सोनी मराठी वाहिनीवरील ‘जिवाची होतीया काहिली’ या मालिकेत अभिनेता सुयश टिळक हा कार्तिक देवराज ही नकारात्मक भूमिका साकारत आहे. त्याच्या येण्याने रेवथी आणि अर्जुन यांच्या नात्यात नवे वादळ आले आहे. सुयशने याआधी अशी भूमिका कधी साकारली नव्हती. त्याच्या या कानडी लूक आणि नकारात्मक भूमिकेचे प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. प्रेक्षकांनी त्याच्या या नकारात्मक भूमिकेला पसंतीची पावती दिली असून, त्याने अशाच वेगवेगळ्या भूमिका साकारव्या असे त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे. नायकाच्या मुख्य भूमिकेत झळकल्यानंतरही सुयशने खलनायकची भूमिका स्विकारली. याआधीही अनेक अभिनेते हे ‘नायक नहीं खलनायक हूं मै’ म्हणत नकारात्मक भूमिकांना प्राधान्य देताना दिसलेत. त्यांच्या या नकारात्मक भूमिकांना प्रेक्षकांची उत्तम दाद देखील मिळते आहे.

अभिनेता शशांक केतकरला आपण आदर्श नवरा म्हणून ओळखतो. ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतील श्री, ‘सुखाच्या सरींनी हे मनं बावरे’ मालिकेतील सिद्धार्थ साकारल्यानंतर शशांकने ‘पाहिले न मी तूला’ मालिकेतील समर साकारत चाहत्यांना धक्काच दिला. त्याने समरची नकारात्मक भूमिकाही उत्तमरित्या वठवली.

अभिनेता अभिजीत खांडकेकर यानेदेखील शशांकप्रमाणेच ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ मालिकेतून रोमॅण्टिक भूमिका आणि आदर्श मुलाची भूमिका साकारत मालिकाविश्वात पदार्पण केले होते. त्याची ही मालिका खूप गाजली होती. पण तो ‘माझ्या नवऱ्याची बायको’मधील गुरुनाथ या नकारात्मक भूमिकेसाठी घराघरात ओळखला जातो.

अभिनेते मिलिंद गवळी यांनी आजवर अनेक मालिका-सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. गेले अनेक वर्ष अभिनेत्याच्या भूमिकेत झळकल्यानंतरही त्यांनी ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनिरुद्धची भूमिका स्विकारली. आज ही भूमिका प्रेक्षकांच्या आवडत्या नकारात्मक व्यक्तिरेखांपैकी एक आहे.

अभिनेता किरण गायकवाडने ‘लागीर झालं जी’ या मालिकेत भैय्यासाहेब ही नकारात्मक भूमिका साकारली होती. या मालिकेतून तो घराघरात भैय्यासाहेब म्हणून लोकप्रिय झाला. या नकारात्मक भूमिकेनंतर त्याने ‘टोटल हुबलाक’ या मालिकेत अभिनेत्याचे काम केले. याचदरम्यान त्याला देवमाणूस या मालिकेची ऑफर मिळाली. आणि ती त्याने स्विकारली. त्यानंतर त्याने ‘देवमाणूस’ या मालिकेत साकारलेला डॉ. अजितकुमार चाहत्यांच्या एवढा पसंतीस उतरला की या मालिकेचा दुसरा सिक्वेलदेखील प्रदर्शित करण्यात आला.

‘खुलता कळी खुलेना’ फेम ओमप्रकाश शिंदे हा देखील काही काळासाठी ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेत नकारात्मक भूमिकेत दिसला होता.‘लक्ष्मी सदैव मंगलम’ मालिकेतील अजिंक्य ही भूमिका साकारणारा अभिनेता ऋषिकेश शेलार हा ‘सुंदरा मनामध्ये भरली’ दौलत या भूमिकेसाठी घराघरात लोकप्रिय झाला.
तर मग तुम्हाला हा लेख कसा वाटला याचा अभिप्राय कमेंटमध्ये नक्की द्या आणि आमच्या पेजला लाईक करा.