण मालिकेचा प्रवास असाच सुरु राहिल. त्यामुळे माझ्यावर जसे प्रेम केले, मालिकेवर आजवर जसे प्रेम करत आला आहात तसेच प्रेम मालिकेवर पुढेही करत राहा.माझ्या परिने मी भूमिकेला न्याय द्यायचा प्रयत्न केला पण माझ्या परिने काही चुकले असेल किंवा काही गोष्टी खटकल्या असतील तर मोठ्या मनाने मला माफ करा. पुन्हा एकदा मला गजानन महाराज (Gajanan Maharaj) म्हणून स्विकारत त्यासाठी मी तुमचा आभारी आणि सोबतच संपूर्ण टीमचा आभारी आहे. कारण त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्यामुळे मी तुमच्यापर्यंत पोहचू शकलो.” शेवटी अमितने मालिकेतले प्रसिद्ध झालेले काही शब्द जे प्रेक्षकांना ऐकायला खूप आवडतात ते बोलून दाखवले आहेत. यावर त्याच्या चाहत्यांनी ”अमित तूच या भूमिकेला योग्य न्याय देवू शकतो” असे म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.

अमितच्या एक्झिटनंतर आता मालिकेत गजानन महाराजांची भूमिका ही अभिनेते मनोज कोल्हटकर साकारणार आहेत. मनोज कोल्हटकर यांना याआधी आपण ‘फुलपाखरु’, ‘होणार सून मी ह्या घरची’ सारख्या असंख्य हिंदी मराठी-हिंदी मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये पाहिले आहे.