प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांना ओळखत नसलेली व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. आपल्या कामाने, आपल्या जगण्याने आणि लिखाणाने कायम इतरांना प्रेरणा देणाऱ्या सुधा मूर्ती सर्वांसाठीच एक आदर्श आहेत. त्यांनी कायमच सर्वांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले. जीवनातील शिक्षणाचे स्थान काय असते, याची जाणीव सतत त्यांच्याशी बोलताना होत असते. सुधाजी यांनी लहान मुलांसाठी भरपूर लिखाण केले आहे. त्यांना आयुष्यात विविध चांगल्या गोष्टींचे महत्व समजावे या दृष्टीने त्यांनी त्यांचे लिखाण केले आहे.
सुधा मूर्ती यांचे लिखाण सगळ्यांसाठीच प्रेरणास्रोत आहे. आजच्या सोशल मीडियाच्या काळात अनेकांना पुस्तकं वाचण्यास कंटाळा येतो तर काहींना वाचण्यास वेळ नसतो. यावर एक तोडगा म्हणून मूर्ती मीडिया या कंटेट प्रोडक्शन हाऊस अर्थात आशय निर्मिती गृहाने ‘स्टोरी टाईम विथ सुधा अम्मा’ या अॅनिमेटेड सिरीजला लाँच केले आहे. नुकताच हा लॉन्चिंग सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. ही सिरीज एका युट्युब चॅनेलवर प्रसारीत केली जाणार आहे. या सोहळ्याला प्रसिद्ध लेखिका आणि पद्मभूषण पुरस्कार विजेत्या सुधा मूर्ती, या सिरीजसाठी अॅनिमेशनची निर्मिती करणाऱ्या ‘कॉसमॉस माया’च्या सीईओ मेघा टाटा, प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी आणि प्रसिद्ध संगीतकार शांतनू मोईत्रा यांनी उपस्थिती लावली होती.
शिक्षणासोबतच मुलांची करमणूक व्हावी हा मूर्ती मीडियाचा कायमच प्रयत्न राहिलेला आहे. ‘स्टोरी टाईम विथ सुधा अम्मा’ द्वारे लहान मुलांना सकारात्मक पद्धतीने माध्यमांचा आनंद घेता यावा हा प्रयत्न राहिलेला आहे. ‘स्टोरी टाईम विथ सुधा अम्मा’ मध्ये लहान मुलांचे मनोरंजन तर होतेच शिवाय त्यांना अनेक गोष्टी शिकताही येतात. गीतकार प्रसून जोशी आणि संगीतकार शांतनू मोईत्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्टोरी टाईम विथ सुधा अम्मा’च्या थीम साँगचे या कार्यक्रमात सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमात, सुधा मूर्ती यांनी आपल्या आयुष्यातील काही घटना सांगताना गोष्टी सांगण्याचे कसब किती महत्त्वाचे आहे आणि दुर्गम भागातील लहान मुलांनादेखील या गोष्टी पोहचवणे किती महत्त्वाचे आहे हे सांगितले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना सुधा मूर्ती म्हणाल्या की, “गोष्टी सांगणे ही एक कला आहे, ज्यामुळे लहान मुलेच नाही तर मोठी माणसेही ती लक्ष देऊन ऐकतात. ‘स्टोरी टाईम विथ सुधा अम्मा’ ही अपर्णा कृष्णन यांची कल्पना आहे. मूर्ती मीडियाने गोष्टी अॅमिनेशनच्या माध्यमातून जिवंत करण्याचा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे.”