मराठी चित्रपटांमधील वेगवेगळे विषय आणि आशय आता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मंचावर पाहायला मिळणार आहेत. 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI 2026) ‘तिघी’ आणि ‘सिनेमॅन’ या दोन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने या चित्रपटांची निवड करण्यात आली असून, दोन्ही चित्रपटांचं प्रदर्शन गोव्यात होणार आहे.
उमेश मोहन बागडे दिग्दर्शित ‘सिनेमॅन’ हा चित्रपट 22 नोव्हेंबरला, तर जिजीविषा काळे दिग्दर्शित ‘तिघी’ 23 नोव्हेंबरला महोत्सवात दाखवला जाणार आहे. दोन्ही चित्रपटांचे विषय वेगळे आहेत. ‘सिनेमॅन’मधून मुलांचं विश्व आणि चित्रपटांचं शैक्षणिक-सांस्कृतिक महत्त्व मांडण्यात आलं आहे, तर ‘तिघी’मधून आई आणि तिच्या दोन मुलींमधील नात्यांचा भावनिक प्रवास उलगडतो.
दुर्गम भागातील मुलांपर्यंत सिनेमा पोहोचवणाऱ्या शिक्षकाची गोष्ट ‘सिनेमॅन’
उमेश मोहन बागडे दिग्दर्शित ‘सिनेमॅन’ हा चित्रपट आनंद नावाच्या निवृत्त शिक्षकाच्या कार्याभोवती फिरतो. दुर्गम भागातील शालेय विद्यार्थ्यांपर्यंत अर्थपूर्ण चित्रपट पोहोचावेत, या उद्देशाने आनंद यांनी एक उपक्रम सुरू केलेला असतो. चित्रपटांच्या माध्यमातून मुलांमध्ये चित्रपटविषयक जाणीव निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न या चित्रपटातून दाखवण्यात आला आहे.
एका तरुण चित्रपटकर्मीकडून आनंद यांच्या या उपक्रमाचा मागोवा घेतला जातो. या प्रवासात मुलांची कल्पनाशक्ती, त्यांचं बालविश्व आणि जागतिक सिनेमाशी त्यांची जोडली जाणारी नाळ उलगडत जाते. चित्रपटांचं शैक्षणिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणारा हा चित्रपट 22 नोव्हेंबरला IFFI मध्ये दाखवला जाणार आहे.
आई आणि दोन मुलींच्या नात्यांची गोष्ट ‘तिघी’
जिजीविषा काळे दिग्दर्शित ‘तिघी’ हा चित्रपट आई आणि तिच्या दोन मुलींमधील गुंतागुंतीच्या नात्यांचा वेध घेतो. आईच्या आजारपणामुळे अनेक वर्षांपासून एकमेकींपासून दूर असलेल्या दोन बहिणी पुन्हा एकत्र येतात. त्यानंतर जुन्या आठवणी, मनातील सल, नात्यांमधील ताणतणाव आणि कुटुंबात दडलेली रहस्यं समोर येतात.
या चित्रपटात भारती आचरेकर, नेहा पेंडसे आणि सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मानवी नातेसंबंध, स्त्रीजीवन आणि कौटुंबिक भावविश्व यांचं संवेदनशील चित्रण या चित्रपटातून करण्यात आलं आहे. ‘तिघी’ 23 नोव्हेंबरला महोत्सवात दाखवला जाणार आहे.
या दोन्ही चित्रपटांच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीतील आशयवैविध्य आणि वेगवेगळ्या विषयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील प्रतिनिधींसमोर मांडण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे IFFI 2026 मधील ‘तिघी’ आणि ‘सिनेमॅन’ या दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनाकडे मराठी चित्रपटप्रेमींचं लक्ष असेल.