मराठी साहित्यविश्वातील अजरामर नाव म्हणजे रत्नाकर मतकरी. साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता, चित्रकार अशा अनेक भूमिकांमधून त्यांनी त्यांची छाप प्रेक्षकांवर सोडली. मतकरी म्हटले की, डोळ्यासमोर येते ते त्यांचे विपुल साहित्य. त्यांनी नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक साहित्य अशा विविध प्रकारातून मोठ्या स्वरूपात लिखाण केले. त्यांच्या लिखाणावर आधारित अनेक नाटकं, सिनेमे आपण पाहिले आहेत.
नुकतीच रत्नाकर मतकरी यांची जयंती झाली. याच दिनाचे औचित्य साधून एक घोषणा करण्यात आली. मतकरी यांच्या लिखाणाच्या समुद्रातील एक अतिशय उत्कृष्ट कथा म्हणजे ‘कामगिरी’. वास्तव आणि अवास्तव यांच्यातील संघर्ष आणि त्यातून एका व्यक्तीची होणारी घालमेल याचा जिवंत देखावा कामगिरी या कथेत मांडण्यात आला आहे. याच कथेवर आधारित ‘ २१७ पद्मिनी धाम ‘ हे व्यावसायिक नाटक आता रंगभूमीवर दाखल होत आहे. गूढ आणि रहस्य याच सोबत भयाची एक गोष्ट हे नाटक मांडत आहे. मागच्यावर्षी ‘२१७ पद्मिनी धाम’ ही एकांकिका तुफान गाजली होती. आता यावर आधारित नाटक लवकरच रंगमंचावर येत आहे.
उत्तम साहित्याची रचना करणाऱ्या या लेखकाची अनेक पुस्तकं गाजली. यामध्ये त्यांच्या गूढकथांचा एक स्वतंत्र चाहतावर्ग होता. मतकरी यांनी जवळपास दिडशेपेक्षा जास्त गूढकथांचं लेखन केलं आहे. त्यासोबतच त्यांच्या काही कादंबऱ्या, कथासंग्रहदेखील गाजले. रत्नाकर मतकरी यांनी जवळपास ३२ नाटकं, २३ कथासंग्रह, ६ निबंध संग्रह, १६ एकांकिका, १२ बालकुमार नाटकं आणि ३ कादंबर्या असे विविध कलाकृतींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लिखाण केलं आहे. त्यांच्या अनेक कलाकृती आज पर्यंत रंगभूमी आणि इतर माध्यमांत जिवंत आहेत. आता यात ‘कामगिरी’ची देखील भर पडणार आहे.
या नाटकाचे दिग्दर्शक संकेत आणि नचिकेत यांनी केले असून, करण भोगलेने नाटकाच्या निर्मितीची जबाबदारी घेतली. या नाटकाच्या निमित्ताने मिलिंद शिंदे हे पुन्हा एकदा रंगभूमीवर दिसणार आहे. या नाटकात ‘पद्मिनी’ची भूमिका अभिनेत्री अमृता पवार साकारत असून, मध्यवर्ती भूमिका अभिनेता ऋतुराज फडके साकारत आहे.