मुकाबला मुकाबला लैला ओहो लैला…हे गाणे वाजल्यानंतर आपोआप सगळ्यांचे पाय थिरकायला लागतात आणि डोळ्यांसमोर दिसतो प्रभुदेवाचा वेड लावणारा डान्स. या गाण्यामुळे प्रभुदेवा रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचले आणि ‘इंडियन मायकेल जॅक्सन’ म्हणून ओळखले जावू लागले. आज प्रभूदेवा यांचा ५०वा वाढदिवस. गेले 35 वर्ष या प्रभुदेवाने कोरिओग्राफर ते अभिनेता,दिग्दर्शक असा केलेला प्रवास सोपा नव्हता. प्रभुदेवा यांचे वडिल मुगुर सुंदर हे कोरिओग्राफर होते. त्यांच्या वडिलांच्या डान्स स्टेप्सवर रजनीकांतपासून अनेक दाक्षिणात्य सुपरस्टार थिरकले होते. पण असे असूनही प्रभुदेवाचा प्रवास सोपा झाला नाही. प्रभुदेवा यांची आई गृहीणी असली तरी त्यादेखील उत्तम डान्सर होत्या. त्यामुळेच नृत्य हे प्रभुदेवाच्या रक्तातच होतं. अकरावी नापास झाल्यावर त्यांच्या वडिलांकडून त्यांना ओरडा मिळाला नाही. उलट आपल्याला हवे ते करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. सुरुवातीला ते सिनेमात बँकग्राऊंड डान्सर म्हणून काम करायला लागले. १९८६ ला ‘मौना रंगम’मध्ये ते बासुरी वाजवणाऱ्या मुलाच्या भूमिकेत दिसले. आणि मग त्यांनी अनेक सिनेमांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले. १८८९ला त्यांना पहिल्यांदा कमल हसनच्या ‘वेतरी वीजा’ या सिनेमामध्ये कोरिओग्राफी करण्याची संधी मिळाली. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांनी १०० हून अधिक दाक्षिणात्य, हिंदी सिनेमातील गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे. त्यानंतर प्रभुदेवाने आपला मोर्चा अभिनयाकडे वळवला. १९९४ ला त्यांनी ‘इंदू’ हा पहिला सिनेमा केला. ज्यामध्ये ते मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत झळकले. १९९९ ला त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी मायकेल जॅक्शनला दिलेल्या ट्रिब्युट कॉन्सर्टमध्ये सहभाग घेतला. जे कॉन्सर्ट जर्मनीच्या म्युनिकमध्ये ठेवण्यात आले होते. याचदरम्यान प्रभुदेवाने सिंगापूरमध्ये डान्स अकादमी सुरु केली.
‘कडालन’ सिनेमा ज्याचा हिंदी रिमेक ‘हमसे है मुकाबला’ या रोमॅण्टिक सिनेमाने प्रभूदेवाला यशाच्या शिखरावर पोहचवले. या सिनेमातील ‘मुकाबला’ आणि ‘उर्वशी’ या गाण्याने अख्ख्या देशाला वेड लावले. या गाण्याला चार नॅशनल अवॉर्ड मिळाले. हा सिनेमा विविध भाषांमध्ये डब करण्यात आला. या यशानंतर अभिनेता म्हणून त्यांनी काही चित्रपट केले. यातील ‘मिन्सारा कनाऊ’मध्ये ते काजोल आणि अरविंद स्वामीसोबत झळकले. त्यांच्या सिनेमातील अभिनयासोबतच्या डान्सिंग स्टाईलमुळे अशा प्रकारच्या सिनेमांची लाटच आली. यानंतर प्रभूदेवा हिंदी सिनेमांकडे वळले. ‘अग्नी वर्षा’ हा त्यांचा पहिला हिंदी सिनेमा. पण यानंतर अभिनेता म्हणून त्यांचे चित्रपट फारसे कमाल दाखवू शकले नाहीत. पण कोरिओग्राफर म्हणून त्याचं नाणं खणाणतं होतं. २००४ मध्ये ऋतिक रोशनच्या ‘लक्ष्य’ सिनेमाने त्यांना पुन्हा एकदा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. आजवर त्यांना दाक्षिणात्य सिनेमातील प्रसिद्ध अशा अनेक नंदी पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. याशिवाय भारत सरकारने त्यांना पद्मश्री देवूनही गौरवले आहे. यानंतर प्रभुदेवाने आपला मोर्चा दिग्दर्शन क्षेत्राकडे वळवला. ‘वॉन्टेड’, ‘पोक्किरी’, ‘शंकर दादा’, ‘राडउी राठौर’, ‘सिंह इज ब्लिंग’, ‘दबंग 3’ आणि ‘राधे’ हे त्यांनी दिग्दर्शित केलेल चित्रपट सुपरहीट ठरले. ‘वॉन्टेड’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला हिंदी सिनेमा.
गाण्याच्या शूटिंग दरम्यान लकवा
२०१६ मध्ये ‘तुतक तुतक तूतिया’ या गाण्याच्या शूटिंग दरम्यान त्यांना लकवा मारला. एक स्टेप करताना अचानक पॅरालाईज झाले. काही समजायच्या आतच ते जमिनीवर कोसळले. पण यावर मात करत काही दिवसांनी प्रभुदेवा पुन्हा डान्सिंग सेटवर पोहचले.
मुस्लिम तरुणीशी लग्न,कॅन्सरमुळे मुलाला गमावले आणि नयनतारासोबतचे अफेअर
प्रभुदेवा यांचे व्ययक्तिक आयुष्य दुख:द आणि वादग्रस्त होते. करिअरच्या सुरुवातीच्या ते डान्सर रामलतसोबत लिव्ह इनमध्ये राहत होते. रामलत या मुस्लिम होत्या. १९९५ ला त्यांनी लग्न केले आणि हिंदु धर्म स्विकारत लता असा नावात बदल केला. यानंतर या दोघांना तीन मुले झालीये. यातील एका मुलाचा २००८मध्ये कॅन्सरमुळे मृत्यू झाला.
याचदरम्यान प्रभुदेवाचे नाव सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारासोबत जोडले जावू लागले. त्यामुळे घरात कलह निर्माण होवू लागले. हा कलह इतका वाढला की लता यांनी फॅमिली कोर्टात दाद मागितली. त्यानंतर २०११ या दोघांचा घटस्फोट झाला. प्रभुदेवा आणि नयनतारा यांचे देखील ब्रेकअप झाले.
1 comment
[…] हे देखील वाचा: अकरावी नापास ते इंडियन मायकेल जॅक्सन, … […]