वेबसिरीजचा जमाना सुरु झाल्यापासून छोट्या पडद्यावर मनोरंजनाचे नवे दालन खुले झाले. अगदी आपल्या हातातील मोबाईवरही या वेबसिरीजला बघता येऊ लागले, आणि त्यांची लोकप्रियता अधिकाधिक वाढली. त्यातही काही वेबसिरिज अशा झाल्या, की त्यांच्या नव्या आणि नव्या भागांची कायम प्रतीक्षा करण्यात आली. या वेबसिरिजमधील पहिल्या क्रमांकावरील सिरिज राहिली आहे ती, पंचायत. फुलेरा नावाच्या गावातील अगदी साधीसुधी कथा. प्रत्येकाच्या आयुष्यात घडणा-या नित्याच्या घटना. सुटसुटीत संवाद. तशीच आपलीशी वाटतील अशी पात्रे यामुळे पंचायत ही सिरीज सुपरहिट ठरली.
या पंचायतमधील पहिल्या भागाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ही लोकप्रियता एवढी आहे की, आजही या पंचायतच्या पहिल्या भागातील सर्वाधिक संवांदाना मिम्स म्हणून वापरण्यात येते. ‘गजब बेईज्जती है..’ हा संवाद त्यातीलच एक आहे. आयटीबॉय म्हणून ओळखल्या जाणा-या जितेंद्र कुमारला या वेबसिरीजतून कमालीची लोकप्रियता मिळाली. याच पंचायतचे दोन भाग झाले असून त्याचा तिसरा भाग कधी येणार याची मोठी प्रतीक्षा होती. आता ही प्रतीक्षा संपली असून पंचायत-३ ही वेबसिरीज २८ मे रोजी ओटीटी प्लॅटफ्लॉर्मवर प्रदर्शित होईल, असे जाहीर करण्यात आले आहे.
फुलेरा गाव हे प्रत्येकाच्या घराघरात बसले आहे, ते पंचायत या वेबसिरीजमधून. आता हेच फुलेरा गाव २८ मे रोजी पुन्हा नव्या रुपात आपल्यासमोर येणार आहे. जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैजल मलिक, चंदन रॉय आणि सान्विका या सर्व कलाकारांची गॅंग पुन्हा पंचायत ३ मधून सर्व प्रेक्षकांना आपलीशी करतांना दिसणार आहे. पंचायत सिरीजच्या गेल्या दोन हंगामात फुलेरा गावातील रहिवासी वेगवेगळ्या आव्हानांशी लढतांना दिसले. ही आव्हानं म्हणजेच पंचायत सिरीजचे यश आहे. घरात आलेले पाहुणे, गावातील लग्न प्रसंग, बारसे, नामकरण प्रसंग, सरकारी योजनांची नावे, स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात महिलांचा सहभाग, महिला प्रमुखाची भूमिका, मुलीचा लग्न ठरवण्याचा प्रसंग, ग्रामदेवतांचा समारंभ अशा अगदी साध्या विषयांवर या पंचायतमधील कथा आहेत. पंचायतचे दिग्दर्शक दीपक कुमार मिश्रा यांनी या कथांमधूनच पंचायतला लोकप्रियतेच्या शिखरावर नेले आहे.
आता २८ मे रोजी प्रदर्शित होणा-या पंचायत ३ ची कथा चंदन कुमार यांनी लिहिली आहे. लोकप्रिय ठरलेल्या या वेबसिरीजचा हा तिसरा भाग कधी प्रदर्शित होईल, यासंदर्भात अनेक तर्क लढवले जात होते. देशात सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकांमुळे पंचायत ३ चे प्रदर्शन लांबले जाईल, असेही सांगण्यात आले होते. मात्र आता पंचायतच्या टीमने ही तारीख जाहीर केल्यानं प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. पंचायत ३ मध्ये सेक्रेटरी प्रभाव अधिक टाकत आहेत, की प्रधानजी, याचीही उत्सुकता आहे. (Panchayat Season 3)
एका अभियांत्रिकी पदवीधराच्या जीवनाचे वर्णन करणारी ही मालिका आहे. मोठ्या कंपनीत नोकरी न मिळालेला हा तरुण उत्तर प्रदेशातील फुलेरा या दुर्गम गावात पंचायत सचिव म्हणून सरकारी नोकरी स्विकारतो. त्यानंतर शहरी भागात मोठा झालेला हा तरुण फुलेरासारख्या गावाला मनापासून कसा स्विकारतो, ते यात दाखवण्यात आले आहे. कॅटसारख्या परीक्षेची तयारी करणारे सचिव अभिषेक आता ही तयारी सोडून फुलेरामध्येच रहाण्याचा निर्णय घेतो का हे पहाण्यासारखे आहे. या मालिकेचे चित्रीकरण मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील महोदिया गावात असलेल्या खऱ्या पंचायत कार्यालयात झाले आहे.
पंचायत वेबसिरीजच्या पहिल्या भागाचा प्रिमीअर ३ एप्रिल २०२० रोजी झाला. Amazon प्राइम व्हिडिओच्या या आठ भागांच्या मालिकेची लोकप्रियता पाहून तमिळ आणि तेलुगू या भाषेतही पंचायत डब करण्यात आली. पंचायतच्या दुस-या भागाची लोकप्रियताही अधिक होती. या दुस-या भागाचे वैशिष्ट म्हणजे, दोन दिवसाआधीच मालिका प्रदर्शित कऱण्यात आली होती. २० मे २०२२ रोजी प्रदर्शित होणारी मालिका १८ मे २०२२ रोजीच प्रदर्शित झाली. यासाठी प्रेक्षकांचा वाढता दबाव असल्याचे कारण देण्यात आले. आताही या पंचायत ३ ची तारीख २८ मे देण्यात आली आहे. पंचायतचा हा तिसरा भागही दुस-या भागासारखा आधीच प्रदर्शित होणार का याची चर्चा आहे.
=====
पंचायत – सामान्य माणसांचं सामान्य आयुष्य दाखवणारी असामान्य सिरीज
The Sabarmati Report Teaser: अंगावर शहारे आणणारा ‘द साबरमती रिपोर्ट’
=====