स्टार प्रवाह (Star Pravah) वरील ‘रंग माझा वेगळा’ (Rang Maza Vegla) या मालिकेनं एक हजार भागांचा टप्पा गाठला आहे. या निमित्ताने संपूर्ण टीमने सेटवर केक कापत सेलिब्रेशन केले. या मालिकेत दर आठवड्याला नवनवीन ट्विस्ट पहायला मिळतात. मालिकेने १४ वर्षांचा लीप घेतल्यानंतर मालिकेत कार्तिक, आर्यन, कार्तिकी, श्वेता हे दीपाच्या विरोधात दाखवण्यात आले आहेत. त्यात आता आणखी एका खलनायिकेची भर पडणार आहे. ही खलनायिका आहे आयेशा. दीपा आणि कार्तिकच्या आयुष्यात लुडबुड करणाऱ्या आयेशा पुन्हा एकदा नवं वादळ घेवून या दोघांच्या आयुष्यात परत येत आहे. मालिकेत अभिनेत्री विदिशा म्हसकरनं आयेशा हे पात्र साकारले आहे.

मालिकेमध्ये कार्तिक फोनवर बोलत रस्ता ओलांडत असताना, आयेशा गाडीतून त्याला पाहते. कार्तिक, कार्तिक ओरडत ती त्याच्या मागे जाते. तेवढ्यात तिचा भाचा आर्यन तिथे येतो आणि तो तिला थांबवतो. आयेशाला त्याला तू मला कार्तिककडे जावू दे असे सांगते. पण आर्यन तिथे कार्तिक अंकल नाही आहेत अशी तिची समजूत घालत तिला गाडीत परत बसवतो. आणि तुझी अशी अवस्था करणाऱ्या दिपा आणि कार्तिक इनामदारला आता या आर्यनपासून कोणीही वाचवू शकणार नाही असे मनात म्हणताना दिसतो. आर्यन हा कार्तिकीचा मित्र आहे. पण याठिकाणी आर्यन हा आयेशाच्या बहिणीचा मुलगा असल्याचे देखील समोर आले आहे.

तर आयेशाचा लूक हा बदललेला दिसत आहे. आयेशाच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत आहे. आता आयेशाने दुसऱ्या कोणाशी लग्न केले आहे का ?, तिचे मानसिंक संतुलन बिघडले असल्यामुळे ती कार्तिकलाच आपला नवरा मानत आहे, हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल. त्याचप्रमाणे मावशीवर झालेल्या अन्यायाचा बदला आर्यन कसा घेणार याची देखी प्रेक्षकांना उस्तुकता असेल.