सामान्य लोकांना नेहमीच कलाकारांचे अप्रूप वाटत असते. कलाकारांचे आयुष्य, फेम, पैसा, परदेश प्रवास आदी अनेक गोष्टी लोकांना भुरळ घालतात. कामाच्या निमित्ताने किंवा फिरण्यासाठी कलाकारांचा परदेश प्रवास हा नेहमीच होत असतो. आपले मराठी कलाकार देखील अनेक परदेश वाऱ्या करताना दिसतात. या परदेशांतीही त्यांचे अनेक फॅन्स त्यांना भेटतात. मराठी कलाकार बऱ्याचवेळा त्यांच्या परदेशात भेटलेल्या फॅन्सचे अनुभव सांगताना आपल्याला दिसतात.
नुकतीच ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत मुख्य भूमिका करणारी अक्षरा अर्थात अभिनेत्री शिवानी रांगोळे कामाच्या निमित्ताने दोन दिवसांसाठी सिंगापूरला गेली होती. तिथे तिला चक्क तिच्या मालिकेचे फॅन्स भेटले आणि याचा एक सुखद आणि अविस्मरणीय अनुभव त्यांनी नुकताच शेअर केला.
शिवानी म्हणाली, “सिंगापूरला मी एका खास प्रोजेक्टच्या केवळ दोन दिवसांच्या शूटसाठी गेले होते. बाहेरगावी शूट म्हणजे काम आणि मजा ह्या दोन्ही गोष्टी एकत्र येतातच. निघायच्या दिवशी मी संपूर्ण दिवस ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’चे शूटिंग करून रात्री मुंबईहुन सिंगापूरला निघाले. सिंगापूरला आम्ही शूट करत होतो, सोबतच मी माझी फिरण्याची आवड देखील जपत होते. आम्ही जिथे जिथे शूट करत होते तिथे तर मी फिरलीच पण शूटिंग संपल्यावर देखील माझी बरीच भटकंती झाली. मी सिंगापूरमध्ये ‘गार्डन बाय द बे’ , मरिना बे सॅण्डस , मुस्तफा मार्केट आणि लिटल इंडिया ही ठिकाणं फिरली. सिंगापूर अतिशय शिस्तबद्ध आणि स्वच्छ असा देश आहे.”
पुढे शिवानीने तिथला एक उत्तम प्रसंग सांगितलं. ती म्हणाली, “पहाटे २:३० वाजले होते. आम्ही शूट संपवून आमच्या गाडीची वाट पाहत होतो. जवळच असलेल्या सिग्नलवर एका माणसाने आपली गाडी थांबवली. तो ट्रॅफिक लाइटचा कायदा पाळत होता. पूर्ण शुकशुकाट असताना देखील तो थांबला. त्याने नियमाचे पालन केले. या गोष्टीचे मला खूप कौतुक वाटले.”
या चर्चेदरम्यान शिवानीने तिच्या जेवणाबद्दल देखील एक अनुभव शेअर केला. ती म्हणाली, ” मला नवीन नवीन पदार्थाची चव घ्यायला खूप आवडते. मी सिंगापूरमध्ये निरनिराळ्या प्रकारचे वोक बाऊल ट्राय केले. मला आवडणारे काही पदार्थ घेऊन देखील मी वोक बाऊल बनवून खाल्ले. घरी सिंगापूरची काहीतरी आठवण घेऊन जाण्यासाठी मी फिरत असताना माझी गाठ भेट एका पुणेकरशी झाली. एका दुकानात शॉपिंगसाठी गेले असता हे पुणेकर मंडळी मला भेटले. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते पुणेकर त्या दुकानाचे मालक होते. योगायोग असा की त्यांची आई आमचा कार्यक्रम ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ची नियमित प्रेक्षक आहे. ही भेट माझ्यासाठी अनपेक्षित होती आणि ती माझ्या आठवणीत नेहमीच राहील.”
तत्पूर्वी सध्या शिवानी तिच्या अतिशय गाजणाऱ्या आणि लोकप्रिय अशा ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत अक्षराच्या मुख्य भूमिकेत दिसत असून, सध्या ‘सारं काही तुझ्यासाठी’ आणि ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा महासंगम प्रेक्षकांना बघायला मिळत आहे.