‘पठाण’ सिनेमात शाहरुख खान अर्थात एजंट पठाण च्या तोंडी एक संवाद आहे… ‘पठान के घर में पार्टी रखोगे, तो मेहमाननवाजी के लिए पठाण तो आएगा, साथ में पटाखे भी लाएगा!’ आता हा डायलॉग ऐकून नक्कीच थिएटरमध्ये टाळ्या वाजतात. पण, तर्कशुद्ध विचार केल्यास.. या डायलॉगचा काहीही तर्क लागत नाही. असंच काहीच ‘पठाण’ सिनेमाच्या बाबतीत देखील आहे. त्यामुळे प्रेक्षकहो! अगोदरच सावध करतोय.. सिनेमात तुम्ही ‘तर्क’ शोधायला जाऊ नका. नाहीतर हा सिनेमातील कल्पनाविलास तुमची डोकेदुखी ठरू शकेल. तद्दन ‘मसालापट’ (ज्याची आजच्या तारखेला शाहरुख खान कडून अपेक्षा नव्हती.)
यावेळी शाहरुखनं (Shah Rukh Khan) प्रेक्षकांसमोर आणला आहे. आजवर तुम्ही विविध बॉलिवूड, हॉलिवूड.. दाक्षिणात्य सिनेमांमध्ये पाहिलेलं बरंचसं काही या ‘पठाण’मध्ये लेखक-दिग्दर्शकाने भरलं आहे. त्यामुळे ‘तेच ते तेच…’ असं ‘पठाण’बाबत म्हणावे लागेल. सिंघम, टायगर, सूर्यवंशीपासून क्रिश सिनेमांमधील बरंच काही शाहरुख खानच्या ‘पठाण‘मध्ये या ना त्या कारणानं दिसतं. सोबतच ‘टॉम क्रूझ’ किंवा ‘विन डिझेल’सारख्या हॉलिवूड स्टारच्या कोणत्याही ॲक्शन सिनेमात असणारे स्टंट (हॉलीवूडपटांच्या तोडीचे नाही) दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने ‘पठाण’मध्ये पडद्यावर साकारले आहेत.
खासकरून जे आपल्याला आजवर सलमान खानच्या ‘ॲक्शन’पटांमध्ये दिसतं आले आहे. तो सर्व ‘मसालेदार’ मनोरंजनाचा मामला आता शाहरुख खानच्या ‘पठाण’मध्ये आहे. दस्तुरखुद्द सलमान खानचा तडका सिनेमावर पडल्याने तुम्हीच विचार करु शकता; सिनेमाला ‘सलमान टच’ आल्याशिवाय कसा काय राहील! हृतिक रोशन अभिनित ‘वॉर’ सिनेमाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद याने ‘पठाण’चे दिग्दर्शन केले आहे. प्रसिद्ध सिनेनिर्मिती संस्था ‘वायआरएफ’ अर्थात यशराज फिल्म्सने ‘पठाण’ सिनेमाच्या निमित्ताने ‘वायआरएफ स्पाय युनिव्हर्स’ प्रेक्षकांच्या समोर उभा केला आहे. ज्या युनिव्हर्समध्ये आता ‘वॉर’मधील कबीर (हृतिक रोशन), ‘एक था टायगर’ मधील टायगर (सलमान खान) आणि ‘पठाण’ म्हणजे शाहरुख खान आहे. ही सिनेमांची साखळी आता अशीच पुढे चालू राहणार आहे. सध्या ‘टायगर ३’चं सुद्धा कामकाज सुरु आहे.
उपरोक्त म्हंटल्याप्रमाणे ‘मसालेदार’ बॉलिवूड पटांच्या चौकटीत राहून सिनेमाची ‘पठाण’ सिनेमाची कथा ‘लिहिली’ आणि ‘मांडली’ केली गेली आहे. जी चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी पुरेशी आहे. पण, कल्पकता आणि सर्जनशीलतेच्या दृष्टीने हा सिनेमा सुमार आहे. त्यामुळे शाहरुखकडून तुमच्या खूप अपेक्षा असतील तर.. तुम्ही हा सिनेमा न पहिलेलाच बरा. कारण, जी प्रयोगशीलता यापूर्वी ‘फॅन’, ‘झिरो’ मध्ये प्रेक्षकांना दिसली होती; त्या प्रयोगशीलतेचा किंवा नवनिर्मितीचा लवलेश ‘पठाण’मध्ये मुळीच नाही. पण, तुम्ही शाहरुखचे वेडे चाहते आहात.. तर ‘हा सिनेमा निश्चितच तुमच्यासाठी आहे.’ सिनेमात केवळ ‘मसाला’ आहे. पण, एक अभिनेता म्हणून शाहरुखने त्याचा हा मसालापट अगदी ‘सटल’ पद्धतीने हाताळला आहे. काही दृश्यांचा अपवाद वगळल्यास शाहरुखच्या अभिनयात अवाजवीपणा दिसत नाही. नेहमीप्रमाणे तो नैसर्गिक अभिनय करताना दिसतो. जिकडे तो खरा आणि प्रामाणिक वाटतो. त्यामुळे शाहरुखचा हा ‘ऍक्शन हीरो’ प्रेक्षकांना आवडू लागतो.
कथेबद्दल सांगायचे तर, या कथेच्या केंद्रस्थानी एका सीक्रेट सर्व्हिस एजंटचं एक पात्र आहे. हा एजंट दहशतवाद्यांच्या कचाट्यात सापडला आहे. हा एजंट म्हणजे ‘जिम’ (जॉन अब्राहम). काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर शेजारील देश पाकिस्तानचे सैन्य अधिकारी इर्षेने पेटतात. बदला घेण्यासाठी पाकिस्तान हायटेक खासगी दहशतवादी टोळीची मदत घेतात. या टोळीत विविध देशांचे माजी सैन्य अधिकारी असतात. या टोळीचा म्होरक्या जिम (जॉन अब्राहम) हा एकेकाळी भारतीय गुप्तचर दलाचा भाग असतो, पण त्याच्यासोबत घडलेल्या एका अपघाताने तो देशाचा द्वेष करु लागतो.
जैव शस्त्राच्या (बायो व्हेपन) सहाय्याने भारतातील बड्या शहरांना निशाणा करण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे. ज्यात पाकिस्तानचा फायदा असतो आणि जिमीचा आर्थिक फायदा असतो. भारतीय गुप्तचर संस्थेला जिमच्या या हेतूचा सुगावा लागतो आणि ते त्यांच्या विरोधात त्यांचा सर्वात सक्षम एजंट पठाण (शाहरुख खान) ला पाचारण करतात. या मोहिमेदरम्यान पठाणची भेट डॉ. रुबिना (दीपिका पदुकोण) सोबत होते. कोण आहे रुबिना? असा कोणता विषाणू आहे जो देशाचा नाश करू शकतो? जिमची पार्श्वभूमी काय आहे? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पठाण त्याच्या जिमीला मात देण्यात यशस्वी होतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे ‘पठाण’मध्ये आहेत.
‘पठाण’मधील फॉर्मुला सलमानच्या ‘एक था टायगर’मध्येही होता. दहशतवादी निष्पाप परिचारिकांना ओलीस ठेवतात आणि त्यांना सोडवण्यासाठी टायगर आयएसआय एजंट कतरिनासोबत हातमिळवणी करतो आणि मग तिच्या प्रेमात पडतो. तसेच सैफ अली खानच्या ‘एजंट विनोद’मध्ये रॉ एजंट विनोद आयएसआय एजंट करीना कपूरला भेटून शत्रूंशी लढतो. आता शाहरुखच्या ‘पठाण’मध्येही दीपिका शाहरुखसोबत आयएसआय एजंट च्या भूमिकेत मिशनमध्ये सामील होते. ‘पठाण’मध्ये हा सर्व मामला पुन्हा गिरवला गेला आहे. (Pathaan Movie Review)
सिनेमाचा पूर्वार्ध काहीसा रटाळ असला तरी मजेशीर आहे. कथेत अनेक ट्विस्ट आणि टर्न्स आहेत; जे तुम्हाला कथेशी जोडून ठेवतील. उत्तरार्धात सिनेमा बराच लांबतो. वेगाने एकामागोमाग घटना घडतात. पूर्वार्धात पेरलेल्या काही खाचखळगे उत्तरार्धात मनोरंजक पद्धतीने प्रेक्षकांच्या समोर येतात. शाहरुख खान पहिल्यांदाच ‘मॉर्डन ऍक्शन हिरो’च्या अवतारात दिसला असून; तो जबरदस्त आहे. पण, व्हिएफएक्सच्या दृष्टीने ऍक्शन सिक्वेन्स आपली निराशा करतो. हेलिकॉप्टर, बस, ट्रेनवरील पकडा-पकडी, चेसिंग, ऍक्शन हास्यापद आणि सुमार आहे. ज्या प्रेक्षकांच्या नजरेत हॉलिवूडचे हायटेक ऍक्शन सिनेमे आहेत. त्यांच्यासाठी हे ऍक्शन सुमार आहे. ‘पठाण’ची पटकथा कधी सिद्धार्थ मल्होत्राची ‘अय्यरी’, कधी शाहरुखच्या ‘हॅप्पी न्यु ईयर’, ‘दिलवाले’ तर कधी दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्याच ‘वॉर’ सिनेमाची पुन्हा पुन्हा आठवण करून देतात. यासोबतच पटकथेत अशा अनेक बाबी दाखविण्यात आल्या आहेत, ज्या निराधार, तर्कशून्य वाटतात. पण, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे .. हा सिनेमा पाहताना प्रेक्षकांना आपली विवेकबुद्धी काहीकाळ बाजूला ठेवायची आहे.
झगमगीत लोकेशन, रोमान्स, कॉमेडी, डायलॉगबाजी, नाच-गाणं, देशभक्तीपर भावना आदी सर्व सिनेमात आहे. त्यामुळे ‘पठाण’ हा एक संपूर्ण ‘मसाला एंटरटेनमेंट’ सिनेमा आहे. कारण, ‘पठाण’ पाहताना प्रेक्षक-चाहते नाचताना, गाताना, ओरडतात.. टाळ्या-शिट्ट्या वाजवतात. एकंदरच काय? तर ‘पठाण’ प्रेक्षकांचा ‘दोन घडीचा विरंगुळा’ करतो. अभिनयाच्या तराजूत शाहरुख खान, दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम यांचे पारडे नेहमीप्रमाणे जड आहे. टायगर (सलमान खान)च्या एंट्रीने सिनेमाला नवी तरतरी येते. करण-अर्जुन हा मिलाफ बघण्याजोगा आहे. खासकरून सिनेमाच्या ‘पोस्ट क्रेडिट’ सिन मधील सलमान-शाहरुखचे संवाद त्यांचे सिनेविश्वात असलेले ‘अधिराज्य’ पुन्हा अधोरेखित करतात. ज्यावर अर्थातच टाळ्या-शिट्या पडल्याशिवाय राहत नाहीत.
सिनेमा : पठाण
निर्मिती : यशराज फिल्म्स
कथा/दिग्दर्शक : सिद्धार्थ आनंद
पटकथा : श्रीधर राघवन
कलाकार : शाहरुख खान, दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम
दर्जा : तीन स्टार