मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात भव्य आणि सर्वाधिक प्रतिक्षा मिळवणारा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ आपल्या सहाव्या पर्वासह पुन्हा एकदा प्रेक्षकांना रोमांचित करण्यासाठी सज्ज झाला आहे. महाराष्ट्र काय, तर संपूर्ण जगात ज्याची चर्चा सुरू असते, ज्याच्या चाहुलीनेच सोशल मीडियावर गडबड उडते, तो बिग बॉस पुन्हा एकदा घराचा दरवाजा उघडायला येतोय. दरवाजा उघडण्याआधीच उत्सुकता शिगेला पोहोचली असून मनात पुन्हा अनेक प्रश्न डोकावू लागले आहेत—यंदाचा USP काय असेल? घराची थीम कशी असेल? कोणती चेहरे यंदा घरात पाऊल ठेवणार? गेमची दिशा कशी बदलणार?
यासोबतच एक मोठा प्रश्न सगळ्यांच्या मनात—यंदाही महाराष्ट्राचा लाडका भाऊ, म्हणजे रितेश देशमुख, सूत्रसंचालन करणार का? ‘भाऊचा कट्टा’ पुन्हा एकदा घराघरात पाहायला मिळणार का? या सर्व चर्चांमुळे बिग बॉसच्या पुन्हा परतण्याची चाहूल सर्वदूर दरवळू लागली आहे.
कलर्स मराठीने नुकताच प्रदर्शित केलेल्या खास टीझरमधून या सीझनचा सर्वात महत्त्वाचा संकेत मिळतो—तो म्हणजे ‘दरवाजा’. पण यावेळी फक्त एक नाही, तर अनेक दरवाजे! दरवाजे जे फक्त उघडणार नाहीत, तर नशिबाचा गेमच पालटणार आहेत. प्रत्येक सीझनप्रमाणे यंदाही एंटरटेनमेंटचा बार आणखी उंच जाणार हे नक्की. बिग बॉस मराठी सिझन 6 लवकरच तुमच्या स्क्रीनवर धमाका करायला सज्ज आहे—कलर्स मराठीवर आणि JioHotstar वर!
या वर्षीच्या टीझरमध्ये अनेक दरवाजे झळकतात आणि त्या क्षणीच प्रेक्षकांच्या मनातली उत्सुकता दुप्पट होते. काहीच उघड न करता हा टीझर आपल्याला क्षणात पकडून ठेवतो. दरवाज्यांमधून झिरपणारा प्रकाश, त्यांची वेगळी रचना आणि टीझरचं रहस्यमय वातावरण हे एकच संकेत देतं—या वर्षी काहीतरी खूप वेगळं, खूप अनपेक्षित घडणार आहे.
सध्या या सीझनबद्दलची माहिती पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आली असून पुढील काही दिवसांत घराची पहिली झलक, सदस्यांची यादी, थीमची अधिकृत घोषणा आणि या वर्षीच्या मोठ्या ट्विस्टची माहिती समोर येणार आहे. पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रात “Bigg Boss आदेश देत आहेत!” हा आवाज घुमणार असून मनोरंजनाचा सम्राट—बिग बॉस मराठी सिझन ६—लवकरच परततोय, फक्त कलर्स मराठीवर आणि JioHotstar वर!