प्रेक्षकांच्या बदलत्या सवयी आणि मोबाईल स्क्रीनच्या वाढत्या वापरामुळे चित्रपटसृष्टीत कथाकथनाच्या नव्या पद्धती वेगाने उदयास येत आहेत. याच पार्श्वभूमीवर 19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (MIFF) “फास्ट फिल्म: मायक्रो ड्रामा हे सिनेमाचे ‘फास्ट फॅशन’ आहे का?” या विषयावर एक महत्त्वपूर्ण परिसंवाद आयोजित करण्यात आला.
या चर्चेचे सूत्रसंचालन अभिनेत्री शीना चौहान यांनी केले. या सत्रात चित्रपट निर्माते समीर मोदी, अभिनेत्री अर्चना कवी, अभिनेता उज्ज्वल कुमार आणि चित्रपट निर्माते राफेल स्टॅम्पलेव्स्की यांनी सहभाग घेतला. या सर्वांनी मायक्रो ड्रामाच्या वाढत्या प्रभावावर आणि समकालीन कथाकथनावर त्याच्या परिणामांवर आपले विचार मांडले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला MIFF चे महोत्सव संचालक प्रकाश मगदूम यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करत वक्त्यांचा सत्कार केला. बदलत्या मीडिया जगात नवीन कथाकथन प्रकार समजून घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
चर्चेदरम्यान सर्व वक्त्यांचे एकमत होते की मायक्रो ड्रामा हा बदल हा केवळ ट्रेंड नसून प्रेक्षकांच्या बदलत्या पाहण्याच्या सवयींचा नैसर्गिक परिणाम आहे. जरी हा फॉर्मॅट कालावधीने लहान असला, तरी त्यासाठी पारंपरिक सिनेमाइतकीच सर्जनशीलता, अचूक लेखन आणि प्रभावी अभिनय आवश्यक असतो.
समीर मोदी यांनी सांगितले की कोविड काळानंतर मोबाईलवर कंटेंट पाहण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आणि त्यातूनच मायक्रो ड्रामाला मोठी गती मिळाली. त्यांच्या मते, मर्यादित वेळेत प्रभावी कथा सांगणे हे या फॉर्मॅटचे सर्वात मोठे आव्हान आहे. त्यामुळे लेखन, अभिनय आणि एडिटिंगमध्ये अत्यंत अचूकता आवश्यक ठरते. त्यांनी हेही स्पष्ट केले की मायक्रो ड्रामाला हलक्यात घेण्याची गरज नाही, कारण हे एक स्वतंत्र आणि विकसित होत जाणारे कथाकथन माध्यम आहे.
अर्चना कवी यांनी सांगितले की प्रत्येक तांत्रिक बदलासोबत कथाकथनाची भाषा बदलत गेली आहे. मायक्रो ड्रामामध्ये प्रेक्षकांचे लक्ष पहिल्याच काही सेकंदात खेचणे हे सर्वात मोठे आव्हान असते. पण याचसोबत कलाकार, लेखक आणि दिग्दर्शकांसाठी ही नवी संधीदेखील निर्माण करते.
उज्ज्वल कुमार यांनी स्पष्ट केले की कथा कितीही लहान असो वा मोठी, भावनिक जोड हीच सर्वात महत्त्वाची असते. कमी वेळेत प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी कलाकारांनी सतत स्वतःला अपडेट ठेवणे गरजेचे आहे. स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे मायक्रो ड्रामाला मोठा प्रेक्षकवर्ग मिळण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
राफेल स्टॅम्पलेव्स्की यांनी मायक्रो ड्रामाला एकाच वेळी आव्हान आणि संधी असे संबोधले. त्यांच्या मते, स्क्रीनचा आकार बदलला तरी कथाकथनाचा आत्मा तोच राहतो—मानवी भावना आणि मजबूत कथा. त्यामुळे मायक्रो ड्रामा हा चित्रपट भाषेच्या उत्क्रांतीतील एक नवा टप्पा आहे.
या चर्चेचा शेवट या निष्कर्षावर झाला की मायक्रो ड्रामा हा “फास्ट फॅशन” नसून, प्रेक्षकांच्या बदलत्या गरजांना प्रतिसाद देणारी एक नवी कथाकथन पद्धत आहे. पारंपरिक चित्रपट आणि डिजिटल कंटेंट यामधील दुवा साधण्याची क्षमता या फॉर्मॅटमध्ये आहे.
कार्यक्रमानंतर झालेल्या प्रश्नोत्तर सत्रातही मायक्रो ड्रामाच्या संधी आणि आव्हानांवर सखोल चर्चा झाली. बदलत्या पाहण्याच्या सवयींमुळे कथाकथनाच्या नव्या शक्यता निर्माण होत आहेत, यावर सर्वांचे एकमत झाले.