‘गोठ’, ‘श्रीमंताघरची सून’, ‘आनंदी हे जग सारे’ या मालिकांमधून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री रुपल नंदने (Rupal Nand) , जुलै २०२२ मध्ये अनिश कानविंदेसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर तब्बल ९ महिन्यांच्या ब्रेकनंतर रुपल पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर आपल्या भेटीस येत आहे. ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ (Karan Gunhyala Mafi Nahi) या मालिकेत ती झळकत आहे. या मालिकेत ती मोहिनी दुभाषी ही भूमिका साकारत आहे.
नक्की वाचा: ‘रंग माझा वेगळा’चे एक हजार एपिसोड पूर्ण, आयेशाच्या परत येण्याने दीपावर नवे संकट
रुपलचा या मालिकेतील फर्स्ट लूक समोर आला असून ती या मालिकेत इन्स्पेक्टर भोसले यांची होणा-या बायकोच्या भूमिकेत झळकणार आहे. इन्स्पेक्टर विजय भोसलेंच्या भूमिकेत आपल्याला अभिनेता हरिष दुधाणे दिसत आहे. विजय हा आपल्या वैयक्तिक गोष्टींपैक्षा आपल्या कामाला जास्त महत्त्व देतो. एका मॅट्रिमोनिअल साईटसंदर्भातील किलरला शोधताना विजय हा मोहिनीला वेळ देवू शकत नाही. अशावेळी मोहिनी फोन करुन त्याला ताबडतोब भेटायला ये, नाहीतर लग्नाचा विषय सोडून दे अशा शब्दांत सुनावते. पण वर्दीपुढे कोणतही नातं महत्त्वाचं नसतं, त्यामुळे आधी लग्न कोंढाण्याचेच असे म्हणत, विजय भोसले आधी किलर पकडणार मग माझ्या लग्नाचे बघू असे म्हणताना दिसत आहे. आता यावर मोहिनीचा निर्णय काय असेल. ती विजयला समजून घेणार की हे नाते तुटणार यासाठी ही मालिका पाहावी लागेल. तर अशा इन्स्पेक्टर विजय भोसलेसारख्या आपल्या कामात नेहमी तत्पर असणा-या पोलीस अधिकाऱ्याच्या आयुष्यातील दुसरी बाजू, ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’! मालिकेतून उलगडणार आहे. या दोघांशिवाय या मालिकेतून अभिनेत्री अश्विनी कासार ही पोलीस निरीक्षकाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
तर मग ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ ही मालिका सोनी मराठी (Sony Marathi) वाहिनीवर १ मेपासून सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता नक्की पहा.