मराठी रंगभूमीला आधुनिक दृष्टी, नवी भाषा आणि जागतिक ओळख देणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शिका, अभिनेत्री आणि रंगकर्मी विजया मेहता यांचं मंगळवारी निधन झालं. त्या ९२ वर्षांच्या होत्या. मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी नाट्यविश्वावर शोककळा पसरली आहे.
४ नोव्हेंबर १९३४ रोजी बडोदा येथे जन्मलेल्या विजया मेहता यांना मराठी रंगभूमीवर प्रेमाने ‘बाई’ म्हणून ओळखलं जायचं. त्यांच्या दिग्दर्शनातील शिस्त, कलात्मक दृष्टी आणि कलाकारांकडून उत्कृष्ट अभिनय करून घेण्याची हातोटी यामुळे त्यांनी अनेक पिढ्यांतील कलाकार घडवले. विक्रम गोखले, नाना पाटेकर, नीना कुलकर्णी यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा होता.
रंगभूमीला दिली नवी दिशा
पूर्वाश्रमीच्या विजया जयवंत यांनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्राची पदवी घेतल्यानंतर दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये नाट्यशिक्षण घेतलं. त्या ज्येष्ठ नाट्यगुरू इब्राहिम अल्काझी यांच्या पट्टशिष्या होत्या.
पुढे त्यांनी ‘रंगायन’ या महत्त्वाच्या नाट्यचळवळीची स्थापना केली. या संस्थेत डॉ. श्रीराम लागू, विजय तेंडुलकर यांच्यासह अनेक मान्यवर कलाकार आणि साहित्यिक कार्यरत होते. आधुनिक मराठी रंगभूमीच्या जडणघडणीत ‘रंगायन’ने मोलाचं योगदान दिलं.
अभिनेत्री म्हणूनही उमटवला ठसा
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये जाण्यापूर्वीच विजया मेहता यांनी मुंबई मराठी साहित्य संघातून अभिनयाला सुरुवात केली होती. १९५१ पासून त्या विविध नाटकांमध्ये सक्रिय होत्या. शेक्सपिअरच्या ऑथेल्लोच्या मराठी रूपांतर ‘झुंजारराव’ मधील कमळजा या भूमिकेमुळे त्यांना विशेष ओळख मिळाली.
यानंतर त्यांनी संशयकल्लोळ, तुझे आहे तुझपाशी, सुंदर मी होणार अशा अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये अभिनय केला. १९६०च्या दशकापर्यंत त्या मराठी रंगभूमीवरील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक बनल्या होत्या.
दिग्दर्शनातून घडवली अनेक अजरामर नाटकं
विजया मेहता यांनी आशयघन आणि प्रयोगशील नाटकांच्या दिग्दर्शनातून वेगळी ओळख निर्माण केली. मला उत्तर हवंय, एका घरात होती, संध्याछाया, जास्वंदी, अखेरचा सवाल, हमीदाबाईची कोठी, बॅरिस्टर, सावित्री, पुरुष, वाडा चिरेबंदी यांसारख्या अनेक गाजलेल्या नाटकांचं त्यांनी दिग्दर्शन केलं.
त्यांनी इंडो-जर्मन थिएटर प्रकल्पांतर्गत मुद्राराक्षस, शाकुंतल, हयवदन आणि नागमंडल ही नाटकं जर्मन रंगभूमीवर सादर केली. जर्मन दिग्दर्शक फ्रिट्स बेनव्हिट्झ यांच्यासोबत केलेल्या या कामामुळे भारतीय आणि पाश्चात्त्य रंगसंस्कृतीचा सुंदर संगम घडला.
चित्रपट आणि दूरदर्शनमध्येही उल्लेखनीय योगदान
रंगभूमीपुरतं मर्यादित न राहता विजया मेहता यांनी चित्रपट, टेलिफिल्म आणि दूरदर्शन क्षेत्रातही महत्त्वाचं काम केलं. हयवदन, शाकुंतल, हवेली बुलंद थी, हमीदाबाई की कोठी या टेलिफिल्म्सचं त्यांनी दिग्दर्शन केलं.
तसंच स्मृतीचित्रे, रावसाहेब, पेस्तनजी या चित्रपटांशी त्यांचा सहभाग होता. गोविंद निहलानी यांच्या ‘पार्टी’ आणि अमोल पालेकर यांच्या ‘क्वेस्ट’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.
त्यांचं आत्मचरित्र ‘झिम्मा : आठवणींचा गोफ’ हे मराठी साहित्यातील महत्त्वाचं पुस्तक मानलं जातं.
वैयक्तिक आयुष्य
विजया मेहता यांचा पहिला विवाह दुर्गा खोटे यांचे पुत्र हरीन खोटे यांच्याशी झाला होता. त्यांना रवी आणि देवेन ही दोन मुलं आहेत. हरीन खोटे यांच्या निधनानंतर त्यांनी फारोख मेहता यांच्याशी पुनर्विवाह केला. त्यांना अनाहिता ही मुलगी आहे.
अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरव
रंगभूमी आणि कलाक्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी विजया मेहता यांना पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार, कालिदास सन्मान, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, गो. ब. देवल पुरस्कार, विष्णुदास भावे सुवर्णपदक, मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा जीवन गौरव पुरस्कार, पु. ल. देशपांडे पुरस्कार यांसह अनेक प्रतिष्ठेच्या सन्मानांनी गौरवण्यात आलं.
मराठी रंगभूमीला आधुनिक विचार, शिस्त, प्रयोगशीलता आणि जागतिक दर्जा देणाऱ्या विजया मेहता यांच्या निधनाने भारतीय नाट्यविश्वातील एका युगाचा अंत झाला आहे.