हिंदी सिनेमासाठी ऐंशी चे दशक हे स्टार सन्स चे दशक होते. या दशकाच्या सुरुवातीलाच सुनील दत्त यांचे चिरंजीव संजय दत्त याचे ‘रॉकी’, राजेंद्र कुमार यांचा मुलगा कुमार गौरव ‘लव्ह स्टोरी’ धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देवल ‘बेताब’, मनोज कुमार यांचा मुलगा कुणाल गोस्वामी ‘दो गुलाब’ या चित्रपटातून रसिकांच्या पुढे आले. याच काळात राज कपूर यांचे तृतीय पुत्र राजीव कपूर यांचे देखील सिनेमात आगमन झाले. अर्थात राज कपूर ने राजीव कपूर ला लाँच करण्यासाठी काही स्वतःचे बॅनर वापरले नव्हते. राजीव कपूर एफसी मेहरा यांच्या ‘एक जान है हम’ या चित्रपटातून १९८३ रुपेरी पडद्यावर चमकला होता. गोरा गुलाबी वर्ण,बोलका चेहरा, भावस्पर्शी डोळे, चालण्या बोलण्यातील कपूर एटीट्यूड, पोरीना घायाळ करणारा किलिंग लूक सर्व काही होतं. (Yaad Teri Aayegi Mujhko Bada Satayegi)
पहिल्याच चित्रपटातून त्याने रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते. तो क्लिक होण्याचे दुसरे कारण म्हणजे या चित्रपटात राजीव कपूर यांनी त्याच्या काकाची म्हणजेच शम्मी कपूरची कम्प्लीट स्टाईल उचलली होती. शम्मी कपूरच्या डान्स स्टेप्स त्याचा अटायर त्याने हुबेहूब उचलला होता. त्यामुळे प्रेक्षकांना साठच्या दशकातील शम्मी कपूर पुन्हा अवतरला की काय असे वाटले. या चित्रपटात राजीव कपूरची नायिका दिव्या राणा होती. सिनेमा एक रोमँटिक लव्ह स्टोरी होता. फारसे काही ट्विस्ट आणि टर्नस त्यामध्ये नव्हते. तरीही त्यातील गाण्यामुळे हा चित्रपट प्रचंड गाजला.
पहिल्याच सिनेमाने राजीव कपूरची हवा निर्माण झाली. या चित्रपटाला संगीत अन्नू मलिक यांचे होते. तर यातील गाणी शब्बीर कुमार, आशा भोसले, किशोर कुमार यांनी गायले होते. यातील हर एक गाणं लोकप्रिय झालं होतं. दिल चाहे आसमान पे लिख तू नाम तेरा, बोलो कुछ तो बोलो दिल लगाना तुम क्या जानो (यातलं शेवटी असलेलं तारापापा चिकिरी रिक्का खूप ह्रिदमिक आहे) त्या काळात खूपच लोकप्रिय झालं होतं. यातील गाणी जितकी श्रवणीय होतं तितकीच प्रेक्षणीय देखील होती. अर्थात दिव्या रानासारखी कोऱ्या चेहऱ्याची अभिनेत्री असून देखील राजीव कपूर ने या गाण्यांमध्ये रंग भरले होते.
राजीव कपूर पहिल्याच सामन्यात यशस्वी झाला होता. या चित्रपटातील सर्व गाणी गाजली. परंतु जे गाणं आजही शब्बीर कुमारच्या टॉप टेन मध्ये घेतलं जातं ते या चित्रपटाचं शीर्षक गीत होतं. थेट रफी स्टाईल ने गायलेलं गाणं काळजात घर करतं. आज मात्र हे गाणं काळाच्या उदरात लुप्त झालं आहे. पण त्या काळात या गाण्याने चांगली लोकप्रियता हासील केली होती. यातील कडव्याच्या वेळेला टिपला जाणारा स्वर थेट रफीची आठवण करून देणार होता. पडद्यावर हे गीत गाताना राजीव कपूर ने देखील शम्मी स्टाईल मध्ये आपल्या अभिनयाचे रंग दाखवले होते.
यानंतर राजीव कपूरने पुन्हा कधीही कुठल्याही सिनेमात शम्मी कपूरची स्टाईल वापरली नाही. अर्थात ही का वापरली नाही हा प्रश्न मला नेहमी पडतो. कारण ती स्टाईल त्याला अतिशय स्युट होत होती आणि ती स्टाईल वापरणे काहीही गैर नव्हते. पण त्याने केवळ एका चित्रपटांमध्ये शम्मी कपूरची ती शैली वापरली आणि तो एकमेव त्याचा चित्रपट हिट ठरला. यानंतर काही चित्रपटातून तो रसिकांच्या पुढे येत राहिला पण त्याला यश मिळत नव्हते.
१९८५ साली राज कपूर ने त्याच्यासाठी ‘राम तेरी गंगा मैली’ हा चित्रपट निर्माण केला. या चित्रपटात त्याच्या ऐवजी बोलबाला झाला अभिनेत्री मंदाकिनीचा . इतरांच्या चित्रपटातून तो झळकत होता पण यश मिळत नव्हते. हळूहळू तो बॅक फुटवर येत गेला. राज कपूर यांच्या निधनानंतर ‘हिना’ चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी त्याने सांभाळली. त्यानंतर नव्वद च्या दशकामध्ये आर के बॅनरच्या ‘प्रेमग्रंथ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन त्याने केले. पुढे ‘आ अब लोट चले’ या सिनेमाची निर्मिती त्याने केली.
हळूहळू तो सिनेमा पासून दूर होत गेला. दोन हजार सालाच्या नंतर तो पुण्यात रहावयास आला. पुण्यातील कॅम्प भागातील अनेक हॉटेल्स मधून तो दिसत असे. कपूर खानदानीच्या परंपरेनुसार तो लवकरच गरगरीत झाला आणि गले लठ्ठ झाला. त्या काळात एकदा त्याच्याशी बातचीत करण्याचा योग आला होता. तेव्हा ,”मी लवकरच पुनरागमन करणार आहे चांगल्या भूमिकेच्या शोधात आहे!” अशी नेहमीची कॅसेट त्याने वाजवली. खरंतर राजीव कपूर याच्याकडे अभिनयाचे चांगले गुण होते. परंतु त्याच्यातील क्वालिटी कधी कुणाला कळालीच नाही.
आपल्याकडे भावंडांमध्ये एक जर कमी गुणवत्तेचा असेल तर तो झपाट्याने मागे पडतो आणि तो न्यूनगंडामध्ये जातो. समाजातील इतरांच्या यशापेक्षा घरातील भावंडांचा यश याचं अपयश आणखी मोठं करत जातं. राजीव कपूर सोबतच अनिल कपूर चा भाऊ संजय कपूर, तब्बूची बहिण फराह, अमीर खान चा भाऊ फैजल खान अशी अनेक उदाहरण देता येतील. या सर्वांना हाच सिंड्रोम आहे असे मला वाटते. ठीक आहे यांच्यात गुणवत्ता कमी असेल. परंतु त्यांना अंडरएस्टिमेट करून आपण त्यांचा आत्मविश्वास आणखी डळमळीत करतो हेदेखील खरे आहे.
कारण आपण कायम त्यांची तुलना त्यांच्या भावंडांची करत असतो. दुर्दैवाने एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून त्याकडे कधी पाहिले जात नाही. कायम तुलनात्मक स्वरूपात यांच्या कडे पाहिले जातात आणि तिथेच न्यूनगंडाचे, नैराश्याचे आणि वैफल्याचे वातावरण निर्माण होते. राजीव कपूर यांना आशुतोष गोवारीकर यांनी एका चित्रपटात भूमिका दिली होती दुर्दैवाने हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच राजीव कपूर यांचे ९ फेब्रुवारी २०२१ या दिवशी निधन झाले. राजीव च्या मनात खूप काही स्वप्न होती परंतु ती पूर्ण झाली नाही कपूर खानदानीतील एक फुल फुलण्याच्या आधीच सुकून गेलं. एक शापित राजपुत्र असच मला त्याच्या बाबत वाटतं.
आज राजीव कपूर यांची आठवण कुणालाही नाही परंतु या गाण्याच्या निमित्ताने आपण ती जागूयात.
चित्रपट : एक जान हैं हम (१९८३)
संगीत: अनु मलिक
गीतकार : अंजान
स्वर: शब्बीर कुमार