Home » श्रीकांथ-शिक्षीत समाजाला डोळस करणारा चित्रपट

श्रीकांथ-शिक्षीत समाजाला डोळस करणारा चित्रपट

by सई बने
Rajkummar Rao-Srikanth

अंध व्यक्ती काय करु शकतात. हे नाही, तर मनात आणलं तर काय करु शकत नाहीत… हे बघण्यासाठी १० मे रोजी प्रदर्शित होणा-या श्रीकांथ हा चित्रपट बघायलाच हवा. तुषार हिरानंदानी दिग्दर्शित या चित्रपटात राजकुमार रावचा अप्रतिम अभिनय आहे. जगदीप सिद्धू लिखीत श्रीकांथचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमधूनच या चित्रपटाच्या गुणवत्तेची कल्पना येते. (Srikanth Movie Trailer)

उद्योगपती श्रीकांथ बोला यांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट प्रत्येक डोळस मुलांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. शिक्षणाचा अधिकार सर्वांना समान असला पाहिजे, त्यात डोळस आणि अंध असा भेद नको. मात्र हा भेद सहन करत अंध असलेल्या श्रीकांथ बोला यांनी भारतीय शिक्षणक्षेत्रात क्रांती केली आहे. भारतातील प्रतिष्ठित विद्यापीठांनी नकार दिल्यावर अमेरिकेतील प्रतिष्ठित विद्यापीठात त्यांनी शिक्षण पूर्ण केले. पण भारतातून नकार मिळाला म्हणून आपल्या मातृभूमीला सोडण्यापेक्षा आपल्यासारख्या अंध आणि अपंगांना त्यांनी रोजगार मिळवून दिला. उद्योगपती श्रीकांथ बोला यांच्या जीवनावरील हा चित्रपट राजकुमार रावच्या अभिनयानं अधिक बोलका झाला आहे. (Srikanth Movie Rajkummar Rao)

हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये काही निवडक चित्रपट येतात, जे आपण कुटुंबासह पाहू शकतो. त्यातील २०२४ मध्ये सर्वोत्तम ठरेल असा चित्रपट १० मे रोजी प्रदर्शित होत आहे. श्रीकांथ बोला या उद्योगपतीचा प्रवास दाखवण्यात आला आहे. श्रीकांथ हे जन्मापासून अंध आहेत. मात्र सरस्वतीचा आशीर्वाद मिळालेल्या श्रीकांथ यांना शालेय जीवनात अनेक अडचणी आल्या. या सर्व अडचणी पार करत यशस्वी उद्योजक अशी त्यांची ओळख आहे. तो सगळा प्रवास या श्रीकांथमध्ये दाखवण्यात आला आहे. श्रीकांथ चित्रपटाचा ट्रेलर ९ एप्रिल रोजी युट्यूबवर लॉंच झाला. आणि राजकुमार राव सोबत ख-या श्रीकांथ बाला यांची चर्चा सुरु झाली आहे. (Srikanth Bolla)

आंध्र प्रदेशातील शेतकरी कुटुंबात श्रीकांथ बाला यांचा जन्म झाला. त्यांचे आई-वडील अशिक्षीत आणि शेतकरी. पण त्यांनी श्रीकांथला शिकण्यासाठी नेहमी प्रोत्साहन दिले. अंध असलेल्या श्रीकांथला शाळेत घातल्यावर त्यांना अनेकांचा विरोध सहन करावा लागला. त्यांना श्रीकांथला मारण्याचाही सल्ला मिळाला. कारण अंध असलेला हा मुलगा कशाचाही उपयोगी पडणार नाही, असा समज होता. शिवाय त्याच्या अभ्यासावर आणि आजारावर खर्च झालेला पैसाही वाया जाणार असे त्यांच्या आई वडिलांना सांगण्यात येत होते. पण सुदैवानं या सर्वांकडे दुर्लक्ष करीत श्रीकांथ यांच्या आई वडिलांनी त्यांचे शिक्षण केले. अंध असले तरी श्रीकांथ हुशार होते. त्यांच्या शाळेत माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम आले होते. त्यांच्याशी झालेला संवाद हा श्रीकांथ यांच्या आय़ुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला.

शाळेत असतांना श्रीकांथ यांचे विज्ञान आणि गणित हे आवडते विषय होते. १० वी झाल्यावर कुठली शाखा निवडायची हा प्रश्न होता. त्यांना कला शाखेत जाण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र श्रीकांथ विज्ञान म्हणजेच सायन्स घेण्यासाठी अडून राहिले. बारावी सायन्समध्ये करुन नंतर अभियांत्रिकी शिक्षण घेण्याचा त्यांचा मानस होता. मात्र ते ज्या शाळेत शिकत होत, त्या शाळेने ११ वीतील या अंध विद्यार्थ्याला सायन्स देण्यास नकार दिला. श्रीकांथ यांनी अन्य महाविद्यालयातही प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न केले. पण त्यांच्य अंधपणावर बोट ठेवत त्यांना प्रवेश नाकारला. तेव्हा श्रीकांथ यांनी या निर्णयाविरोधात आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात धाव घेतली. प्रस्थापित शिक्षण पद्धतीवर केलेला हा खटला गाजला. यात श्रीकांथ यांचा नुसता विजयच झाला नाही तर आंध्र प्रदेशचा शिक्षण कायदाही बदलण्यात आला. श्रीकांथ यांच्या या न्यायालयीन लढाईनंतर आता सर्व अंध विद्यार्थ्यांना विज्ञानाचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. ही लढाई थोडीथोडकी नाही तर ६ महिने चालली. त्यानंतर श्रीकांथ यांनी ११ वीचा अभ्यास सुरु केला. त्यांना १२वी मध्ये ९८% गुण मिळाले. आणि ज्या शाळेने त्यांना सुरुवातीला प्रवेश द्यायला नकार दिला होता, तिथले ते टॉपर झाले. मात्र या यशानंतरही त्यांना भारतात प्रतिष्ठित मानण्यात येणा-या आयआयटीमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. निराश न होता, श्रीकांथ यांनी अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच एमआयटीमध्ये अर्ज केला. हा अर्ज स्विकारण्यात आला आणि मॅनेजमेंट सायन्स शिकणारा ते पहिले आंतरराष्ट्रीय अंध विद्यार्थी ठरले. एमआयटीमधून पदवी मिळाल्यावर त्यांच्यापुढे जगभरातील सर्वोत्तम कंपनीच्या गलेलठ्ठ पगाराच्या ऑफर होत्या. पण श्रीकांथ यांनी या सर्व ऑफर बाजुला ठेवत भारतात परत येण्याचा निर्णय घेतला.

२०१२ मध्ये श्रीकांथ बोला यांनी बोलंट इंडस्ट्रीज सुरू केली. ए पी जे अब्दुल कलाम, उद्योगपती रतन टाटा यासारख्या मान्यवरांनी या कंपनीत गुंतवणूक केली आहे. पॅकेजिंग सोल्यूशन्स देणा-या या कंपनीत ६०० कामगार असून यातील बहुतांश कर्मचारी अपंग आहेत.

श्रीकांथ यांचा हा सर्व प्रवास सांगण्यासाठी जरी सोप्पा असला तरी त्यामागची वेदना मोठी आहे. राजकुमार राव यांनी ही वेदना आणि त्यानंतर मिळेलेले उज्वल यश हे आपल्या अभिनयात उतरवले आहे. राजकुमार रावला ज्योतिका, अलाया एफ आणि शरद केळकर यांच्या अभिनयाची जोड मिळाली आहे. १० मे रोजी मोठ्या पडद्यावर येणारा श्रीकांत त्यामुळेच प्रत्येकाने बघावा असाच आहे.

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy