अलीकडेच विधु विनोद चोप्रा यांचे काही जुने सिनेमागृहांमध्ये दाखवण्यात आले होते. ‘परिंदा’ आणि ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ सारखे सिनेमे पाहण्यासाठी प्रेक्षकांनी पुन्हा सिनेमागृहात गर्दी केली होती. हे असे चित्रपट होते ज्यात ‘वास्तविक’ आणि ‘व्यावसायिक चित्रपट’ यांच्यातील रेषा धूसर होती. हे असे सिनेमे आवर्जून बनायला हवेत; असं एक सिनेप्रेमी म्हणून वाटते. तर आता पुन्हा एकदा काही वर्षांच्या अल्पविरामानंतर दिग्दर्शक चोप्रा पुन्हा सिनेमाच्या मैदानात आले आहेत आणि त्यांनी च्या शैलीतील सिनेमा प्रेक्षकांसमोर आणलाय. ‘ट्वेल्थ फेल‘ असं या सिनेमाचं नाव आहे.
‘आयपीएस मनोज कुमार शर्मा’ हे सध्या कदाचित तुमच्या परिचयाचे नसेल.. पण, हा सिनेमा पाहिल्यांनंतर तुम्ही या व्यक्तीला नक्कीच सॅल्यूट कराल. आजच्या तारखेला आयपीएस शर्मा हे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून ‘मुंबई एअरपोर्ट’ला नियुक्त आहेत. पण, जर तुम्हाला कोणी सांगितलं की, जी व्यक्ती आज आयपीएस आहे; ती व्यक्ती बारावी नापास झाली होती. यावर तुमचा विश्वास बसेल का. होय; इयत्ता बारावी नापास झालेला व्यक्ती ‘आयपीएस’ कसा झाला? याचे प्रेरणादायी उत्तर देणारा हा सिनेमा आहे. (12th Fail Movie Review)
बर.. परीक्षण सुरु करण्यापूर्वी; या चित्रपटात एक सीन आहे.. ‘जेव्हा एका विद्यार्थी युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होत नाही, तेव्हा त्याला सांगितले जाते की, ‘तू खोटे चांगले बोलतोस.. अगदी सत्य वाटावे असे असत्य बोलतोस.. तर तू न्यूज रिपोर्टर हो!,’ पण, दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा, मी सत्य आणि सत्यच बोलेन. तुमच्या या सिनेमात खच्चून ‘प्रेरणा’ भरली आहे. खूप दिवसांनी एक अप्रतिम चित्रपट पाहिल्यासारखे वाटले. हा यंदाच्या वर्षातील नक्कीच सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. विक्रांत मॅसी आणि तुम्ही ‘उत्कृष्ट’ काम केलं आहे. आता, हे माझे सत्यबोल तुम्ही कसे घ्याल ते जरूर सांगा.. तर विनोदाचा भाग इथंवरच ठेऊ!
हा चित्रपट लेखक अनुराग पाठक यांच्या ‘ट्वेल्थ फेल’ या पुस्तकावर आधारित आहे. आणि हे पुस्तक आयपीएस मनोज किमान शर्मा यांची सत्य जीवनकहाणी सांगतं! मनोज कुमार शर्माची कथा चंबळच्या एका गावातून सुरु होते. आता चंबळ म्हंटल्यावर जे जे तुमच्या मनात आलं आहे.. ते ते तसंच आहे. समोर बंदूक रोखलेला माणूस तुमच्या नजरेत आला ना? अचूक तीच परिस्थिती सिनेकथानकाच्या पार्श्वभूमीत आहे. आयपीएस चा अर्थही माहीत नसलेला मुलगा यूपीएससी मध्ये कसा? आणि का? उत्तीर्ण होतो. मैत्रीण श्रद्धा आणि तिचे प्रेम त्याला या सगळ्यात कसा पाठबळ देते? या सर्व प्रश्नांची उत्तर हा सिनेमा देतो.
विधू विनोद चोप्राचे सिनेमे पाहिल्यास त्यांच्या कथाकथनासोबतच सिनेमॅटोग्राफीमध्येही वेगळेपण दिसते. ‘ट्वेल्थ फेल’ ही त्याला अपवाद नाही. चित्रपटातील प्रारंभीची चंबळची दृश्ये अनेक प्रसंगांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने चित्रित केली आहेत. डॉक्युमेंटरी शैलीत हातात कॅमेरा घेऊन केलेलं चित्रीकरण आपल्याला चटकन कथानकाशी परिणामी सिनेमाशी जोडून घेतो. सोबतच आणखी एका दृश्यात मनोज त्याच्या जुगाड गाडीने जात आहे. त्यासोबत ड्रोन कॅमेराही फिरत आहे. अचानक एक कार त्याच्या समोर येते. अशा स्थितीत कट नसतो, कॅमेरा मागे सरकतो आणि घट्ट फ्रेम ‘वाइड अँगल’ बनते. हा काही नवीन प्रयोग नाही, पण कथानकाला सूचक आणि नक्कीच सुंदर आहे. मात्र, पूढे जेव्हा मनोज दिल्लीत येतो.. तेव्हा कॅमेरा वर्क आणि सिनेमॅटोग्राफी अगदी कसदार आणि शार्प होते. हा दिग्दर्शकीय आणि सिनेमॅट्रोग्राफी पैलू वाखाणण्याजोगा आहे.
सिनेमाच्या कथानकाचा विचार करताना.. टिव्हीएफच्या ‘ऍस्परन्ट’ काही ठिकाणी डोकावतो. यामध्ये तुम्हाला संदीप भैय्यासारखे कॅरेक्टरही पाहायला मिळेल, जो सगळ्यांना मदत करतो. म्हणजेच यूपीएससी इच्छुकांचे आयुष्य कमी-अधिक प्रमाणात असेच असते. या चित्रपटातही असेच जीवन पाहायला मिळते. काही दृश्ये खूपच भावूक झाली आहेत. मनोज पिठाच्या गिरणीत काम करत असल्याचे एक दृश्य आहे. त्याचे वडील त्याला भेटायला येतात. या सीनमध्ये ‘मौनाचा’ वापर खूप छान झाला आहे. गिरणीची घरघर अचानक बंद होते. आता प्रामाणिकपणा सोडून ते काळाबाजार करावी! असा परिस्थिती प्रश्न त्यांच्यासमोर असतो. कथानकातील हे वळण उत्कृष्टपणे दिग्दर्शित करण्यात आलं आहे. तांत्रिकदृष्टया सिनेमा अव्वल रीतीने बनवल्याने सिनेमा पाहताना प्रेक्षक म्हणून आपण समृद्ध होतो. विशेषकरुन सिनेमाचे पार्श्वसंगीत आणि बॅकग्राऊंड स्क्रॉल. चित्रपटाची कथा अतिशय सहज आणि साध्या पद्धतीने वाहत पुढे जाते.
कथनकाबाबत सांगायचे तर सिनेमात मध्यप्रदेशातील चंबळ भागातील बिलग्राम येथे एक सर्वसामन्य कुटुंब आपले जीवन जगत आहे. या कुटुंबात आई, मुलगा (रामवीर शर्मा) -सून आणि नातवंडे; असा परिवार आहे. आजोबा सैन्यात होते, मुलगा (रामवीर) ही त्याच्या वडिलांप्रमाणे प्रामाणिक आहे आणि सरकारी नोकरी करतोय. एके दिवशी वरिष्ठ अधिकारी त्याला धान्याच्या काळाबाजारात मदत करण्यास सांगतात, पण प्रामाणिक असलेला रामवीर भ्रष्टाचार करण्यास नकार देतो. परिणामी त्याला निलंबित केले जाते. अगोदरच घरची परिस्थिती बेताची आणि आता नोकरी गेल्यानं आर्थिक अडचणही.. रामवीरचा मुलगा अर्थात आपल्या सिनेमा कथानायक.. मनोज कुमार शर्मा (विक्रांत मैसी) आपल्या घरची दयनीय अवस्था पाहतोय. इयत्ता बारावीत नक्कल करुन.. उत्तीर्ण होऊन नोकरी मिळवावी; या विचारात तो आहे. पण, त्याच्या आयुष्याला कलाटणी लागते आणि तो थेट आयपीएस अधिकारी होण्याचं स्वप्न पाहू लागतो. तो केवळ स्वप्नंच पाहत नाही तर; हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो जीवाचं रान करतो. चंबळ पासून दिल्ली आणि दिल्ली पासून आयपीएस अधिकारी होण्याचा संघर्षमय प्रवास लीलया आपल्याला पडद्यावर दिसतो.
अभिनयाच्या आघाडीवर विक्रांत मेसीने आपली भूमिका पूर्ण आत्मविश्वासाने साकारली आहे. तो प्रत्येक टप्य्यावर त्याच्या पात्राला पूर्ण न्याय देतो. त्याच्या आत राग आहे, तो असहाय आहे.. पण तो उभा आहे. हे सर्व भाव त्याचे चेहऱ्यावर आणि त्याच्या देशबोलीत शिताफीने साकारले आहेत. प्रियांशू चॅटर्जी यांनी डीसीपी म्हणून आपल्या छोट्या भूमिकेतही छाप सोडली आहे. एक अभिनेता म्हणून त्याचे कौशल्य पाहण्यासारखे आहे जिथे तो मनोजला त्याचा वरिष्ठ अधिकारी म्हणून भेटतो. येथे त्यांची प्रतिक्रिया वरिष्ठ अधिकाऱ्याबद्दल आदर दर्शवते आणि तरुणांना योग्य मार्ग निवडण्यासाठी प्रेरित करते, जे लाजवाब आहे. मनोजचे आई-वडील म्हणून गीता अग्रवाल शर्मा आणि हरीश खन्ना यांनीही छोट्या भूमिकांमध्ये आपली छाप सोडली आहे. एकंदरच सिनेमा तुम्ही पाहावा आणि आपलपल्या परीने आपल्या क्षेत्राप्रमाणे (करिअर) त्यातून बोध घ्यावा.
सिनेमा : ट्वेल्थ फेल
निर्मिती, दिग्दर्शक : विधु विनोद चोप्रा
लेखक : अनुराग पाठक
कलाकार : विक्रांत मेसी, मेधा शंकर, अंशुमन पुष्कर, सरिता जोशी, अनंत विजय जोशी
दर्जा : साडे तीन स्टार