‘बहरला हा मधुमास नवा’ हे ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shahir) सिनेमातील गाणे सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. अंकुश चौधरीची मुख्य भूमिका असलेला या सिनेमाची पहिली झलक समोर आली असून चाहत्यांना या सिनेमाची उस्तुकता आहे. या सिनेमातून अभिनेत्री शुभांगी सदावर्ते (Shubhangi Sadavarte) ही मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे.अभिनेत्री शुभांगी सदावर्ते या सिनेमात शाहीर साबळेंच्या आई ‘लक्ष्मीबाई गणपतराव साबळे’ यांच्या भूमिकेत झळकणार आहे. शुभांगीचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. सिनेमातील ‘जाऊ नको किस्ना’ हे गाणं प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात आपल्याला शुभांगीची पहिली झलक पहायला मिळत आहे. गाण्यात ती गरोदर असलेली पहायला मिळत आहे. शुभांगीला आपण ‘नवे लक्ष्य’ या मालिकेसाठी ओळखतो. या मालिकेत तिने महिला पोलीस अधिकारी ‘मोक्षदा मोहिते’ची भूमिका साकारली होती. याशिवाय तिने ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक देखील गाजले होते. या नाटकात तिने ‘आवली’ हे पात्र साकारले होते.
‘महाराष्ट्र शाहीर’ हा सिनेमा शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित आहे. हा सिनेमा २८ एप्रिलला आपल्या भेटीस येत आहे. शाहीर साबळे यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठे योगदान होते. लोककलेच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्र आणि राज्याभिमान जागविण्याचे काम केले. त्यांचे जय जय महाराष्ट्र माझा हे गाणे आजही मराठी माणसाच्या ओठांवर असते. याशिवाय त्यांनी ‘अरे किश्ना अरे कान्हा’, ‘विंचु चावला’, ‘आम्ही गोंधळी गोंधळी’, भारुडं, ‘जेजुरीच्या खंडेराया’, ‘रामा हो रामा’, ‘ही नटरंगी नार’ ही आजही श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.
नक्की वाचा: ‘संत गजाजन शेगावीचे’ मालिकेतून या अभिनेत्याची एक्झिट
या सिनेमाचे दिग्दर्शन शाहीर साबळे यांचे नातू आणि प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केले असून या सिनेमातून अंकुश चौधरी-केदार शिंदे ही जोडी पुन्हा भेटीस येत असल्याने चाहत्यांची उस्तुकता शिगेला पोहचली आहे. सिनेमात केदार शिंदेंची लेक सना शिंदे ही शाहीर साबळेंची पत्नी भानुमतीची भूमिका साकारत आहे. सिनेमाच्या कथालेखनाचे काम शाहिरांची लेक वसुंधरा साबळे यांनी केले आहे. या सिनेमाला अजय-अतुल यांचे संगीत लाभले आहे. सिनेमातील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत असून बरला हा मधुमास नवा हे गाणे तर खूप लोकप्रिय झाले आहे. या गाण्यात सना शिंदे दिसत आहे. या गाण्यावर अनेक कलाकार थिरकताना दिसत आहेत.