MIFF 2026: मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी माहितीपट आणि लघुपटांना प्रथमच स्वतंत्र व्यासपीठ

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF) यंदा मराठी चित्रपटांसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC) आयोजित 19 वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 15 ते 21 जूनदरम्यान मुंबईत रंगणार असून, यंदाच्या महोत्सवात प्रथमच मराठी माहितीपट आणि लघुपटांना स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी ही माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील तसेच पीआयबीच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा उपस्थित होत्या.

1990 मध्ये सुरू झालेल्या या द्वैवार्षिक महोत्सवाचे हे 19 वे पर्व आहे. यंदा महोत्सवासाठी तब्बल 1,459 चित्रपटांच्या नोंदी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी स्पर्धा विभागासाठी 144 चित्रपटांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये 92 भारतीय आणि 52 आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय स्पर्धाबाह्य विभागात 202 चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत.

स्पर्धाबाह्य विभागात 46 देशांतील चित्रपटांचा समावेश असून ‘बेस्ट ऑफ फेस्टिव्हल्स’, ‘ऑस्कर विजेते चित्रपट’, ‘रेमंड क्रुमे रेट्रोस्पेक्टिव्ह’, ‘एनएफडीसी रिस्टोर्ड फिल्म्स’ आणि ‘इकोज फ्रॉम नॉर्थईस्ट’ यांसारखी विशेष पॅकेजेस प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत.

महोत्सवातील प्रमुख आकर्षणांमध्ये ज्येष्ठ ॲनिमेशन दिग्दर्शक रेमंड क्रुमे यांचा रेट्रोस्पेक्टिव्ह आणि त्यांची विशेष मास्टरक्लास यांचा समावेश आहे. तसेच प्रसिद्ध माहितीपट निर्माते डेव्हिड अ‍ॅटनबरो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘सीक्रेट्स ऑफ वाइल्ड इंडिया’ या चित्रपटाचे विशेष प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे.

यंदा प्रथमच महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या सहकार्याने मराठी माहितीपट आणि लघुपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ‘इकोज फ्रॉम नॉर्थईस्ट’ या नव्या विभागाचीही भर घालण्यात आली आहे.

19th MUMBAI INTERNATIONAL FILM FESTIVAL, (MIFF)

महोत्सवादरम्यान 10 मास्टरक्लास, नॉलेज सिरीज, भारतीय माहितीपट निर्माते संघटनेचा (IDPA) ओपन फोरम तसेच ‘वेव्हज डॉक बाजार’च्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे. डॉक बाजारसाठी 155 प्रस्ताव प्राप्त झाले असून निवडक प्रकल्पांना मार्गदर्शन आणि उद्योग क्षेत्राशी जोडणारे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे.

चित्रपटनिर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर लक्षात घेऊन एल अँड टी माइंडट्रीच्या सहकार्याने एआय फिल्ममेकिंग हॅकाथॉनचेही आयोजन करण्यात येणार आहे.

महोत्सवाचे उद्घाटन आणि समारोप प्रभादेवी येथील रविंद्र नाट्य मंदिरात होणार आहे. एनएफडीसीच्या पाच प्रदर्शन स्थळांसह इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) तसेच बांद्रा आणि विलेपार्ले येथील दोन महाविद्यालयांमध्येही चित्रपटांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विभागांमध्ये एकूण 18 पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून त्यासाठी 45 लाख रुपयांची पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. याशिवाय 10 लाख रुपयांचा प्रतिष्ठेचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारही प्रदान केला जाणार आहे. विशेष म्हणजे, व्ही. शांताराम यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त त्यांच्यावरील चरित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

स्वाती म्हसे-पाटील यांनी सांगितले की, प्रथम पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकासाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत 1 लाख रुपयांचे विशेष पारितोषिक दिले जाते. तसेच 16 ते 20 जूनदरम्यान दादरच्या रविंद्र नाट्य मंदिरात दररोज सायंकाळी 6.30 ते 8.30 या वेळेत 19 निवडक मराठी माहितीपट आणि लघुपटांचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

या प्रदर्शनामध्ये सामाजिक जाणीव, महिला सक्षमीकरण, मानसिक आरोग्य, ग्रामीण जीवन, सांस्कृतिक वारसा आणि मानवी नातेसंबंध यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरील चित्रपटांचा समावेश आहे.

यावेळी त्यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली. महाराष्ट्र शासनाने मराठी माहितीपटांसाठीची आर्थिक मदत 10 लाख रुपयांवरून 25 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला असून, दर्जेदार माहितीपट निर्मितीला चालना देण्यासाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ हे केवळ चित्रीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यापुरते मर्यादित न राहता आशयप्रधान निर्मिती आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रातही सक्रिय भूमिका बजावत असून, मोठ्या प्रमाणावर विविध चित्रपट प्रकल्पांवर काम सुरू असल्याची माहितीही स्वाती म्हसे-पाटील यांनी यावेळी दिली.

Spread the love

Related posts

MIFF 2026 ची दिमाखदार सुरुवात; भारताचे माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र अभूतपूर्व वेगाने पुढे – डॉ. एल. मुरुगन

पुण्यात पुन्हा सजणार ‘मराठी फिल्म फेस्टिव्हल’; क्लासिक चित्रपटांपासून चर्चासत्रांपर्यंत खास मेजवानी

२४व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या ‘मराठी सिनेमा कॉम्पिटिशन’मध्ये ‘तिघी’ची अधिकृत निवड

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More