राष्ट्रीय पुरस्कार विजेते निर्माते अमोल कागणे आणि दिग्दर्शक शिवाजी लोटण पाटील यांची जोडी पुन्हा एकदा नव्या मराठी चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘मूर्ती’ असे या चित्रपटाचे नाव असून सामाजिक आशयाला केंद्रस्थानी ठेवणारा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
‘हलाल’ आणि ‘भोंगा’ या राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविलेल्या चित्रपटांनंतर अमोल कागणे आणि शिवाजी लोटण पाटील यांनी नव्या प्रकल्पाची घोषणा केली आहे. समाजातील वास्तवाला संवेदनशीलपणे पडद्यावर मांडण्याची ओळख असलेल्या या जोडीकडून ‘मूर्ती’कडूनही तितक्याच आशयघन चित्रपटाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दिग्दर्शक शिवाजी लोटण पाटील यांनी आपल्या आधीच्या चित्रपटांतून सामाजिक प्रश्नांवर प्रभावी भाष्य केले आहे. त्यांच्या चित्रपटांमध्ये मनोरंजनासोबत वास्तववादी मांडणी आणि विचारांना चालना देणारा आशय दिसून येतो. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक नव्या चित्रपटाची घोषणा ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाची मानली जाते.
‘मूर्ती’ची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन शिवाजी लोटण पाटील यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती अमोल लक्ष्मण कागणे, लक्ष्मण एकनाथराव कागणे आणि शिवाजी लोटण पाटील यांनी संयुक्तपणे केली आहे.
चित्रपटाच्या तांत्रिक बाजूची धुरा अनुभवी टीमने सांभाळली आहे. छायांकनाची जबाबदारी मयुरेश जोशी यांनी घेतली असून संगीत हनी सातमकर यांचे आहे. संकलन निलेश नवनाथ गावणे यांनी केले आहे, तर ध्वनी संयोजनाची जबाबदारी रमेश इनामती यांनी सांभाळली आहे.
याशिवाय कलादिग्दर्शन आकाश शिवाजी माळी, वेशभूषा माधव बाळुते, मेकअप नितीन दांडेकर आणि स्टिल फोटोग्राफी नितीन भावसार यांनी केली आहे. कार्यकारी निर्माता म्हणून महेंद्र माधुकर तिसगे यांनी जबाबदारी पार पाडली आहे.
चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओचे अमेय खोपकर, अमोल कागणे आणि प्रणित वायकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित ठरलेल्या चित्रपटांनंतर येणारा ‘मूर्ती’ हा प्रकल्प मराठी चित्रपटसृष्टीत वेगळी छाप सोडेल, असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला आहे. सामाजिक आशय आणि प्रभावी सिनेमॅटिक मांडणी यांचा संगम असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी वेगळा अनुभव ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
=======
हे देखील वाचा : फ्रेंडशिप डे निमित्त ‘मैत्रेया’ची घोषणा; क्रांती रेडकर वानखेडे पुन्हा दिग्दर्शनात
=======