Dnyanada Ramtirthkar Future Husband : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या लोकप्रिय मालिकेतील काव्या आता खऱ्या आयुष्यात नव्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरचा साखरपुडा नुकताच कुटुंबीय आणि जवळच्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत थाटामाटात पार पडला आहे.
ज्ञानदाच्या होणाऱ्या जोडीदाराबद्दल जाणून घेण्याची चाहत्यांची उत्सुकता बऱ्याच दिवसांपासून होती. अखेर साखरपुड्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत ज्ञानदाने ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली आणि तिच्या आयुष्यातील ‘H’ कोण आहे, याचं उत्तरही मिळालं.
याआधी ज्ञानदाने मेहंदी सोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. त्या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने ‘HD लव्ह’ असा उल्लेख केला होता. त्यामुळे होणाऱ्या पतीचं नाव ‘H’ वरून सुरू होत असल्याची चर्चा रंगली होती. आता साखरपुड्याचे फोटो समोर येताच सगळं चित्र स्पष्ट झालं आहे.
ज्ञानदा रामतीर्थकरच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव हर्षद आत्माराम आहे. हर्षदचा चित्रपटसृष्टीशी अगदी जवळचा संबंध आहे. तो एक सिनेमॅटोग्राफर असून अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. हे दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. २०१९ साली ज्ञानदाने हर्षदसोबत शेअर केलेला एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे. हर्षदने ‘बंधू’ या चित्रपटासाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केलं होतं.
साखरपुड्याच्या दिवशी ज्ञानदा आणि हर्षद दोघेही अतिशय सुंदर दिसत होते. गोल्डन रंगाची साडी, डिझायनर ब्लाऊज आणि हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा—या लूकमध्ये ज्ञानदा खास उठून दिसत होती. या दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
ज्ञानदाच्या फोटोंवर चाहत्यांसह मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. सुकन्या मोने, अश्विनी महांगडे, ऋतुजा बागवे, सुयश टिळक, निखिल राजेशिर्के यांसारख्या कलाकारांनी कमेंट्समधून ज्ञानदाला तिच्या नव्या आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ज्ञानदाने आजवर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. ‘स्टार प्रवाह’वरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेमुळे तिची लोकप्रियता शिखरावर पोहोचली. सध्या ती ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत काव्या ही भूमिका साकारत असून या मालिकेलाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.