सध्या सोशल मीडियावर एका खास पोस्टमुळे मराठी मनोरंजनविश्वात उत्सुकतेची लाट पसरली आहे. या चर्चेचं केंद्रबिंदू ठरले आहेत तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे. या दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एकमेकांना टॅग करत ‘होणार सून ती ह्या घरची’ आणि ‘तुला पाहते रे’ असं मजेशीर शेअरिंग केलं आणि चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली.
तेजश्री आणि सुबोधने आजवर कधीही एकत्र कोणत्याही मालिकेत काम केलं नव्हतं. दोघांनी २०२४ मध्ये ‘हॅशटॅग तदैव लग्नम’ या सिनेमात एकत्र काम केलं होतं, पण मालिकेच्या माध्यमातून ही पहिलीच वेळ आहे जेंव्हा ही दोघं एकत्र झळकणार आहेत.
कालच्या पोस्टमध्ये दोघांनी एकमेकांच्या लोकप्रिय मालिकांची नावं वेगळ्याच अंदाजात लिहिल्यानं ही जुळलेली सांकेतिक भाषा नवीन मालिकेच्या इशाऱ्यासारखीच वाटली. ‘होणार सून ती ह्या घरची’ आणि ‘तुला पाहते रे’ या दोघांच्या जुना संदर्भ असलेल्या मालिकांचे उल्लेख, यामुळे ही नवीन मालिका देखील झी मराठीवरच येणार अशी शक्यता पक्की झाली आहे.
अद्याप मालिकेच्या प्रसारण तारखेची अधिकृत घोषणा झाली नसली, तरी या मालिकेचा प्रीमियर जुलै २०२५ मध्ये होणार असल्याची चर्चा आहे. झी मराठीवर तेजश्री-सुबोधसारखी हिट जोडी एकत्र पाहायला मिळणार हे ऐकून चाहत्यांची प्रतीक्षा आणखीनच वाढली आहे.