Home » देवदत्त नागेसाठी कुशल बद्रिकेच ‘फिटनेस आयडॉल’; ‘घबाडकुंड’च्या सेटवरील मजेशीर किस्से झाले व्हायरल

देवदत्त नागेसाठी कुशल बद्रिकेच ‘फिटनेस आयडॉल’; ‘घबाडकुंड’च्या सेटवरील मजेशीर किस्से झाले व्हायरल

मनोरंजनविश्वातील दमदार अभिनेता देवदत्त नागे हा आपल्या प्रभावी अभिनयासोबतच फिटनेससाठीही विशेष ओळखला जातो. पण स्वतः फिटनेसची काळजी घेत असताना त्याला खरी प्रेरणा मिळते ती त्याचा जवळचा मित्र आणि लोकप्रिय अभिनेता कुशल बद्रिके याच्याकडून. अभिनयाबरोबरच फिटनेसकडेही तितक्याच गांभीर्याने पाहणाऱ्या या दोघांची मैत्री आणि त्यांचं एकमेकांना दिलेलं प्रोत्साहन सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

मित्रांकडून मिळणारी प्रेरणा आयुष्याला नवी दिशा देत असते. देवदत्त नागेनेही फिटनेसच्या बाबतीत कुशल बद्रिके हा आपला खरा ‘रोल मॉडेल’ असल्याचं स्पष्ट केलं. ‘घबाडकुंड’ या आगामी चित्रपटाच्या फर्स्ट लूक लाँच सोहळ्यात त्याने हा खास खुलासा केला.

चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच्या आठवणी सांगताना देवदत्तने सेटवरील मजा, मस्ती आणि गमतीदार क्षण रंगवून सांगितले. पहाटे दिव्याच्या उजेडात कुशलसोबत केलेला व्यायाम, त्यानंतरचा गरमागरम गुळाचा चहा आणि चमचमीत मॅगी—या सगळ्या क्षणांची आठवण काढताना त्याने कुशलला ‘माझा फिटनेस आयडॉल’ अशी मिश्कील पदवी दिली. यावर कुशल बद्रिकेनेही नेहमीप्रमाणेच विनोदी अंदाजात प्रतिक्रिया देत, “हा व्हिडिओ सगळीकडे टॅग करा!” असं म्हणत वातावरण आणखी रंगवलं.

कुशल बद्रिके आणि संदीप पाठक यांच्यासोबतचा हा प्रवास खूप खास आणि अविस्मरणीय असल्याचं सांगत देवदत्त नागेने सर्वांचे मनापासून आभार मानले. ‘घबाडकुंड’मधील रहस्य उलगडण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत, असंही त्याने यावेळी सांगितलं.

दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील आणि निर्माते रसिक कदम यांच्या टीमने सस्पेन्स थ्रिलर जॉनरमध्ये एक वेगळा प्रयोग करत मराठीतला पहिला युनिव्हर्स चित्रपट प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. अ‍ॅक्शन, विनोद आणि रहस्य यांचा तगडा संगम असलेला ‘घबाडकुंड’ हा चित्रपट १९ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Spread the love

You may also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy