Bollywood Actress Vidya Balan In Marathi Serial Kamali : बॉलिवूडमधील दमदार अभिनेत्री विद्या बालन आता छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे, यावेळी ती थेट मराठी मालिकेत दिसणार आहे.
विद्या बालन हिने आपल्या कारकीर्दीची सुरुवात टेलिव्हिजनपासून केली होती. ‘हम पांच’ या लोकप्रिय हिंदी मालिकेतून तिने अभिनयाच्या क्षेत्रात पहिले पाऊल टाकलं आणि पुढे अनेक सुपरहिट चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. आता पुन्हा एकदा ती मालिकेतून आपल्या खास शैलीत प्रेक्षकांना भेटायला येत आहे – पण यावेळी थेट झी मराठीच्या मंचावरून!
‘झी मराठी’ वाहिनीवर सुरु होणाऱ्या ‘कमळी’ या नव्या मालिकेत विद्याचा जबरदस्त प्रवेश झाला आहे. या मालिकेत ती एका बुद्धिमान आणि समर्पित शिक्षिकेची भूमिका साकारते. प्रोमो व्हिडिओत विद्याला कमळी या मुख्य पात्राला प्रश्न विचारताना दाखवलं आहे.
“भारताची आर्थिक राजधानी कोणती?” असा प्रश्न विचारल्यावर कमळी उत्साहाने “मुंबई!” असं उत्तर देते. पुढचा प्रश्न – “मुंबईतील विमानतळाचं नाव काय?” यावर कमळी नेमकं उत्तर देते, “छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ.” मात्र तिसऱ्या प्रश्नावर मात्र कमळी अडखळते आणि इथूनच मजेशीर प्रसंग घडतो.
हा प्रोमो सोशल मीडियावर सध्या चांगलाच गाजत आहे. विद्याचा अभिनय आणि कमळीच्या संवादातून साकारलेलं खुसखुशीत नातं प्रेक्षकांना भावतं आहे. चाहत्यांनीही विद्या बालनला मराठी मालिकेत पाहण्याची उत्सुकता व्यक्त केली आहे.
‘कमळी’ ही मालिका आजपासून झी मराठी वाहिनीवर दररोज रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विद्याच्या आगमनामुळे मालिकेला नक्कीच नवा उजाळा मिळाला आहे.