महाराष्ट्राला संतांचा खूपच मोठा इतिहास लाभला आहे. अतिशय मोठमोठे संत या महाराष्ट्रात होऊन गेले आहेत. त्यामुळेच ‘संतांची भूमी’ म्हणून देखील महाराष्ट्राची एक वेगळी आणि अतिशय खास ओळख आहे. जेव्हा जेव्हा आपल्याकडे संतांचा विषय निघतो तेव्हा तेव्हा संत ज्ञानेश्वर यांचे नाव निघाले नाही तरच नवल. ज्ञानेश्वरांनी खूपच कमी वयात अतिशय मोठे कर्तृत्व गाजवले. त्यांना निवृत्ती, सोपान आणि मुक्ताबाई ही भावंडं होती. या तिन्ही भावंडांनी देखील मोठे कार्य केले. तीन भावांना आईच्या मायेने वाढवणाऱ्या आणि त्यांच्यासोबत सावली सारख्या असणाऱ्या मुक्ताबाई या तर त्यांच्या ओव्यांमुळे प्रसिद्ध आहेत.
लहान असूनही आपल्या भावांच्या पाठीशी राहून अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी आईची मायेने भावांना साथ दिली. याच मुक्ताबाई यांचा विषय निघाला की, लोकांना आठवते भावांना मांडे खाऊ घालणारी बहीण. मात्र खरंच त्यांची ओळख तेवढीच होती का? त्यांचे कर्तृत्व तेवढेच होते का? तर नाही. मग नक्की कोण होत्या मुक्ताबाई? ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यानंतर कसे होते त्यांचे आयुष्य? आदी अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. याच प्रश्नांची उत्तर देण्याचा एक सुंदर प्रयत्न होणार आहे, आणि तो देखील चित्रपटाच्या माध्यमातून.
संत ज्ञानेश्वरांची लहान बहीण म्हणून संत मुक्ताबाई या सर्वांना परिचित आहेत. मुक्ताईचे छोटेसे जीवन अत्यंत तेजोमय, प्रखर ज्ञानचेतनेने सिद्ध जीवन होते. अशा या ‘मुक्ताई’चे माता, भगिनी, गुरु असे वेगवेगळे पदर उलगडणारा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य मराठी चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्याविषयीची उत्सुकता वाढलेली आहे.
‘शिवराज अष्टका’तील चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर महाराष्ट्राच्या संत परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा अध्याय ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यासाठी लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सज्ज झाले आहेत. या चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे. नुकतेच या चित्रपटाचे नवे आकर्षक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. त्यामध्ये ज्ञानेश्वरांच्या छायेत बसलेली दिव्य मुक्ताई दिसून येत आहे. जून २०२४ मध्ये हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे.
आदिमायेचा अवतार मानल्या जाणाऱ्या मुक्ताईने त्या काळात स्त्रियांना अध्यात्माचे क्षेत्र खुले करून दिले. संत ज्ञानेश्वरांच्या भागवत धर्माच्या क्रांतीचा ती आधार बनली. केवळ चौदा ते अठरा वर्षांच्या अल्प अवतार आयुष्यात मुक्ताईने शेकडो अभंग रचून स्त्री-कर्तृत्वाचा आदर्श उभा केला. कार्यरूपाने संजीवन असणाऱ्या संत मुक्ताई यांचे अजोड कार्य व विचार आजच्या पिढीला प्रेरणा देणारे व्हावेत, या उद्देशाने ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाचा विषय हाती घेतल्याचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सांगतात.