‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेतील युवराज ख-या आयुष्यात बाप झाला. युवराज म्हणजेच अभिनेता विजय आंदळकरने, अभिनेत्री रुपाली झनकरसोबत २०२१मध्ये लग्नगाठ बांधली आहे. त्यानंतर ११ जानेवारी २०२३ला रुपालीने एका गोड मुलीला जन्म दिला. दोन महिन्यानंतर आता बाळाचं बारसं करण्यात आले आहे. या दोघांनी बाळाचे नाव ठेवले आहे ‘मायरा’. ‘मायरा’ या शब्दाचा अर्थ आहे प्रिय, प्रेमळ, गोड, प्रशंसनीय. बाळाचं नाव जरी विजयने चाहत्यांना दाखवलं असलं तरी बाळाचा चेहरा मात्र त्याने दाखवलेला नाही. बारशाला रुपालीने हिरव्या आणि निळ्या रंगाची साडी परिधान केली होती. तर विजयने निळ्या रंगाचा पारंपरिक कुर्ता घातला होता. फोटोत बाळाला न्याह्याळतानाचा दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. या फोटोला रुपालीने कॅप्शन दिली आहे की, ‘बारसं…मायरा…आई-बाबा होवून दोन महिने झाले.’ या सोबतच बारशाचा व्हिडीओ देखील रुपाली आणि विजयने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या दोघांना त्यांच्या सहकलाकारांनी,मित्रमंडळींनी आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.

विजयची बायको रुपाली ही देखील अभिनेत्री आहे हे आपण जाणतोच. विजय आणि रुपालीचे लव्ह मॅरेज आहे. या दोघांची पहिली भेट झी मराठी वाहिनीवरील ‘लग्नाची वाईफ वेडिंगची बायको’ या मालिकेच्या सेटवर झाली. या मालिकेत रुपाली विजयच्या बायको काजलच्या भूमिकेत झळकली होती. याच दरम्यान या दोघांची मैत्री झाली मग हळूहळू प्रेम. या दोघांनी एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर या दोघांनी लग्नाचा निर्णय घेत चाहत्यांना सुखद धक्काच दिला. या दोघांनी २१ एप्रिल २०२१च्या लॉकडाऊनमध्ये साखरपुडा उरकला आणि मग डिसेंबर २०२१ मध्ये लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर विजय ‘पिकिंचा विजय असो’ या मालिकेत झळकत आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतून तो युवराज नावाने घराघरात लोकप्रिय झाला. पण रुपालीने मात्र तिच्या करिअरमधून ब्रेक घेत आपल्या संसाराला वेळ दिला. विजयने मालिकेच्या शूटिंगसोबतच पत्नी रुपालीसोबत गरोदरपणात क्वॉलिटी टाईम घालवला.

या दोघांनी गरोदरपणात अनेक फोटोशूट केले. डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात रुपाली हिरव्या आणि गुलाबी रंगाची साडी, नाकात नथ, फुलाचे दागिणे, केसांमध्ये माळलेला गजरा, हिरव्या बांगड्या अशा लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिचा आणि विजयचा धनुष्यबाण घेतलेला फोटो तर खूपच गोड होता.
तर मग या जोडीला तुम्ही कमेंटमध्ये शुभेच्छा द्या आणि आमचा लेख आवडला असेल तर नक्की लाईक करा.