मनोरंजनविश्वात पूर्वी काम मिळण्याचा एकच निकष होता आणि तो म्हणजे सौंदर्य. उत्तम दिसत असाल तर नक्कीच तुम्हाला या एका गोष्टीवर या क्षेत्रात काम मिळणार हे नक्की असायचे. मात्र काळ आणि वेळ बदलली आणि काम मिळण्याचे निकषही बदलले. आता जर आपण हिंदी सिनेसृष्टीमधे पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, अनेक मोठे निर्माते, दिग्दर्शक हे कलाकारांना त्यांच्या दिसण्यावरून नाही तर त्यांच्यात असलेल्या प्रतिभेवरून त्यांना चित्रपटासाठी घेतात.
आताच्या घडीला बॉलिवूडमधील अतिशय प्रतिभावान, हुशार आणि प्रभावी अभिनेता म्हणून नवाजुद्दीन सिद्धीकीला ओळखले जाते. लहान लहान भूमिकांमधून तो पुढे आला आणि प्रगल्भ अभिनेता अशी स्वतःची ओळख त्याने निर्माण केली. आज तो हिंदी सिनेजगतात यशस्वी आणि मोठ्या अभिनेत्यांच्या यादीत स्थान मिळवताना दिसतो. सहाय्यक भूमिकांमध्ये छाप पडणाऱ्या नवाजने मुख्य भूमिकांमध्ये देखील स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.
A post shared by Nawazuddin Siddiqui (@nawazuddin._siddiqui)
अशा या नवाजच्या नवीन सिनेमाची नुकतीच दणक्यात घोषणा करण्यात आली आहे. प्राप्त होणाऱ्या माहितीनुसार नवाजचा हा सिनेमा एक बायोपिक असून, तो यात प्रमुख भूमिका साकारणार आहे. याआधी देखील त्याने मांझी, बाळासाहेब ठाकरे आदी दिग्ग्जच्या भूमिका मोठ्या पडद्यावर साकारल्या आहेत. आता पुन्हा तो त्याच्या या आगामी सिनेमात सीमा शुल्क अधिकारी कोस्टाओ फर्नांडीज यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
कोस्टाओ फर्नांडीज यांनी ९० च्या दशकात गोव्यामध्ये सोन्याची तस्करी करणाऱ्यांविरोधात एक मोठी लढाई लढली होती. मिळणाऱ्या माहितीनुसार आता त्यांच्यावर तयार होणाऱ्या सिनेमात नवाज प्रमुख भूमिकेत दिसेल. नुकतेच या सिनेमाचे गोव्यामध्ये शूटिंग सुरु झाले आहे. कोस्टाओ फर्नांडीज यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकदा मोठं मोठ्या तस्करींना थांबवले आहे. या सिनेमात त्यांच्या आयुष्यातील काही महत्वाच्या घटनांना अधोरेखित करण्यात येणार आहे.
दरम्यान या सिनेमाचे दिग्दर्शन सेजल शाह हे करणार असून, निर्मिती विनोद भानुशाली हे करणार आहेत. नवाजुद्दीन सिद्धीकीला या सिनेमाकडून खूप अपेक्षा असून तो पहिल्यांदाच कस्टम अधिकाऱ्याच्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. अजून या चित्रपटाचे नाव ठरलेले नसून हा सिनेमा २०२४ साली प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे.