Home » Sammarth Trailer : दोन पिढ्यांतील संघर्ष आणि समर्थ विचारांची प्रेरणा; 14 ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित

Sammarth Trailer : दोन पिढ्यांतील संघर्ष आणि समर्थ विचारांची प्रेरणा; 14 ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित

दोन पिढ्यांतील संघर्ष, नात्यांचा भावनिक प्रवास आणि समर्थ रामदास स्वामींच्या विचारांची आधुनिक मांडणी ट्रेलरमधून उलगडली.

समर्थ मराठी चित्रपटाच्या ट्रेलरमधील भूषण प्रधान आणि प्रमुख कलाकार

समर्थ रामदास स्वामींच्या विचारांना आधुनिक जीवनाशी जोडणाऱ्या ‘समर्थ‘ या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. टीझरनंतर प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता आता आणखी वाढली असून, ट्रेलरमध्ये भावनिक नातेसंबंध, वैचारिक संघर्ष आणि जीवनमूल्यांचा प्रभावी वेध घेण्यात आला आहे.

ट्रेलरची सुरुवात एका सामान्य कुटुंबाच्या कथेतून होते. आयुष्याच्या एका टप्प्यावर अध्यात्माचा स्वीकार करणारे वडील आणि त्यांच्या भूमिकेशी असहमत असलेला मुलगा यांच्यातील मतभेद कथेला मध्यवर्ती ठरतात. बदलत्या काळात कुटुंबातील संवाद कसा कमी होत चालला आहे आणि त्यातून निर्माण होणारा दुरावा किती खोलवर जाऊ शकतो, याचे वास्तववादी चित्रण ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. (Sammarth Trailer)

चित्रपट केवळ अध्यात्माची मांडणी करत नाही, तर आधुनिक जीवनातील भावनिक गुंतागुंत, बदलती नाती आणि मूल्यांची जपणूक यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करतो. समर्थ रामदास स्वामींच्या शिकवणीच्या माध्यमातून माणसाला स्वतःकडे नव्याने पाहण्याची प्रेरणा देणारी कथा ट्रेलरमधून समोर येते.

दिग्दर्शक योगेश फुलफगर यांनी सांगितले की, “‘समर्थ’ हा चित्रपट आजच्या पिढीसमोर उभ्या असलेल्या अनेक प्रश्नांकडे नव्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न आहे. समर्थ रामदास स्वामींचे विचार आजही तितकेच समर्पक आणि प्रेरणादायी आहेत. ट्रेलरमधून आम्ही त्या भावविश्वाची झलक प्रेक्षकांसमोर आणली आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येकाला या कथेत स्वतःचा काही ना काही भाग नक्कीच सापडेल, असा विश्वास आहे.”

निर्माते रविंद्र पाठक यांनीही चित्रपटाच्या आशयाबाबत विश्वास व्यक्त केला. त्यांच्या मते, “‘समर्थ’ हा चित्रपट दोन पिढ्यांमधील संवाद पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. धावपळीच्या आयुष्यात हरवत चाललेली नाती, संस्कार आणि जीवनमूल्यांची नव्याने जाणीव करून देणारा हा चित्रपट आहे. ट्रेलरला मिळणारा प्रतिसाद आमच्यासाठी महत्त्वाचा असून, चित्रपटही प्रेक्षकांच्या मनात तितकाच खोलवर पोहोचेल.” (Sammarth Trailer)

थर्मोलाइन मार्केटिंग प्रा. लि. प्रस्तुत आणि ए३ इव्हेंट्स अँड मीडिया सर्व्हिसेस निर्मित ‘समर्थ’ हा चित्रपट 14 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात भूषण प्रधान, पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी जमेनिस, हार्दिक जोशी, ईशा केसकर, प्रसाद खांडेकर, राजन भिसे, यतिन कार्येकर, दिशा परदेशी आणि निखिल राऊत यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटाची निर्मिती रविंद्र पाठक यांनी केली असून अमोल भगत हे क्रिएटिव्ह प्रोड्यूसर आहेत. दोन पिढ्यांतील नातेसंबंध, जीवनमूल्ये आणि समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा आधुनिक संदर्भ अशा विषयांमुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी वेगळा अनुभव ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

=======

हे देखील वाचा : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अमोल कागणे-शिवाजी लोटण पाटील यांचा नवा चित्रपट ‘मूर्ती’

=======

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy