आपण करत असलेल्या कामाचे कौतुक व्हावे, शाबासकीची थाप पाठीवर देत आपल्याला अधिक चांगल्या कामासाठी प्रोत्साहित करावे अशी सगळ्यांचीच अपेक्षा असते. नेहमीच आपल्याला विविध पद्धतीने उत्कृष्ट कामाची पोचपावती दिली जाते. मनोरंजनविश्वात देखील कलाकारांना त्यांच्या कामाचे बक्षीस दिले जाते. पुरस्कारांच्या रूपात त्यांच्या कामाचे प्रेक्षकांकडून कौतुक केले जाते. चित्रपट, मालिका, नाटक अशा मनोरंजनाच्या विविध माध्यमाचे अनेक पुरस्कार सोहळे आपल्या देशात संपन्न होताना आपण पाहतो.
मराठी टेलिव्हिजन पुरस्कार किंवा मराठी मालिका विश्वातील पुरस्कारांबद्दल कोणी बोलले तर आपल्या तोंडातून आपसूकच झी मराठी पुरस्कार हे निघतेच. प्रेक्षकांच्या मनामध्ये या पुरस्कारांबद्दल एक वेगळेच वलय आणि प्रेम कायमच दिसून येते. दरवर्षी सर्वच या पुरस्कारांची आतुरतेने वाट बघत असतात. आपल्या आवडत्या मालिकेला आणि त्यातील कलाकारांना हा पुरस्कार मिळावा अशीच सर्वांची इच्छा असते. या पुरस्कारांमध्ये नेहमीच काहीतरी हटके आणि विलक्षण पाहायला मिळत असते.
मागील बऱ्याच दिवसांपासून झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड २०२३ याबद्दल आपण विविध प्रोमो बघत होतो. आपण आपल्याआवड्त्या कलाकरांना भरभरून मतं देखील दिली. हे पुरस्कार कधी संपन्न होणार आणि कधी आपल्याला पाहायला मिळणार याबद्दल सर्वच प्रेक्षकांना कमालीची आतुरता होती. काही दिवसांपूर्वी मोठ्या दिमाखदार आणि रंगतदार सोहळ्यामध्ये या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यानंतर या सोहळ्याचे काही क्षणचित्रे, व्हिडिओ, फोटो आता सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत.
यावर्षी देखील झी मराठीच्या या पुरस्कार सोहळ्यामध्ये कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् आदी जोरदार परफॉर्मन्स आणि कार्यक्रम या सोहळ्यात असणार आहेत. सोबतच कोणाला कोणता पुरस्कार मिळणार याची उत्सुकता देखील असेलच. ह्यावर्षी या दिमाखदार सोहळ्यात प्रेक्षकांना ‘अप्पी आमची कलेक्टर’, ‘तू चाल पुढं’, ‘सारं काही तिच्यासाठी’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’, ‘नवा गडी नवं राज्य’, ‘३६ गुणी जोडी’ ह्या मालिकांमध्ये पुरस्काराची चुरस रंगलेली बघायला मिळेल.
बॉलिवूडमधील सुपरस्टार, लावण्यवती, उत्कृष्ट डान्सर, जिच्या हास्याने सगळेच घायाळ होतात अशा धक धक गर्ल माधुरी दीक्षितची उपस्थिती यावर्षीच्या पुरस्कारांचे मुख्य आकर्षण असणार आहे. सोबतच इतरही अनेक हिंदी कलाकारांची हजेरी या सोहळ्यामध्ये चार चांद लावताना दिसणार आहे. येत्या ४ नोव्हेंबरला शनिवारी संध्याकाळी ७ वाजता हा सोहळा आपल्याला टीव्हीवर पाहता येणार आहे,