रणबीर कपूर पुण्याजवळ जमीन खरेदी केल्याची मोठी माहिती समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेत्याने पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात सुमारे 25.7 एकर जमीन 16.42 कोटी रुपयांना विकत घेतली आहे. मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांतून या व्यवहाराची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रणबीर कपूरने एकाच व्यवहारात चार शेजारील जमिनीचे तुकडे विकत घेतले. या व्यवहाराची नोंदणी 30 एप्रिल 2026 रोजी करण्यात आली.
पहिल्या भूखंडाचे क्षेत्रफळ 21,400 चौरस मीटर असून त्यासाठी 3.31 कोटी रुपये मोजण्यात आले. दुसरा भूखंड 29,900 चौरस मीटरचा असून त्याची किंमत 4.62 कोटी रुपये आहे. तिसरा आणि सर्वात मोठा भूखंड 43,800 चौरस मीटरचा असून तो 7.07 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आला. चौथ्या भूखंडाचे क्षेत्रफळ 8,900 चौरस मीटर असून त्यासाठी 1.39 कोटी रुपये देण्यात आले.
या चारही भूखंडांचे एकत्रित क्षेत्रफळ 1,04,000 चौरस मीटर, म्हणजेच सुमारे 25.7 एकर इतके आहे. या व्यवहारासाठी एकूण 16.42 कोटी रुपयांची रक्कम अदा करण्यात आली असून सुमारे 82.13 लाख रुपयांचा मुद्रांक शुल्कही भरल्याची माहिती नोंदणी कागदपत्रांत नमूद आहे.
यापूर्वी मे 2026 मध्ये रणबीर कपूरने अयोध्येतील ‘द सरयू’ (The Sarayu) प्रकल्पातही जमीन खरेदी केली होती. सुमारे 2,134 चौरस फूट क्षेत्रफळाच्या या भूखंडासाठी जवळपास 3.31 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या प्रकल्पात क्लबहाऊस, 35 हून अधिक लाइफस्टाइल सुविधा आणि ‘द लीला’ समूहाच्या सहकार्याने उभारण्यात येणारे पाच एकरांचे शाकाहारी लक्झरी हॉटेल प्रस्तावित आहे.
कामाच्या आघाडीवर रणबीर कपूर अखेर 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘Animal’ चित्रपटात झळकला होता. सध्या तो नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण: पार्ट 1’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात तो प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत दिसणार असून साई पल्लवी, यश, सनी देओल, लारा दत्ता आणि रवी दुबे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट दिवाळी 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय रणबीर संजय लीला भन्साळी यांच्या ‘Love & War’ या चित्रपटातही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
======
हे देखील वाचा : Alia Bhatt Tumbbad 2: आलिया भट्टची ‘तुंबाड 2’मध्ये अधिकृत एंट्री. सोहम शाहने घोषणा केली.
======