आपण आजपर्यंत अनेकदा ‘श्यामची आई’ हा शब्द ऐकला असेल. अतिशय गाजलेले आणि लोकप्रिय असे हे पुस्तक कोणाला माहिती नसेल तरच नवल. साने गुरुजी यांच्या या पुस्तकाचे जगभरात असंख्य चाहते आहेत. या पोस्टवर मराठीमध्ये सिनेमा देखील तयार झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा या पुस्तकावर आधारित एक सिनेमा येऊ घातला आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलांना वाढवताना एकदा हे पुस्तक वाचावे असे अनेकदा म्हटले जाते. एक आदर्श आई कशी असावी याचे उत्तम चित्रण या सिनेमात साने गुरुजी यांनी केले आहे.
आपल्या लेकरांचे कोडकौतुक करणारी, प्रसंगी त्यांना ओरडणारी, शिक्षा करणारी चांगल्या सवयी आपल्या बाळाने अंगिकारण्यासाठी कायम आग्रही असणारी ही ‘श्यामची आई’ कायमच एक आदर्श आई म्हणून ओळखली जाते. आईच्या स्वभावातले विविधु पैलू अतिशय मार्मीक पद्धतीने साने गुरुजी यांनी त्यांच्या लेखणीतून उतरवले आहे. अशा याच आईची ओळख आजच्या पिढीला नव्याने करून देण्यासाठी येत आहे एक नवीन कोरा सिनेमा ‘श्यामची आई’.
सुजय सुनील डहाके दिग्दर्शित श्यामची आई चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरमधील खोडकर श्याम आणि त्याच्या प्रेमळ आईमधील संवादांनी प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतलं. ट्रेलर मधून साने गुरुजी त्यांच्या आईच्या संस्कारांमध्ये कसे घडले याचं अगदी जिवंत चित्रण केल्याचा उत्तम दाखला मिळाला. खोडकर श्याम ते आदर्श साने गुरुजी बनण्यापर्यंतचा हा प्रवास अनुभवणं प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार हे नक्की. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर म्हणजे १० नोव्हेंबर रोजी ‘श्यामची आई’ चित्रपट आपल्या भेटीस येत आहे. मुख्य म्हणजे हा सिनेमा कलर सिनेमा नसून तो एक कृष्णधवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट असणार आहे.
स्वातंत्र्यापूर्वीचा काळ, त्या अनुषंगाने त्यावेळचा पेहराव, देहबोली, भाषा आणि संवाद या सगळ्या गोष्टींवर घेतलेली मेहनत श्यामची आई चित्रपटाच्या ट्रेलरमधनं स्पष्ट दिसत आहे. ट्रेलरमधून समोर आलेले श्याम आणि त्याच्या आईमधील काही सीन व संवाद प्रत्येकाला भावुक करतीलच पण बरोबरीनं जगण्याची एक नवी प्रेरणा देऊन जातील हे तितकंच खरं. खोडकर श्यामचे साने गुरुजी बनण्यामागे त्यांच्या आईचा असलेला संघर्ष आणि जिद्द ‘श्यामची आई’ चित्रपटातून अतिशय रंजकपणे दाखवण्यात आलं आहे. आणि कदाचित म्हणूनच ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर काही तासातच त्याने मिलियन्स व्हयूजचा टप्पा पार केला.
राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय सुनील डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ या चित्रपटाचा टिजर रिलीज झाल्यानंतर चित्रपटाविषयीची उत्सुकता कमालीची वाढलेली आहे.
‘श्यामची आई’ या चित्रपटात ओम भूतकर यांनी साने गुरुजींची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे तर सोबत गौरी देशपांडे, बाल कलाकार शर्व गाडगीळ,संदीप पाठक, ज्योती चांदेकर,
सारंग साठ्ये, उर्मिला जगताप,अक्षया गुरव, दिशा काटकर, मयूर मोरे ,गंधार जोशी , अनिकेत सागवेकर ही मोठी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे.