गावच्या राजकारणात सरपंच आणि उपसरपंच यांच्यातील नोक-झोक हा कायमच चर्चेचा विषय असतो. आता हीच मजा प्रेक्षकांना पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनुभवी अभिनेते शशांक शेंडे आणि आपल्या खास विनोदी शैलीसाठी ओळखला जाणारा ओंकार भोजने हे दोघे ‘सालबर्डी’ या आगामी चित्रपटात सरपंच आणि उपसरपंचांच्या भूमिकेत आमने-सामने दिसणार आहेत.
ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित या कथेत शशांक शेंडे सरपंच गणपत पाटील तर ओंकार भोजने उपसरपंच मुकिंदा थोरात यांची भूमिका साकारत आहेत. या दोघांमधील संवाद, टोलेबाजी आणि गावच्या राजकारणातून निर्माण होणारे प्रसंग चित्रपटाला वेगळीच रंगत देणार आहेत. येत्या १७ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
या भूमिकेबद्दल बोलताना शशांक शेंडे म्हणाले, ‘सालबर्डी’ची कथा रहस्यमय आहे. स्थानिक पातळीवरील राजकारण आणि नातेसंबंधांची गुंतागुंत यातून दिसून येते. ओंकारसोबत काम करताना उत्तम ट्युनिंग जमलं आणि आम्ही साकारलेली ही जुगलबंदी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.’
ओंकार भोजने म्हणाला, ‘उपसरपंच मुकिंदा थोरात ही भूमिका खूप मजेशीर आणि रंगतदार आहे. शशांक सरांसारख्या अनुभवी कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. आमची ही केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच भावेल.’
महाराष्ट्रातील दुर्गम भागात वसलेल्या ‘सालबर्डी’ गावात घडणाऱ्या रहस्यमय आणि थरारक घटनांवर आधारित हा चित्रपट आहे. नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली हा चित्रपट साकारण्यात आला असून अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी निर्मिती केली आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी रमेश साहेबराव चौधरी यांनी सांभाळली आहे.
या चित्रपटात शशांक शेंडे आणि ओंकार भोजने यांच्यासोबत पूजा सावंत, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण डाळिंबकर, अभय गिते, राजेंद्र सातार्डेकर आणि कोमल चौधरी असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.