J.P. दत्तांच्या 1997 मधील ‘बॉर्डर’ने हिंदी सिनेमात युद्धपटाची एक अजरामर ओळख निर्माण केली होती. देशभक्ती, भावना आणि संगीत यांचा संगम असलेला तो सिनेमा आजही प्रेक्षकांच्या मनात ताजा आहे. त्यामुळे ‘बॉर्डर 2’ कडून अपेक्षा मोठ्या होणं साहजिक होतं. सुदैवाने, हा सिनेमा मूळ चित्रपटाचा आत्मा जपत, अधिक भव्य कॅनव्हासवर कथा मांडतो. (Border 2 Review)
1971 च्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा तीन जिवलग मित्रांभोवती फिरते — मेजर होशियार सिंग दहिया, फ्लाइंग ऑफिसर निर्मल जित सिंग सेखों आणि लेफ्टनंट कमांडर महेंद्र एस. रावत. नॅशनल वॉर अकॅडमीत घडलेली त्यांची मैत्री, आणि नंतर जमीन, आकाश व समुद्रावर वेगवेगळ्या आघाड्यांवर लढण्याची वेळ येणं, ही या चित्रपटाची भावनिक रीढ आहे. त्यांचे मार्गदर्शक लेफ्टनंट कर्नल फतेह सिंग कालेर यांच्या भूमिकेत सनी देओल प्रभावी ठरतो.
निधी दत्तांची कथा माहितीपूर्ण आणि सिनेमॅटिक आहे. सुमित अरोरा आणि अनुराग सिंग यांचे पटकथालेखन समजायला सोपे असून, त्यात भावनिक क्षणांसोबत टाळ्या मिळवणारे प्रसंगही आहेत. संवाद नाट्यमय असले तरी ते बऱ्याच ठिकाणी नैसर्गिक वाटतात.
दिग्दर्शक अनुराग सिंग यांचे दिग्दर्शन हा चित्रपटाचा मोठा प्लस पॉइंट आहे. युद्धदृश्यं गोंधळात न टाकता प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. इंटरव्हल ब्लॉक आणि शेवटचे 15 मिनिटं प्रचंड ऊर्जा निर्माण करतात. त्याच वेळी, जवानांच्या कुटुंबांचं आयुष्य, गावात वाट पाहणाऱ्या पत्नी आणि आई-वडिलांची भीती, आशा आणि वेदना या सगळ्याच भावना चित्रपटाला मानवी स्पर्श देतात.
मात्र, काही ठिकाणी चित्रपटाची लांबी जाणवते. पहिल्या भागात प्रेमकथेच्या शेवटी थोडा कंटाळा येतो, तर दुसऱ्या भागात युद्ध सुरू असताना काही दृश्यं अपेक्षेइतकी परिणामकारक ठरत नाहीत. नौदल युद्धातील काही VFX आजच्या काळात थोडी जुनी वाटतात. तरीही या उणिवा चित्रपटाचा एकूण प्रभाव कमी करत नाहीत.
अभिनयाच्या बाबतीत सनी देओल हा चित्रपटाचा खरा आधारस्तंभ आहे. युद्धातील त्याची गर्जना जितकी प्रभावी आहे, तितकाच भावनिक प्रसंगांमधील त्याचा संयम मनाला भिडतो. वरुण धवन आपल्या भूमिकेत प्रामाणिक आहे, जरी त्याचा लहेजा काही ठिकाणी कृत्रिम वाटतो. दिलजीत दोसांझ सहजतेने आपली भूमिका साकारतो, तर अहान शेट्टी प्रयत्नशील दिसतो. मोना सिंग, सोनम बाजवा आणि मेधा राणा यांची छोटी पण परिणामकारक उपस्थिती लक्षात राहते. सहाय्यक कलाकारांनीही आपल्या भूमिका प्रभावीपणे निभावल्या आहेत.
संगीत हा चित्रपटाचा मोठा आधार आहे. ‘घर कब आओगे’, ‘जाते हुए लम्हों’ आणि ‘संदेसे आते हैं’सारखी गाणी आजही अंगावर काटा आणतात. पार्श्वसंगीत युद्धदृश्यांचा प्रभाव अधिक वाढवतं.
एकूणच, ‘बॉर्डर 2’ हा भावना आणि शौर्य यांचा समतोल साधणारा भव्य युद्धपट आहे. काही उणिवा असूनही, सनी देओलची दमदार उपस्थिती, भावनिक कथा आणि मोठ्या पडद्यावरचा अनुभव यामुळे हा सिनेमा थिएटरमध्ये पाहण्यासारखा ठरतो. संदेसे आजही येत राहतील.
सिनेमा : बॉर्डर 2 (Border 2)
निर्माते : टी सीरिज फिल्म्स, जे. पी. फिल्म्स
दिग्दर्शक : अनुराग सिंग
कथा : निधी दत्ता
कलाकार : सनी देओल, वरुण धवन, दलजित दोसांज, अहान शेट्टी आदी.
दर्जा : चार स्टार