सुप्री मीडिया प्रस्तुत, कोक्लिको पिक्चर्स निर्मित आणि जीजिविषा काळे दिग्दर्शित ‘तिघी’ या चित्रपटाची घोषणा होताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आई-मुलींच्या नात्यातील न बोललेल्या भावना, आठवणी आणि स्त्रियांच्या भावविश्वाचा हळुवार वेध घेणारा हा भावस्पर्शी चित्रपट आता आणखी एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. २४व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल (PIFF) च्या ‘मराठी सिनेमा कॉम्पिटिशन’ विभागात ‘तिघी’ची अधिकृत निवड झाली आहे.
‘तिघी’ हा चित्रपट बदलत्या काळात नात्यांमध्ये येणारे भावनिक चढ-उतार आणि आयुष्याकडे पाहण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन प्रभावीपणे मांडतो. ‘तिघींच्या जगण्यातलं चौथं पान’ उलगडताना, स्त्रीमनातील सूक्ष्म भावना आणि आई-मुलींच्या नात्यातील न सांगितलेल्या गोष्टी अत्यंत संवेदनशीलतेने पडद्यावर उतरवण्यात आल्या आहेत. हा चित्रपट येत्या ६ मार्च २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटाची निर्मिती नेहा पेंडसे बायस, निखिल महाजन, सुहृद गोडबोले आणि स्वप्निल भंगाळे यांनी केली आहे. यापूर्वी याच टीमचे ‘पुणे ५२’, ‘गोदावरी’, ‘जून’ आणि ‘रावसाहेब’ हे चित्रपट पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये झळकले असून, ‘तिघी’च्या निमित्ताने या यशस्वी प्रवासात आणखी एक पान जोडले जात आहे.
जीजिविषा काळे यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या चित्रपटात भारती आचरेकर, नेहा पेंडसे बायस आणि सोनाली कुलकर्णी या तीन दमदार अभिनेत्री महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. सशक्त अभिनय, संवेदनशील विषय आणि नात्यांवर भाष्य करणारी कथा यामुळे ‘तिघी’ महोत्सवाच्या चौकटीतही विशेष लक्ष वेधून घेत आहे.
प्रेक्षकांना केवळ मनोरंजन न देता आशयघन, समाजाशी जोडलेल्या आणि मनाला स्पर्श करणाऱ्या कथा पडद्यावर साकारण्याचा कोक्लिको पिक्चर्सचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. दर्जेदार आणि संवेदनशील आशय देण्याचे हे ध्येय ‘तिघी’च्या माध्यमातूनही ठळकपणे पुढे येताना दिसत आहे.
=====
हे देखील वाचा : प्राजक्ता माळीची Bigg Boss Marathi 6 मध्ये एन्ट्री? अवघ्या दोन शब्दांत दिलं थेट उत्तर
=====