MIFF 2026 ची दिमाखदार सुरुवात; भारताचे माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र अभूतपूर्व वेगाने पुढे – डॉ. एल. मुरुगन

19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (MIFF 2026) रविंद्र नाट्य मंदिर येथे उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राने गेल्या काही वर्षांत केलेल्या उल्लेखनीय प्रगतीचा आढावा घेत, देश जागतिक सर्जनशील शक्ती म्हणून उदयास येत असल्याचे सांगितले.

उद्घाटन सोहळ्याला इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार, प्रसार भारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेता जयदीप अहलावत, एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम, फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. मुरुगन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राने अभूतपूर्व प्रगती केली आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘वेव्ह्ज’ (WAVES) परिषदेमुळे या क्षेत्राच्या वाढीची क्षमता जगासमोर आली आहे. भारत आज केवळ कंटेंट तयार करणारा देश नसून जागतिक स्तरावर विश्वासार्ह सर्जनशील भागीदार म्हणूनही ओळख निर्माण करत आहे.

भारतीय माध्यम आणि मनोरंजन उद्योगाने 2023 मध्ये 9 टक्क्यांची वाढ नोंदवत 2.78 ट्रिलियन रुपयांचा टप्पा गाठला असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे डिजिटल माध्यमांनी प्रथमच 1 ट्रिलियन रुपयांहून अधिक महसूल मिळवला आहे. 2028 पर्यंत हा उद्योग 3.3 ट्रिलियन रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा असून सात टक्क्यांहून अधिक वार्षिक वाढ कायम राहण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चित्रपटसृष्टीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, 2023 मध्ये देशात 1,900 हून अधिक चित्रपट प्रदर्शित झाले. चित्रपटगृहांच्या महसुलातही 16 टक्क्यांची वाढ झाली आहे. दुसरीकडे दूरचित्रवाणी आजही दर आठवड्याला सुमारे 74.5 कोटी प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असून ओटीटी आणि डिजिटल माध्यमांचे महत्त्वही सातत्याने वाढत आहे.

मिफ्फ अंतर्गत आयोजित करण्यात येणारा ‘वेव्ह्ज डॉक्युमेंटरी बाजार’ हा माहितीपट निर्माते, गुंतवणूकदार आणि जागतिक वितरक यांच्यातील महत्त्वाचा दुवा ठरत असल्याचेही डॉ. मुरुगन यांनी सांगितले. या माध्यमातून निर्मात्यांना बाजारपेठ, वितरण आणि आंतरराष्ट्रीय संधींबाबत आवश्यक मार्गदर्शन मिळते.

मुंबईला जागतिक सर्जनशीलतेचे केंद्र बनवण्याचा निर्धार

यावेळी बोलताना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मुंबई ही केवळ स्वप्नांची नगरी नसून सर्जनशीलतेचे केंद्र असल्याचे सांगितले. देश-विदेशातील चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांनी महाराष्ट्रातील उपलब्ध सुविधा आणि अनुकूल वातावरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

शेलार यांनी ‘वेव्ह्ज’ परिषद, मुंबईत सुरू झालेले ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ (IICT) आणि मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या तीन महत्त्वाच्या उपक्रमांचा विशेष उल्लेख केला. मराठी चित्रपटांना जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यात मिफ्फची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अनेक सकारात्मक निर्णय घेतले असल्याचे सांगताना त्यांनी राज्यातील शासकीय जागांवर चित्रिकरणासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नसल्याची माहिती दिली. तसेच ‘वन विंडो सिस्टीम’च्या माध्यमातून विविध परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील आकाशवाणीच्या विस्तीर्ण जागेवर अत्याधुनिक मीडिया हब उभारण्याची योजना सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे मीडिया, चित्रपट आणि सर्जनशील उद्योग क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लघुपट, माहितीपट आणि अॅनिमेशन चित्रपट हे सर्जनशीलतेचे प्रभावी आणि आव्हानात्मक माध्यम असल्याचे सांगत, मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नव्या कल्पना, नव्या कथा आणि नव्या प्रतिभांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देईल, असे शेलार यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी केले, तर एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी आभार मानले. यावेळी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ज्युरी सदस्यांचा तसेच चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

======
हे देखील वाचा : MIFF 2026: मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी माहितीपट आणि लघुपटांना प्रथमच स्वतंत्र व्यासपीठ

======

Spread the love

Related posts

MIFF 2026: मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी माहितीपट आणि लघुपटांना प्रथमच स्वतंत्र व्यासपीठ

पुण्यात पुन्हा सजणार ‘मराठी फिल्म फेस्टिव्हल’; क्लासिक चित्रपटांपासून चर्चासत्रांपर्यंत खास मेजवानी

२४व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या ‘मराठी सिनेमा कॉम्पिटिशन’मध्ये ‘तिघी’ची अधिकृत निवड

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More