चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक आणि समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळवणारा ‘खालिद के शिवाजी’ हा मराठी चित्रपट आता OTT वर उपलब्ध झाला आहे. हा चित्रपट Apple TV, BookMyShow OTT आणि YouTube Movies या प्लॅटफॉर्मवर जगभरातील प्रेक्षकांसाठी प्रदर्शित करण्यात आला आहे.
पी.पी. सिनेप्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटात प्रियदर्शन जाधव, भारत गणेशपुरे, सुषमा देशपांडे, कैलास वाघमारे आणि स्नेहलता तागडे यांच्या भूमिका आहेत. तर खालिदची मध्यवर्ती भूमिका क्रिश मोरे याने साकारली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राज प्रितम मोरे यांनी केले असून, कथा आणि लेखन कैलास वाघमारे यांचे आहे. निर्मिती मायकल थेवर आणि सुषमा थेवर यांनी केली आहे. अमेरिकेतील मानसिक आरोग्य सेवा संस्था Omni Health Care Services चे अध्यक्ष असलेले मायकल थेवर या चित्रपटाचे निर्माते आहेत.
OTT प्रदर्शनाबद्दल आनंद व्यक्त करताना दिग्दर्शक राज प्रितम मोरे यांनी सांगितले की, हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट असून त्यासाठी त्यांनी दोन ते तीन वर्षे मेहनत घेतली. आता Apple TV, BookMyShow आणि YouTube Moviesच्या माध्यमातून हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. चित्रपटासाठी साथ देणाऱ्या निर्मात्यांचे, संपूर्ण टीमचे आणि चित्रीकरणादरम्यान सहकार्य करणाऱ्या अकोल्यातील नागरिकांचेही त्यांनी आभार मानले.
निर्माते मायकल थेवर यांच्या मते, आजच्या काळात समाजाला जोडणाऱ्या कथा सांगणे गरजेचे आहे. खालिदच्या निरागस नजरेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला असून, धर्म, जात आणि सामाजिक भेदांपलीकडे माणुसकीचा संदेश हा चित्रपट देतो.
या चित्रपटाची कथा खालिद नावाच्या एका मुस्लिम मुलाभोवती फिरते. शाळेत त्याला ‘अफजलखान’ म्हणून चिडवले जाते. त्यातून निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं शोधताना तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांपर्यंत पोहोचतो आणि त्यांच्या जीवनमूल्यांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो. समाजातील धार्मिक आणि सामाजिक दुराव्याच्या पार्श्वभूमीवर मांडलेली ही संकल्पना अनेक प्रेक्षकांना भावली.
याच आशयामुळे या चित्रपटाची कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील Marché du Film विभागात निवड झाली होती. तसेच IFFI Indian Panorama, Goa 2025 आणि Ajanta-Ellora International Film Festival अंतर्गत India Focus Special Screening साठीही चित्रपटाची निवड करण्यात आली होती.
अकोला, अमरावती आणि नागपूर परिसरात चित्रित झालेल्या या चित्रपटात अस्सल वऱ्हाडी भाषेचा वापर करण्यात आला आहे. स्थानिक कलाकारांच्या सहभागामुळे विदर्भातील अनेक नवोदित कलाकारांना व्यापक व्यासपीठ मिळाले.
चित्रपटगृहात हा चित्रपट पाहण्याची संधी हुकलेल्या किंवा पुन्हा एकदा ही कथा अनुभवण्याची इच्छा असलेल्या प्रेक्षकांसाठी आता ‘खालिद के शिवाजी’ Apple TV, BookMyShow OTT आणि YouTube Movies वर उपलब्ध आहे. सामाजिक आशय आणि मानवी मूल्यांवर आधारित हा चित्रपट आता घरबसल्या पाहता येणार आहे.
=======
हे देखील वाचा : श्रद्धा कपूरचा जबरदस्त अंदाज; विठाबाई नारायणगावकरांच्या प्रेरणादायी जीवनकथेची झलक
======