कलाकारांना त्यांच्या कामाबद्दल शाबासकी थाप म्हणून त्यांना विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात येत असते. कलाकारांना विविध पुरस्कार देऊन त्यांना त्यांच्या कामासाठी अधिक प्रोत्साहित केले जाते. सध्या मराठी मनोरंजनविश्वात अनेक पुरस्कार सोहळे संपन्न होत आहेत. अनेक वाहिन्या त्यांचे पुरस्कार सोहळे आयोजित करताना आपल्याला पाहायला मिळतात. ‘फक्त मराठी’ या वाहिनीने देखील त्यांचे पुरस्कार आयोजित केले होते. अतिशय लोकप्रिय आणि बहुप्रतिक्षित असणारे ‘फक्त मराठी सिने सन्मान २०२३’. नुकतेच दणक्यात संपन्न झाले. दरवर्षी प्रेक्षक या पुरस्कारांची मोठ्या आतुरतेने वाट बघतात.
मराठी मनोरंजन विश्वात आपले वेगळेपण कायमच अधोरेखित करत अल्पावधीत प्रतिष्ठेचा ठरलेला आणि गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट बघत होते असा ‘फक्त मराठी सिने सन्मान २०२३’ हा पुरस्कार सोहळा २८ ऑक्टोबरला शनिवारी संध्याकाळी ७.०० वा. आणि २९ ऑक्टोबरला रविवारी दुपारी १२.०० वा. फक्त मराठी वाहिनीवर प्रसारित केला जाणार आहे. या पुरस्काराच्या मुख्य सोहळ्याआधी शनिवारी संध्याकाळी ६. ३० वा. आणि रविवारी दुपारी ११. ३० वा. रेड कार्पेटची आकर्षक झलक दाखवण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे या पुरस्कार सोहळ्याचा आस्वाद सलग दोन दिवस प्रेक्षकांना घेता येणार असून या सोहळ्याचे पूर्वरंग २२ ऑक्टोबरला रविवारी सकाळी ११.३० वाजता आणि संध्याकाळी ५. ३० वाजता पाहायला मिळणार आहेत.
A post shared by faktmarathitv (@faktmarathitv)
https://www.instagram.com/reel/Clft-fujcDA/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading
मनोरंजनाचा ‘फूल ऑन तडका’, कलाकारांचे एकापेक्षा एक जबरदस्त नृत्याविष्कार आणि मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वच लहान मोठ्या दिग्गज कलाकारांची मांदियाळी असा जबरदस्त नजराणा असलेला हा सोहळा मोठ्या थाटामाटात काही दिवसांपूर्वी पार पडला. बॉलीवूडमधले ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी या सोहळ्याला विशेष उपस्थिती लावत सोहळ्याला चार चांद लावले. अतिशय उत्साहात संपन्न झालेल्या या सोहळ्यात कलाकारांच्या धमाकेदार सादरीकरणाने उपस्थितांचे भरपूर मनोरंजन केले. यंदा या सोहळ्याचे दुसरे वर्ष होते.
या रंगतदार सोहळ्याचे सूत्रसंचालन आपल्या खुमासदार शैलीमध्ये अभिनेता अमेय वाघ आणि ओंकार भोजने यांनी केले. या दोघांच्या भन्नाट निवेदनाने कार्यक्रमाची रंगत चांगलीच वाढवली. अभिनेता शुभंकर तावडे याच्या सुरेख गणेश वंदनेने सोहळ्याला सुरुवात झाली. शिव ठाकरे, मानसी नाईक, वैदेही परशुरामी कलाकारांच्या धमाकेदार सादरीकरणाने उपस्थितांचे मनमुराद मनोरंजन केले. रुपेरी पडद्यावरील कलाकारांचे, त्यांच्या कामाचे पुरस्काररूपी कौतुक करण्यासाठी ‘फक्त मराठी वाहिनी’ तर्फे आयोजित करण्यात आलेला हा नेत्रदीपक सोहळा प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करेल, असा विश्वास फक्त मराठी वाहिनीच्या हेड पल्लवी मळेकर यांनी व्यक्त केला.
या पुरस्कार सोहळ्यात ‘गोदावरी’, ‘वाळवी’, ‘वेड’, ‘अनन्या’, ‘गोष्ट एका पैठणीची’, ‘टाईमपास ३’, ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘घर बंदुक बिर्याणी’ अशा अनेक चित्रपटांना नामांकन देण्यात आली आहेत. त्यामुळे या वर्षी कोणता चित्रपट बाजी मारणार हे पाहणे आसूक्त्याचे ठरणार आहे. फक्त मराठी वाहिनीवर प्रक्षेपित होणाऱ्या ‘फक्त मराठी सिने सन्मान २०२३’ या रंगतदार सोहळ्याचा आस्वाद घेण्यासाठी शनिवार २८ ऑक्टोबर आणि रविवार २९ ऑक्टोबर अवश्य राखून ठेवा.