‘ठिपक्यांची रांगोळी’ ( Thipkyanchi Rangoli) मालिकेतील माई म्हणजे सुप्रिया पाठारे(Supriya Pathare) यांचा आज वाढदिवस. सुप्रिया पाठारे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आज आघाडीच्या अभिनेत्री असलेल्या सुप्रिया पाठारे यांनी आपल्या बालपणी कधीही अभिनेत्री होण्याचा विचारही केला नव्हता.
शाळेत नक्कल करताना पकडले,नाटकाची संधी मिळाली
सुप्रिया पाठारे यांचे शालेय शिक्षण मुंबईजवळील ठाण्यामध्ये झाले. एकदा शाळेत बाईंची नक्कल करत असताना दुसऱ्या बाईंनी त्यांना पाहिलं, त्यानंतर सुप्रिया यांना ओरडा किंवा मार मिळाला नाही तर चक्क नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी शालेय नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. फक्त अभिनयच नव्हे तर सातवीत असताना त्यांनी एक स्क्रिप्टही लिहिली होती.
नक्की वाचा: ‘नवे लक्ष्य’ मालिकेतील अभिनेत्री शुभांगी सदावर्तेचे सिनेमात पदार्पण
शिक्षणासाठी भांडी घासली,अंडी–चणे विकले
सुप्रिया पाठारे यांच्या घरची स्थिती हलाखीची होती. त्यांना चार भावंडे होती. सुप्रिया या भावंडांमध्ये मोठ्या होत्या. त्यामुळे घरखर्चाला हातभार लावण्याची जबाबदारी ओघाने त्याच्यावर आली होती. घरखर्चासाठी त्या रस्त्यावर अंडी, चणे विकायच्या. तर कधी दुधाच्या बाटल्या घरोघरी नेऊन पोहोचवायच्या. सुप्रिया पाठारे यांना डान्सची खूप आवड होती. नववीमध्ये शिकत असताना भरतनाट्यम शिकण्यासाठी त्यांच्याकडे फक्त ७० रुपये फी नव्हती. पण सुप्रिया पाठारेंनी हार मानली नाही. त्यांनी भांडी घासायचे काम केले. त्यांची आई आणि सुप्रिया दोघी मिळून १८ घरांची भांडी घासायच्या. यातून त्या क्लासची फी आणि घरखर्चासाठी पैसे दोन्ही कमवायच्या.
नाटक,मालिका आणि सिनेमांमधला लक्षवेधी प्रवास
सुप्रिया पाठारे यांनी डार्लिंग, डार्लिंग या मराठी नाटकापासून आपल्या करिअरचा श्रीगणेशा केला. डार्लिंग, डार्लिंग हे त्यांचे पहिले व्यावसायिक नाटक होते. त्यानंतर ‘जागो मोहन प्यारे‘,‘होणार सुन मी या घरची‘, ‘दिली सुपारी बायकोची’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘करु या कायद्याची बात’, ‘बालक पालक’, ‘टाइमपास’, ‘चि. व चि. सौ. का’, ‘फु बाई फु‘, ‘जागो मोहन प्यारे‘, ‘मोलकरीणबाई‘, ‘श्रीमंताघरची सून‘, ‘चि. व चि. सौ कां‘, ‘बाळकडू‘ अशा चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारत चाहत्यांचे लक्ष वेधले.