गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर समोर आला आहे. प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री तेजश्री प्रधान पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करत आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही नवी मालिका लवकरच सुरू होणार असून, यामध्ये तेजश्री प्रधानसोबत अभिनेता सुबोध भावे प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.
तेजश्री आणि सुबोधला एकत्र पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता काही वेगळीच आहे. काही दिवसांपूर्वी या दोघांनी त्यांच्या सोशल मीडियावरून ‘तुला पाहते रे’ आणि ‘होणार सून ती ह्या घरची’ यासारख्या जुन्या मालिकांच्या आठवणी जागवणाऱ्या पोस्ट्स शेअर केल्या होत्या. त्यामुळेच दोघंही पुन्हा ‘झी मराठी’च्या नव्या प्रोजेक्टमध्ये एकत्र येणार याचा अंदाज अनेक चाहत्यांनी आधीच बांधला होता.
या नव्या मालिकेत ‘समर’ आणि ‘स्वानंदी’ यांची वेगळीच प्रेमकहाणी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. सुबोध भावे ‘समर’ची तर तेजश्री प्रधान ‘स्वानंदी’ची भूमिका साकारते. दोघांची भेट एका आलिशान रेस्टॉरंटमध्ये होते — जिथे लग्नाची चर्चा होणार असते. मात्र, समर आधीच सगळं ठरवून ठेवतो, ज्यामुळे स्वानंदी नाराज होते आणि ती निघून जाते.
यावेळी समरच्या लक्षात येतं की त्यांनी खरंतर एकमेकांसोबतचं लग्न ठरवलेलं नाही. स्वानंदी म्हणते, “त्यात काय बोलायचं आहे ते तर ठरलेलं आहेच.” दोघंही आपापल्या भावंडांच्या सुखासाठी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतात — एक अनोखी, भावना गुंतवणारी सुरुवात.
‘झी मराठी’ने या प्रोमोसोबत दिलेलं कॅप्शनही लक्षवेधी होतं — “नियतीने जोडी जुळवली की ठरवून ‘लग्न’ होतं… आणि न ठरवता ‘प्रेम’…”
या मालिकेचं नाव ‘खुलता कळी खुलेना’ या झी मराठीवरील पूर्वीच्या लोकप्रिय मालिकेच्या शीर्षकगीतातून घेतलं गेलं आहे. “हीच प्रीती, हीच भीती… वीण दोघांतली ही तुटेना” — या ओळींनी प्रेक्षकांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्याची वेळ आणि प्रीमियर तारीख लवकरच जाहीर केली जाईल. तेजश्री आणि सुबोध यांची जोडी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार असल्याने प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका आघाडीवर राहील असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, तेजश्री प्रधानच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. “अतिशय सुंदर प्रोमो”, “तेजश्री नेहमीप्रमाणे उत्तमच”, “तिचं परत येणं हे खासच आहे”, “पुन्हा एकदा जुनं काहीसं नव्याने पाहायला मिळेल” अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत.