दिवाळी हा वर्षातला सर्वात मोठा सण. लखलखते दिवे, फराळाचा घमघमाट, रंगांची उधळण, आकाशकंदिलाचा झगमगाट, उटण्याचा सुगंध आदी अनेक गोष्टी आकर्षणाच्या असतात. सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा आणि अंधारातून उजेडाकडे वाट दाखवणारा हा सण सगळ्यांच्याच आवडीचा आहे. दिवाळी दरवर्षी येत असली, तरी प्रत्येक दिवाळी तिची एक खास आठवण आपल्या मनात कायमची सोडून जाते. अशाच काही आठवणी आपल्याला सांगितल्या आहेत, आपल्या लाडक्या कलर्स मराठीवरील लोकप्रिय कलाकारांनी. चला तर जाणून घेऊया त्यांच्या दिवाळीच्या आठवणी आणि किस्से.
जय जय स्वामी समर्थ मालिकेत स्वामी समर्थांची भूमिका साकारणारे अभिनेते अक्षय मुडावदकर म्हणतात, “दिवाळीच्या माझ्या आठवणी वेगवेगळ्या टप्प्यावरच्या आहे. माझं बालपण नाशिकमध्ये गेलं. तिथली विशेष आठवण म्हणजे दिवाळीच्या सुट्टीत लपाछपी आणि क्रिकेट सारखे खेळ खेळून आम्ही खूप मजा करायचो. ह्या टप्प्यावर आमच्या कुटुंबात एका नवीन व्यक्तीचा परिचय झाला आहे. माझी पुतणी मनू. जी आमची दिवाळी आणखी खास बनवणार आहे. ही दिवाळी खरोखरच खास असणार आहे कारण आमच्या कुटुंबातील सर्वजण एकत्र असतील.”
सिंधुताई माझी माई मालिकेत सिंधुताईंची भूमिका साकारणारी शिवानी सोनार म्हणते, “माझी दिवाळीची आठवण अशी की, गेले ४-५ वर्ष कामामुळे दिवाळीला मी घरी नाही गेले. फक्त लक्ष्मीपूजनाला मी घरी जाते. माझ्यासाठी किल्ला बनवणे ही खूप जवळची आठवण आहे. मी आणि माझा भाऊ लहानपणी किल्ला बनवून, त्यावर मावळे ठेवायचो. किल्ला बनवणे म्हणजे एक वेगळाच उत्साह आणि मजा आहे.”
कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला मालिकेतील रत्नमाला म्हणजेच निवेदिता सराफ म्हणतात, “आम्ही लहान असताना आई खाजाचे कानोले, लाडू चिवडा असे अनेक स्वादिष्ट पदार्थ बनवत असे. लग्न झाल्यावर दिवाळीच्या वेळी सासरचे लोक माझ्या घरी येतात आणि आम्ही सगळे मिळून जेवतो. या वर्षी आम्ही आमच्या नातेवाईकांच्या घरी जाणार आहोत, तरीही मला हे सगळे दिवाळीचे पदार्थ बनवायला आवडतात. माझा मुलगा अनिकेत काही वर्षांपासून दूर आहे. आम्ही त्याला व्हिडिओ कॉल करतो आणि एकत्र दिवाळी फराळ करतो. मी त्याला दरवर्षी फराळ पाठवते. तसेच मी आणि अशोक, श्रद्धानंद महिला आश्रम आणि कुमुदबेन इंडस्ट्रियल होम फॉर ब्लाइंड मुलींना दिवाळीच्या फराळाचे वाटप देखील करतो. जे घरापासून दूर आहेत आणि एकटे साजरे करू शकत नाहीत त्यांना दिवाळीचा फराळ पुरवतो.”
कलर्स मराठीवरील रमा राघव मालिकेतील रमा म्हणजेच ऐश्वर्या शेटे म्हणते, “लहानपणी माझ्या कुटुंबात दिवाळीला तुळशीचं लग्न असायचं. सुरुवातीला आम्ही करत नव्हतो, पण शेजारी राहणाऱ्या माझ्या मावशीकडे तुळशीचा विवाह असायचा, म्हणून मी माझ्या आईलाही ते करायला पटवून दिलं. तेव्हापासून आम्ही दिवाळीला तुळशीविवाह मोठ्या उत्साहात साजरा करतो. माझा दिवाळीचा एक किस्सा म्हणजे, मला फटाक्यांची भीती वाटते कारण कोणीतरी बटरफ्लाय लावला होता आणि तो माझ्या ड्रेसमध्ये शिरला. ही वाईट आठवण असूनही, हा एक मजेदार किस्सा आहे. दिवाळीच्या काळात मला माझ्या मित्रांना आणि भावंडांना भेटायला मजा येते.”
कलर्स मराठीवरील रमा राघव मालिकेतील राघव म्हणजेच निखिल दामले म्हणतो, “माझ्या आजीचा केटरिंगचा व्यवसाय होता त्यामुळे दिवाळी आली की सगळे फराळाचे पदार्थ ती बनवायला घ्यायची आजही हे काम चालू आहे. लहान असताना तिला मी, बाबा, आई मदत करायचो आणि सगळे मिळून फराळ बनवायचो. आता कामामुळे मी जास्त घरी नसतो, पण तरी आजी, आई, बाबा आणि आत्या यांच्या मदतीने जेवढा जमेल तितका फराळ करत असते. खूप मजा येते आम्ही सगळे भेटतो सगळे घरी येतात.”
कलर्स मराठीवरील पिरतीच वानवा उरी पेटला मालिकेतील सावित्री म्हणजेच रसिका वाखारकर म्हणते, “दिवाळीबद्दलची माझी आवडती गोष्ट म्हणजे त्यातून मिळणारा विलक्षण उत्साह. वातावरण थंड होऊ लागते आणि रात्री सुंदर दिव्यांनी उजळून निघते. हे खूप रोमांचक आहे! दिवाळीचा विचार करते तेव्हा मला लहानपणी रांगोळ्या काढणे आणि किल्ले बनवल्याचे आठवते. जरी मी रांगोळ्या काढण्यात उत्तम नसले तरी माझी रांगोळी वेगळी दिसावी म्हणून मी वेगवेगळे रंग वापरत असे. मी दोन प्रकारच्या रांगोळ्या काढायचे – एक फुलांची आणि एक रंगांची. मी १०वी पूर्ण केल्यानंतर घरापासून दूर राहू लागली. आता खूप दिवसांनी कुटुंबाला भेटणं ही दिवाळीची आठवण असते.”
कलर्स मराठीवरील पिरतीच वानवा उरी पेटला मालिकेतील अर्जुन म्हणजेच इंद्रनील कामत म्हणतो, “दिवाळी म्हटलं की मला सुट्ट्या, आजोळ, मामाचं शेत, ती १०-१२ दिवसांची मजा आठवते. लहानपणी आजी आम्हाला ओळीने बसवायची आणि चंदन उगळायला लावायची. आमच्यासाठी सकाळी कोण लवकर उठेल आणि कोण अभ्यंग स्नान करेल एक स्पर्धाच असायची. अजून एक आठवण किल्ला बनवायची. मला अजूनही किल्ला बनवायची प्रचंड आवड आहे. पण आता वेळेअभावी जमत नाही. दिवाळी माझ्यासाठी त्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचं काम करते. नातं जपण्याची संधी दिवाळी देते असा मला वाटतं.”