आयुष्यात काही आठवणी अशा असतात की त्या काळजात कायमच्या कोरल्या जातात. ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांनी साकारलेली ‘श्यामची आई’मधील श्याम ही अशीच एक अमीट छाप सोडणारी भूमिका. आजही ती भूमिका आणि त्यांची शिस्तबद्ध, शांत, संवेदनशील अभिनयशैली आठवते. नुकतंच माधव वझे यांचं निधन झालं आणि मराठी चित्रसृष्टीने एक सच्चा कलाकार गमावला.
प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘ऑल इज वेल’ या वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्सच्या आगामी मराठी चित्रपटात त्यांची एक विशेष भूमिका पाहायला मिळणार आहे. दुर्दैवाने, हाच त्यांचा शेवटचा चित्रपट ठरतोय. त्यामुळे ‘ऑल इज वेल’ केवळ एक मनोरंजनपर चित्रपट न राहता, माधव वझेंना वाहिलेली एक श्रद्धांजली ठरणार आहे.
या चित्रपटाच्या टीमसाठी त्यांच्यासोबत काम करणं हा एक अतिशय समृद्ध करणारा अनुभव होता. वझे सरांचे अनुभव, शांत स्वभाव, आणि मार्गदर्शनाने सेटवर एक वेगळी उर्जा असायची. त्यांच्यासोबतच्या आठवणी, चित्रीकरणाच्या गप्पा आणि मिळालेली शिकवण – हे सगळं कायम लक्षात राहील, असं चित्रपटाच्या टीमने सांगितलं. त्यांच्या सन्मानार्थ एक खास फोटोही टीमने सोशल मीडियावर शेअर केला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टिझरमध्येही माधव वझेंचा एक हळुवार झलक प्रेक्षकांना भावनिक करतो.
‘ऑल इज वेल’ चित्रपटात प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे, रोहित हळदीकर, सयाजी शिंदे, अभिजीत चव्हाण, नक्षत्रा मेढेकर, सायली फाटक, अजय जाधव, अमायरा गोस्वामी, दिशा काटकर यांसारखे प्रतिभावान कलाकार झळकणार आहेत. दिग्दर्शन योगेश जाधव यांचं असून, लेखन प्रियदर्शन जाधव यांनी केलं आहे. निर्माते अमोद मुचंडीकर आणि वाणी हालप्पनवर आहेत. सहनिर्माते मल्लेश सोमनाथ मरुचे, विनायक पट्टणशेट्टी असून कार्यकारी निर्माते संजय ठुबे आहेत.
चित्रपटाचं संगीत चिनार-महेश आणि अर्जुन जन्या यांचं असून, गीतकार मंदार चोळकर यांचे शब्द आहेत. छायांकन मयुरेश जोशी, संकलन अथश्री ठुबे आणि नृत्यदिग्दर्शन राजेश बिडवे यांचं आहे.
२७ जूनला प्रदर्शित होणारा ‘ऑल इज वेल’ हा चित्रपट माधव वझेंच्या स्मृतीला वंदन करत, त्यांची अखेरची कलाकृती म्हणून सदैव लक्षात राहील.