परदेशात चित्रीकरण करणे हे मराठी सिनेसृष्टीसाठी नवे राहिलेले नसले तरी भारतातीलच अशा ठिकाणी चित्रीकरण करणे, जिथे समुद्रसपाटीपासून हजारो फूट उंचीवर ऑक्सिजनची कमतरता आणि हवामानाचा कोणताही अंदाज नाही, हे खरोखरच आव्हानात्मक आहे. हे ठिकाण म्हणजे भारताच्या ईशान्य भागातील सुंदर सिक्कीम. दिग्दर्शक स्नेह पोंक्षे यांच्या ‘बंजारा’ या चित्रपटाचे चित्रीकरण निसर्गरम्य सिक्कीममध्ये झाले आहे. त्यामुळे हा केवळ मराठीच नाही, तर भारतीय सिनेसृष्टीतील पहिला चित्रपट ठरला आहे, ज्याचे संपूर्ण चित्रीकरण सिक्कीममध्ये पार पडले आहे.
यापूर्वी ‘बंजारा’ च्या पोस्टर आणि टिझरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. सिक्कीमच्या नयनरम्य सौंदर्याचा अनुभव आणि मित्रांची रोमांचकारी बाईक राईड पाहून अनेक प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र, पडद्यावर जितके सहज आणि मोहक दिसते, तितकेच या ठिकाणी प्रत्यक्ष चित्रीकरण करणे कठीण होते. याबाबत दिग्दर्शक स्नेह पोंक्षे यांनी त्यांचा अनुभव सांगितला.

ते म्हणतात, “सिक्कीममध्ये आजवर कोणत्याही चित्रपटाचे चित्रीकरण झाले नव्हते. या ठिकाणाचे सौंदर्य कुणालाही भुरळ घालेल. आम्ही जवळपास १४,८०० फूट उंचीवर चित्रीकरण केले, जिथे ऑक्सिजन खूपच कमी होता. शूटिंगदरम्यान आम्हाला सतत ऑक्सिजन स्प्रे आणि कापूरचा वापर करावा लागला. हवामानाचा काहीही भरवसा नव्हता—एक क्षणी सूर्यप्रकाश असायचा, तर दुसऱ्याच क्षणी पाऊस! आमच्या नऊ दिवसांच्या शेड्युलमध्ये सतत पाऊस पडत होता. वेळ बदलता येत नसल्याने कठीण परिस्थितीत शूटिंग पूर्ण करावे लागले. जवळपास दीडशे जणांच्या टीमसोबत आम्ही तिथे गेलो होतो आणि स्थानिक शंभरहून अधिक लोकही सहभागी झाले होते. अशा वातावरणात चित्रीकरण करणे हे मोठे आव्हान होते. या संपूर्ण प्रवासात आम्हाला भारतीय लष्कराचे मोठे सहकार्य लाभले.”
मैत्री आणि आत्मशोधाचा सुंदर संदेश देणारा ‘बंजारा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वी. एस. प्रॉडक्शन्स आणि मोरया प्रॉडक्शन्स प्रस्तुत या चित्रपटाची कथा, पटकथा आणि लेखन स्नेह पोंक्षे यांनीच केले आहे. यात शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेह पोंक्षे, सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच रोहिणी विजयसिंह पटवर्धन आणि शरद पोंक्षे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.