MIFF 2026 : लघुपट हे नवोदितांसाठी प्रभावी व्यासपीठ; नीना कुलकर्णींचे मत

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF) 2026 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने मराठी भाषेतील निवडक 19 लघुपट आणि माहितीपटांचा विशेष महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. 16 ते 20 जून 2026 या कालावधीत दररोज सायंकाळी 6.30 वाजता मराठी लघुपटांचे प्रदर्शन होत असून, या उपक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, 17 जून रोजी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघु नाट्यगृहात ‘वेणी’, ‘जास्वंद’, ‘पॅम्प्लेट’, ‘महल्लेज् स्कूल’ आणि ‘अर्जुन’ या पाच लघुपटांचे प्रदर्शन करण्यात आले. विविध विषयांवर आधारित या लघुपटांनी प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडले.

विशाल जेजुरकर दिग्दर्शित ‘वेणी’ या लघुपटात पती-पत्नी, त्यांचा मुलगा यश आणि अल्झायमर्सने ग्रस्त असलेल्या आजीच्या आयुष्याभोवती फिरणारी संवेदनशील कथा मांडण्यात आली आहे.

तर शोनिल यलट्टीकर दिग्दर्शित ‘जास्वंद’ हा लघुपट वयाच्या सत्तरीतील एका जोडप्याच्या नातेसंबंधांवर आधारित आहे. या लघुपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी प्रभावी भूमिका साकारल्या आहेत.

दिग्दर्शक शेखर रणखांबे यांच्या ‘पॅम्प्लेट’ या लघुपटात अंधश्रद्धेच्या प्रसारावर मार्मिक भाष्य करण्यात आले आहे. एक साधी अंधश्रद्धा लहान मुलाचे बालपण कसे हिरावून घेते आणि आजच्या काळात त्याच प्रकारचा प्रभाव व्हॉट्सअॅप फॉरवर्ड्समधून कसा दिसून येतो, याकडे हा लघुपट लक्ष वेधतो.

अक्षय इंगळे दिग्दर्शित ‘महल्लेज् स्कूल’मध्ये कोरोना काळात घरातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी, त्यांचे भावविश्व आणि त्यांच्या मनातील संघर्ष प्रभावीपणे मांडण्यात आले आहेत.

तर शिवराज वायचळ दिग्दर्शित ‘अर्जुन’ हा लघुपट एका अंध मुलाच्या आयुष्यावर आधारित आहे. अर्जुन हा अंध असला तरी नवनवीन गोष्टी शिकण्याची त्याची जिद्द आणि उत्सुकता प्रेक्षकांना प्रेरणा देते. जगाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन या कथेतून प्रभावीपणे समोर येतो.

या पाचही लघुपटांशी संबंधित कलाकार यावेळी नाट्यगृहात उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनीही या महोत्सवाला विशेष उपस्थिती दर्शवली.

चित्रपटांच्या प्रदर्शनानंतर दिग्दर्शकांनी प्रेक्षक आणि पत्रकारांशी संवाद साधत आपल्या लघुपटांच्या निर्मितीप्रवासाबद्दल माहिती दिली. अत्यंत हलक्याफुलक्या वातावरणात झालेल्या या चर्चेमध्ये प्रेक्षकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

यावेळी नीना कुलकर्णी यांनी नवोदित दिग्दर्शकांच्या कामाचे विशेष कौतुक केले. त्या म्हणाल्या, “हे तरुण दिग्दर्शक मराठी चित्रपटसृष्टीत सकारात्मक बदल घडवत आहेत. लघुपट हे नवोदित दिग्दर्शकांसाठी अत्यंत प्रभावी माध्यम आहे. या माध्यमातून त्यांना स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळते आणि त्याच ओळखीच्या बळावर पुढे मोठ्या प्रकल्पांमध्ये काम करण्याचे दरवाजे उघडतात. कमी वेळेत प्रभावीपणे संदेश पोहोचवणे हे लघुपटाचे मोठे आव्हान आहे आणि त्यासाठी दिग्दर्शकांची खरी कसोटी लागते.”

======

हे देखील वाचा : Mumbai International Film Festival : मायक्रो ड्रामा म्हणजे ‘फास्ट फॅशन’ नव्हे, तर सिनेमाची नवी उत्क्रांती

======

Spread the love

Related posts

आशियाई सिनेमाची नवी लाट: MIFF 2026 मधील Busan Next Wave विभाग ठरला खास

मुलांसाठी सिनेमा हा बदलाचा आवाज: MIFF 2026 मध्ये मान्यवरांचे मत

मराठी लघुपट–माहितीपटांचा विशेष महोत्सव; 19 निवडक कलाकृतींनी रंगणार मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More